शनिवार, 17 नवंबर 2012

"मातोश्री'समोर जनसागर लोटला

"मातोश्री'समोर जनसागर लोटला



- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, November 17, 2012 AT 05:11 PM (IST)

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी "मातोश्री'समोर अथांग जनसागर लोटला आहे. "जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला आहे. त्यांच्या चाहत्यांच्या मनातील दुःख डोळ्यांतून भळाभळा वाहत असल्याचे दिसून येत आहे. थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरवात होणार असल्याचे समजते. अंत्ययात्रेसाठी महारथ तयार करण्यात आला आहे. शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ-वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित आहेत. "मनसे"चे अध्यक्ष राज ठाकरेही "मातोश्री'वर दाखल झाल्याचे समजते.

मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे, आपल्या अफलातून व्यंग्यचित्रांनी कधी फटकारे; तर कधी आधार देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (वय 86) नावाचा झंझावात काल दुपारी शांत झाला. वांद्य्रातील कलानगरमधील "मातोश्री' या आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ जमलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या अश्रूंचा बांध फुटला... गेली चार दशके महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून काढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांवर आज (ता. 18) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा आज (रविवारी) सकाळी साडेसात वाजता मातोश्री बंगल्यापासून निघणार असून, ती शिवाजी पार्क येथे जाईल. तिथे अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात येत असून, संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले. अवघ्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले आणि पाहता पाहता महाराष्ट्र जणू जागच्या जागी थांबला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा "ढाण्या वाघ' हरपल्याची भावना महाराष्ट्रात उमटली.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ढासळत असल्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यात दाखविलेल्या त्यांच्या चित्रफितीवरून स्पष्ट झाले होते. त्यांनी स्वत:च तसे बोलूनही दाखविले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. मंगळवार (ता. 13 नोव्हेंबर) रात्रीपासून ते अत्यवस्थच होते. मात्र, ते या दुखण्यातूनही बाहेर येतील, असा लाखो शिवसैनिकांचा आणि चाहत्यांचा दुर्दम्य आशावाद होता. पण, अखेर या नेत्याची प्राणज्योत दुपारी मालवली. त्या वेळी ठाकरे कुटुंबातील प्रत्येक जण, सर्व शिवसेना नेते तसेच त्यांच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून मुंबईतील उपनगरी रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. एसटी व बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात येण्याची शक्‍यता आहे. वाहतूक वगळता मुंबईतील अन्य व्यवहार उद्याही बंद राहण्याची शक्‍यता आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून काही लाख लोक येतील, हे लक्षात घेऊन पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढविला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान असतील.

गेली 45 वर्षे शिवसेनाप्रमुख समोर येताच, "आव्वाज कुणाचा, शिवसेनेचा...' अशा जोरदार घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांचा आवाज त्यांच्या निधनाच्या वृत्ताने फुटेनासा झाला. शिवसेनाप्रमुख आपल्यात राहिले नाहीत, हेच त्यांना सहन होत नव्हते. ज्याने मराठी माणसाच्या न्याय्य हक्‍कांसाठी 50 वर्षे लढा दिला, असंख्य मराठी तरुणांना नोकऱ्या वा रोजगार मिळवून दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमान मिळवून दिला; तो नेता यापुढे पाहायला मिळणार नाही, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. "मातोश्री' या त्यांच्या निवासस्थाच्या आतील आणि बाहेरील वातावरण हेलावून टाकणारे होते. पुरुष, महिला, लहान मुले, तरुण, तरुणी रडताना पाहून त्यांना धीर देणारे नेतेही गलबलून जात होते.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची घोषणा होताच, तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांनाच नव्हे, तर अनेक वर्षे त्यांच्यासमवेत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही रडू कोसळले. रस्त्यावर असलेल्या शिवसैनिकांनी तर हंबरडाच फोडला. शिवसेनेच्या यानंतरच्या एकाही सभेत बाळासाहेब दिसणार नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकायला मिळणार नाही, याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते



गुरुवार, 15 नवंबर 2012

काळजीनंतर दिलासा

काळजीनंतर दिलासा
 

-
Friday, November 16, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून खालावलेली प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी आश्‍वासक घोषणा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी केली आणि ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर पसरलेले तणावाचे तसेच चिंतेचे वातावरण काही प्रमाणात तरी निवळले. पाठोपाठ उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनीही तशीच ग्वाही दिली असून, लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन उद्धव यांनी केले.

दिवाळीत पाडव्याच्या दिवशी, बुधवारी रात्री ठाकरे यांची प्रकृती झपाट्याने बिघडत असल्याचे वृत्त आले आणि मुंबई तसेच राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेच्या बहुतेक बड्या नेत्यांबरोबरच एकेकाळचे "शिवसैनिक' छगन भुजबळ आणि बाळासाहेबांचे सुहृद अमिताभ बच्चन यांनीही मध्यरात्रीच्या सुमारास "मातोश्री' या ठाकरे यांच्या निवासस्थानी धाव घेतल्यामुळे वातावरण अधिकच काळजीचे बनले. त्यामुळे गुरुवारी मुंबईचा माहोल भाऊबीज असूनही अगदीच वेगळा होता. अवघ्या मुंबापुरीने काळजीपोटी "अघोषित बंद' पुकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. त्यात सकाळीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुंबई दौरा रद्द केल्याचे व पाठोपाठ पोलिसांच्या सुट्याही रद्द झाल्याच्या बातम्या आल्या आणि अफवांचे पीक आले.

पण देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी बाळासाहेब औषधोपचाराला प्रतिसाद देत असल्याचे जाहीर करताच, "मातोश्री'वर जमलेल्या हजारो शिवसैनिकांचा नूरच पालटला आणि त्यांनी एकसाथ "गणपती बाप्पा मोरया!'चा गजर सुरू केला. "दवा आणि दुवा यांचा हा परिणाम आहे,' असे देसाई यांनी सांगितले.
त्यापूर्वी बुधवारी रात्रीपासूनच तेथे मोठ्या संख्येने केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्याच्या अन्य भागांतूनही बाळासाहेबांचे चाहते जमा होऊ लागले होते. पण त्यांना अधिकृत माहिती काहीच मिळत नव्हती, तरी नेहमीचा उफाळणारा शिवसैनिक स्तब्ध उभा राहून, मूकपणे "मातोश्री'कडे नजर लावून तासन्‌ तास उभा होता. त्यात महिलांची संख्या तर लक्षणीय होती. या चाहत्यांमध्ये मशिदीतील जपमाळ घेतलेले काही मुस्लिम आणि तुळशीच्या माळा घातलेली मराठी माणसेही प्रार्थना करताना दिसत होती. सगळेच वातावरण सद्‌गदित करणारेच होते. पण संध्याकाळनंतर वातावरण आशादायी बनले आणि सगळ्यांनीच बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडो, अशा प्रार्थना सुरू केल्या. मुंबई आणि राज्याच्या अन्य काही भागांतील "बंद'ही निवळत गेला आणि वातावरण सुरळीत होत गेले.

तत्पूर्वी, प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही बुधवारी मध्यरात्रीपासून वातावरणात तणाव होता; मात्र कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पहाटे दोन वाजता शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करीत शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. "मातोश्री'बाहेर येणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याने अथवा पदाधिकाऱ्याने बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगताच शिवसैनिक जल्लोष करत होते. "बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद'च्या घोषणा देत होते. त्यातही "एकच साहेब, बाळासाहेब' ही घोषणा अधिक लक्षवेधी ठरत होती.

"मातोश्री'वरून आलेल्या नेत्यांचा "बाईट' घेण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांची धावपळ सुरू होती; मात्र शिवसेनाप्रमुख "स्टेबल' एवढीच प्रतिक्रिया मिळत होती. कलानगरला गडकोटाचे स्वरूप आले होते. आत काय घडतेय, याची काळजी प्रत्येकालाच होती.

"मातोश्री'वर रीघ
राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, उद्योगपती राहुल बजाज, उद्योगपती वेणुगोपाल धूत, शिवसेना नेते मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, एकनाथ शिंदे, अनंत गिते, विनोद तावडे, हुसेन दलवाई, साबीर शेख, आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, गणेश नाईक, सरदार तारासिंग, बॉबी बिंद्रा, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, संजय दत्त, सलीम खान, सलमान खान, अरबाज खान, मधुर भांडारकर, महेश मांजरेकर, मनोजकुमार, राज बब्बर, रणधीर कपूर, हरिहरन, गोविंदा, विक्रम गोखले, रमेश देव, अजिंक्‍य देव, विनय आपटे यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी "मातोश्री'वर आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांची जातीने विचारपूस केल्यावर "उदो हो उदो! बाळासाहेब यातून बाहेर निघतील... त्यांना आई जगदंबेचा आशीर्वाद आहे....' अशी ग्वाही दिली.

ओबी व्हॅन फोडली
बुधवार संध्याकाळपासूनच "मातोश्री'च्या दिशेने शिवसैनिकांची पावले वळू लागली. त्यातच एका वृत्तवाहिनीने शिवसेनाप्रमुख अत्यव्यस्थ अशी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्या वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन फोडली. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे "मातोश्री' परिसरातील रस्त्यांवर चक्का-जाम झाला होता. गुरुवारी पहाटे अडीचनंतर येथील गर्दी ओसरू लागली.