शनिवार, 13 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत उद्धव-राज हातमिळवणी

कल्याण-डोंबिवलीत उद्धव-राज हातमिळवणी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:15 AM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महापौरपद व विरोधी पक्षनेतेपदासाठी हातमिळवणी झाल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा असताना मनसेकडे घाईघाईने विरोधी पक्षनेतेपद कसे देण्यात आले, असा सवालही त्यांनी केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, मनसे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत झाली. निवडणुकीत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 29 नगरसेवक निवडून आले व मनसेने 27 जागा जिंकल्या. शिवसेनेने भाजप व अपक्षांच्या मदतीने महापौरपदावर दावा केला. आघाडीकडे बहुमत नव्हते. त्यामुळे कुणी अपक्ष उमेदवार पुढे आला तर त्याला पाठिंबा देण्याची रणनीती दोन्ही कॉंग्रेसने आखली; तर मनसेने महापौरपद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेवर तोफा डागणाऱ्या राज ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन शिवसेनेला महापौरपद मिळण्याचा मार्ग मोकळा केला. तरीही आघाडीचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे असल्याने आमच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद यायला हवे होते, असे माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेला हे पद कसे देण्यात आले असा सवालही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला. महापालिकांमधील विरोधी पक्षनेतेपदाचा घोळ वर्षभर चालतो. कल्याण-डोंबिवलीत मात्र घाईघाईने मनसेला हे पद देण्यात आले, त्यामुळे महापौरपद व विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याचे स्पष्ट होते, असा दावाही त्यांनी केला.

बुधवार, 10 नवंबर 2010

चौहान नव्हे; चव्हाण म्हणून वावरा!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 11, 2010 AT 12:35 AM (IST)
 

मुंबई - पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे मानले जातात. त्यांनी आपली हीच प्रतिमा जपावी, कोणत्याही जमीन वा भूखंडाच्या प्रकरणात अडकू नये. महाराष्ट्रातील विकासाच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राच्या समस्या सोडवाव्यात, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांना दिला. नव्या मुख्यमंत्र्यांनी मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांना शुभेच्छा देऊन ते म्हणाले, की आतापर्यंत ते सर्वांत जास्त काळ दिल्लीतच वावरले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर "चौहान' म्हणून नव्हे; तर "चव्हाण' म्हणून वावरावे. दिल्लीहून मुंबईकडे येताना पृथ्वीराज चव्हाण यांनी "मैं बम्बई जा रहा हूं' असा उल्लेख वारंवार केला. तेव्हा मुंबईत आल्यानंतर आपण त्यांना 108 मण्यांची माळ देणार आहोत. त्यांनी 108 वेळा "मुंबई, मुंबई...' असा जप करावा, असा टोला राज यांनी लगावला.
पृथ्वीराज यांनी सर्वप्रथम आदर्श गैरव्यवहारात गुंतलेल्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करावी. सनदी अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालू नये, अशी मागणी करताना राज म्हणाले, की महाराष्ट्रात शासकीय व पोलिस अधिकाऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आहे. याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी - राज

मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 10, 2010 AT 02:04 PM (IST)
 

मुंबई - मुंबईचा उल्लेख 'बंबई' असा करणारे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र माहीत नसेल तर माहीत करून घ्यावा. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडीनंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले, ''मुंबईला बंबई म्हणणारे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले की, त्यांना 'मुंबई'चा जप करण्यासाठी १०८ मण्यांची माळ भेट देणार आहे. त्यानंतर त्यांनी एक-एक मणी मोजत 'मुंबई' म्हणण्याची सवय करून घ्यावी. पृथ्वीराज चव्हाण हे कोणत्याही वादात अडकलेले नेते नसून, ती प्रतिमा त्यांनी जपावी. पृथ्वीराज हे नव्याने महाराष्ट्रात येत असून, त्यांचे काम बघूनच त्यांच्याबदद्ल मत मांडता येईल. राज्यातील काँग्रेस नेते त्यांना टिकू देतील असे वाटत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भावी कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा.''

सोमवार, 8 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत "मनसे' विरोधी बाकावर बसणार

कल्याण-डोंबिवलीत "मनसे' विरोधी बाकावर बसणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 09, 2010 AT 12:28 AM (IST)
 

डोंबिवली - 'कल्याण-डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधी पक्षाचे काम करणार आहे. विरोधी पक्ष म्हणजे विरोधक नव्हे; तर पालिकेतील सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याची भूमिका मनसे चोख बजावेल,'' अशी भूमिका या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहीर केली.

पालिकेच्या निकालानंतर 27 जागांवर विजय मिळविलेली मनसे सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावणार, अशी चर्चा होती. महापालिकेत महापौर "मनसे'चाच असेल, असे राज यांनी निवडणुकीपूर्वी आणि प्रचारात सांगितले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेविषयी तर्कवितर्क सुरू होते. निकालानंतर प्रथमच भूमिका जाहीर करताना राज ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

'महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहील. घोडेबाजारात सहभागी होणार नाही. सत्ता स्थापनेसाठी मी स्वत:हून कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधलेला नाही. जे काही वर्तमानपत्रातून वाचले, त्या सगळ्या अफवा होत्या. राजकीय अफवांवर माझा विश्‍वास नाही. त्यामुळे त्याविषयी मी काही खुलासा करणार नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन मनसे सत्ता स्थापन करणार, असे गणित मांडले जात होते. मात्र, मनसेने या दोन्ही कॉंग्रेसला धक्का दिल्याने ते मनसेसोबत येणे कसे शक्‍य आहे, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. आमच्यापुढे दुसरा पर्याय शिवसेनेचा होता; पण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांची आकडेवारी पाहता, मागच्या वेळी शिवसेना आणि पुरस्कृत नगरसेवक धरून 34 जागा होत्या. यंदा त्यांना 31 जागा मिळाल्या, म्हणजे त्या कमी झाल्या. शिवसेनेच्या मागच्या वेळच्या 11 जागी मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत.'' मनसेमुळे त्यांचे मावळते महापौर आणि उपमहापौर पराभूत झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'कल्याण-डोंबिवलीचा महापौर "मनसे'चा व्हावा, ही माझी इच्छा होती. जनतेने मला तसा पाठिंबाही दिला. मात्र, मी मनसेच्या हाती पूर्ण सत्ता देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. पूर्ण सत्ता हाती नसली तरी ही शेवटची निवडणूक नाही. यापुढेही निवडणुका होणार आहेत. मी काही सत्तापिपासू नाही,'' असा टोलाही त्यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या 11 जणांपैकी चार अपक्षांचा एक गट तयार करण्यात आला असून, त्यापैकी एका अपक्षाने मला पत्र पाठवून महापौरपदासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, असे विनोदी पत्र पाठविले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तो अपक्ष नगरसेवक कोण, याचा तपशील त्यांनी दिला नाही.

नगरसेवकांची संख्या आता 28अपक्ष नगरसेविका सरोज भोईर यांनी आज मनसेत प्रवेश केल्याने त्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रनगरमधून शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वामन म्हात्रे यांच्याविरोधात बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र भोईर यांचा पराभव झाला. भोईर हे पूर्वीपासून मनसेच्या वाटेवर होते. त्यांच्या पत्नी सरोज भोईर देवीचा पाडा प्रभागातून अपक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. भोईर यांनी पत्नीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे भोईर पती-पत्नींनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला

'मनसे' विरोधी पक्ष म्हणून काम करणार - राज

'मनसे' विरोधी पक्ष म्हणून काम करणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 08, 2010 AT 02:02 PM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाविरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे, आज (सोमवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्ष नगरसेवक असलेल्या प्रकाश भोईर यांनी मनसेत प्रवेश केल्याने आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत पक्षाचे २८ नगरसेवक झाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, ''कल्याण-डोंबिवलीत महापौर हा कोणत्याही पक्षाचा होऊ द्या, आम्ही घोडेबाजारांत सहभागी होणार नाही. महापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नसून, मतदानही करणार नाही. आमचे सर्व नगरसेवक विरोधी पक्ष म्हणून काम करताना महापालिका क्षेत्रातील कामावर अंकुश ठेवतील. येथील नागरिकांची मनसेच्या नगरसेवकांकडून कोणतीच निराशा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. युतीबाबत मी आतापर्यंत कोणाला भेटलो नाही आणि भेटणारही नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.