बुधवार, 21 सितंबर 2011
राज-उद्धवच्या "रिऍलिटी शो'मध्ये छोटासा ब्रेक!
राज-उद्धवच्या "रिऍलिटी शो'मध्ये छोटासा ब्रेक!
-
Thursday, September 22, 2011 AT 03:00 AM (IST)
महाराष्ट्रात "भाऊबंदकी'चा रिऍलिटी शो सुरू होऊन जवळपास सहा वर्षे झाली. एकीकडे घरातल्या छोट्या पडद्यावर कुंकू, वहिनीसाहेब अशा मालिका सुरू असतात आणि त्यांना वैतागून चुकून बातम्यांची मराठी चॅनेल्स लावली, की तिथं हा "रिऍलिटी शो' सुरू असतो. मनोरंजन वाहिन्यांना या अशा जीवघेण्या कौटुंबिक मालिकांचे शूटिंग करण्यासाठी दणदणीत पैसे खर्च करावे लागत असतात; पण या दोन भावांनी मात्र वृत्तवाहिन्यांना खमंग आणि झणझणीत मसाला, शिवाय तो "टीआरपी'च्या हमीसकट पुरवण्याचं कंत्राटच घेतलं आहे की काय देव जाणे? - आणि मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने दोनच दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या 550 कोटी रुपयांच्या कंत्राटात साटंलोटं झाल्याचा आरोप "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असला, तरी वृत्तवाहिन्यांना चटकदार मसाला पुरवण्यासाठी या दोन भावांनी घेतलेल्या कंत्राटात मात्र एक पैशाचाही घोळ झालेला नाही! पण या "रिऍलिटी शो'चा आणखी एक एपिसोड फुकटात शूट करता येईल, म्हणून "कृष्णकुंज'वर बुधवारी जमलेल्या तमाम व्हिडिओग्राफर्सची भलतीच निराशा झाली, ती राज यांनी या नव्या एपिसोडच्या शूटिंगसाठी दिवाळी होईपर्यंत थांबण्याची घोषणा केल्यामुळे. राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधूंमधील वाग्बाणांमुळे लोकांची करमणूक तुफान होत असली, तरी त्यामुळेच या दोघांनाही लोकांच्या वास्तवातील प्रश्नांचीही जराही फिकीर नाही, असंच वाटू लागलं होतं. दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी तर हा कलगीतुरा इतक्या शिगेला पोचला की राज्यातील सर्वच्या सर्व, 288 मतदारसंघांत राजविरुद्ध उद्धव अशीच लढत सुरू असल्याचं चित्र त्यामुळे प्रसारमाध्यमांतून उभं राहिलं होतं. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रचारमोहिमेतही पुन्हा तोच "रिप्ले' झाला. मराठी माणसांची करमणूक जरूर होत होती; पण त्याचे प्रश्न मात्र रस्त्यावरच पडून राहत होते. कारण मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नाशिक-औरंगाबाद अशा राज्याच्या मोठ्या शहरी भागातील महापालिका या शिवसेनेच्याच कब्जात आहेत आणि साहजिकच तेथील नागरी समस्या सोडविण्याची जबाबदारीही त्याच पक्षाची आहे. अर्थात, राज्यातील कॉंग्रेस आघाडीचं सरकार आणि विशेषतः नगरविकास खातं सातत्यानं आपल्याकडे ठेवणारे मुख्यमंत्री हे त्यामध्ये खोडा घालत असणार, हे गृहीत धरलं तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी नाकारता येणं कठीण आहे.
त्यामुळेच आता अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे निवडणूक आचारसंहिता जारी होण्याआधीच सारी कामं ठप्प होऊन जातात की काय, अशी भीती निर्माण झाली होती. पण राज ठाकरे यांनी घेतलेल्या या ब्रेकमुळे त्यावर पडदा पडला आहे. अर्थात, आता पुन्हा या ब्रेकचा काही विपरीत अर्थ लावून उद्धव यांनी त्यावर बोलणं थांबवायला हवं. कारण लोकांना आता छोट्या पडद्यावरील तथाकथित "रिऍलिटी शो'बरोबरच या वास्तवातील जुगलबंदीचाही तितकाच कंटाळा आला आहे. लोकांना आता दिसताहेत ती महापालिका क्षेत्रांत झालेली तसेच न झालेली विकासकामे आणि ती करणारे वा त्यात खोडा घालणारे राजकारणी. त्यामुळेच आता कोण जंगलात जाणार आणि कोण खड्ड्यांत जाणार, याचा निकाल मतदारराजाच पुढच्या चार महिन्यांत देणार आहे. ते राज यांनी उद्धव यांना आणि उद्धव यांनी राजला सांगण्याचं काही कारणच उरलेलं नाही.
तरीही दिवाळीनंतर आपले फटाके पुन्हा वाजवण्याची धमकी राज यांनी दिली आहेच. आता ते फटाके म्हणजे वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्या काढणारे बॉंब नसतील, तर जनहिताचे प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या माळा असाव्यात, एवढीच इच्छा व्यक्त करण्यापलीकडे मतदारांच्या हातात काय आहे?
- प्रकाश अकोलकर
सोमवार, 19 सितंबर 2011
'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा'
'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 20, 2011 AT 01:00 AM (IST)
मुंबई - अन्य राज्यांत जाऊन जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढले असते, तर आपण किती "माती' केली ते कळले असते. फोटोग्राफीची हौस फिटली असती आणि जनतेचेही भले झाले असते, असा सणसणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवरून लगावला. राज यांनी उद्धव यांचे थेट नाव घेतले नसले तरी मुंबई महापालिकेतील आगामी आरोप प्रत्यारोपांची धुळवड यानिमित्ताने सुरू झाली, असे मानले जाते.
राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर आज सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अन्य राज्यात जाऊन महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांचा शिवसेनेच्या मुखपत्रात आज समाचार घेण्यात आला होता. त्याबाबत विचारणा केली असता, राज्यावर कोणीही टीका करत नसून नाकर्त्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. महाराष्ट्राची बदनामी कोणी करू शकत नाही. त्याची बलस्थानेही कोणी नाकारू शकत नाही, असे राज यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तसेच अडवानी यांनी मोदी भावी पंतप्रधान म्हणून योग्य असल्याचे सांगितल्यावर आपल्याला बरे वाटले. राज्याचा विकास करणारा माणूस पंतप्रधान झाल्यास देशासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. अमेरिकेनेही त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. ही भाजपची अंतर्गत बाब असली, तरी विकासाच्या मुद्द्यावर मोदींना पंतप्रधान झालेले पाहण्यास आपल्याला निश्चित आवडेल, असे राज यांनी सांगितले.
गुजरातमध्ये 24 तास वीज आहे. संपन्न महाराष्ट्राची येथील सत्ताधाऱ्यांनी वाट लावली आहे. राज्यातील भारनियमन, आत्महत्या, रस्त्यांवरील खड्डे, नागरिकांच्या विरोधातील कंत्राटे या मुद्द्यांवर बोलायचे नाही, तर कशावर बोलायचे, असा प्रश्न त्यांनी केला. आम्ही राज्यावर टीका करीत नसून येथील राज्यकर्त्यांबद्दल बोलतोय. चांगले काम करणाऱ्या राज्याबद्दल बोलायचे नाही तर काय करायचे. बाळासाहेब 1982 मध्ये अमेरिकेत जाऊन आल्यावर तेथील विकासकामांचीही त्यांनी स्तुती केली होती.
गुजरातमधील महापालिका नफ्यात आहेत. आमच्या मात्र संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. 72 टक्के खर्च वेतनावर होतोय. उरलेले उत्पन्न खाबुगिरीमध्ये जातेय. माझा कोणत्याही राज्यावर रोष नाही. उद्या बिहारने बोलावले, नितीशकुमारांचे आमंत्रण आले, तर तिकडेही जाईन. नितीशकुमार काम करतात, ही चांगली बाब आहे. परप्रांतीय भूमिपुत्रांना आणि त्यांच्या भाषेला नाकारतात. त्यामुळे मी त्यांना विरोध करतो. अण्णांना मी दूरध्वनीवरून पाठिंबा दिला होता; पण त्यांच्या बाजूला असलेल्या बेदी आदी चौकडीला भेदून जाण्यासाठी मी काही अभिमन्यू नाही; मात्र अण्णांची भेट लवकरच घेणार असल्याचे राज यांनी सांगितले.
भाजपला लाथा खाण्याची सवय
नरेंद्र मोदींच्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आपण जवळ जात आहात का, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्या वेळी आपण कोणाबरोबरही जाण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे ते म्हणाले. भाजपला एवढी वर्षे शिवसेनेच्या लाथा खाण्याची सवय लागली असल्याची कडवट टीकाही राज यांनी या वेळी केली
मोदींप्रती सदभावनेसाठी राज ठाकरे गुजरातेत
मोदींप्रती सदभावनेसाठी राज ठाकरे गुजरातेत
वृत्तसंस्था
Monday, September 19, 2011 AT 12:29 PM (IST)
अहमदाबाद - सदभावना मिशन अंतर्गत तीन दिवसांचे उपोषण करीत असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) उपोषणाच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पाहणे आपल्याला आवडेल असे म्हटले आहे.
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या मोदींच्या उपोषणस्थळी राज ठाकरे यांनी आज सकाळी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलला अमेरिकेने देखील प्रमाणपत्र दिलेले आहे. मोदींवर असलेले दंगलीचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असल्याने त्यांनी समर्थन करण्यात काहीच गैर नाही. अमेरिकन काँग्रेसच्या एका अहवालात मोदींचे देशाच्या विकासात असलेल्या योगदानाबद्दल दखल घेणे उल्लेखनीय आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या विकासाचा दर हा ११ टक्के राहिला आहे. त्यावरून गुजरात हे प्रगतीप्रथावर असल्याचे दिसून येते.
गुजरातच्या शांतीसाठी सदभावना मिशन अंतर्गत नरेंद्र मोदी शनिवारपासून तीन दिवसांचे उपोषण करीत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा शेवटचा दिवस असून, एनडीएमधील नेत्यांनी त्यांची या दरम्यान भेट घेतली आहे. मात्र, नितीश कुमार यांनी मोदींच्या या उपोषणावर टीका केली आहे.
सदस्यता लें
संदेश (Atom)