"मातोश्री'समोर जनसागर लोटला
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, November 17, 2012 AT 05:11 PM (IST)
मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे, आपल्या अफलातून व्यंग्यचित्रांनी कधी फटकारे; तर कधी आधार देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (वय 86) नावाचा झंझावात काल दुपारी शांत झाला. वांद्य्रातील कलानगरमधील "मातोश्री' या आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अन् जमलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या अश्रूंचा बांध फुटला... गेली चार दशके महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून काढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांवर आज (ता. 18) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा आज (रविवारी) सकाळी साडेसात वाजता मातोश्री बंगल्यापासून निघणार असून, ती शिवाजी पार्क येथे जाईल. तिथे अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात येत असून, संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले. अवघ्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले आणि पाहता पाहता महाराष्ट्र जणू जागच्या जागी थांबला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा "ढाण्या वाघ' हरपल्याची भावना महाराष्ट्रात उमटली.
शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ढासळत असल्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यात दाखविलेल्या त्यांच्या चित्रफितीवरून स्पष्ट झाले होते. त्यांनी स्वत:च तसे बोलूनही दाखविले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. मंगळवार (ता. 13 नोव्हेंबर) रात्रीपासून ते अत्यवस्थच होते. मात्र, ते या दुखण्यातूनही बाहेर येतील, असा लाखो शिवसैनिकांचा आणि चाहत्यांचा दुर्दम्य आशावाद होता. पण, अखेर या नेत्याची प्राणज्योत दुपारी मालवली. त्या वेळी ठाकरे कुटुंबातील प्रत्येक जण, सर्व शिवसेना नेते तसेच त्यांच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून मुंबईतील उपनगरी रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. एसटी व बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात येण्याची शक्यता आहे. वाहतूक वगळता मुंबईतील अन्य व्यवहार उद्याही बंद राहण्याची शक्यता आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून काही लाख लोक येतील, हे लक्षात घेऊन पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढविला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान असतील.
गेली 45 वर्षे शिवसेनाप्रमुख समोर येताच, "आव्वाज कुणाचा, शिवसेनेचा...' अशा जोरदार घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांचा आवाज त्यांच्या निधनाच्या वृत्ताने फुटेनासा झाला. शिवसेनाप्रमुख आपल्यात राहिले नाहीत, हेच त्यांना सहन होत नव्हते. ज्याने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 50 वर्षे लढा दिला, असंख्य मराठी तरुणांना नोकऱ्या वा रोजगार मिळवून दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमान मिळवून दिला; तो नेता यापुढे पाहायला मिळणार नाही, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. "मातोश्री' या त्यांच्या निवासस्थाच्या आतील आणि बाहेरील वातावरण हेलावून टाकणारे होते. पुरुष, महिला, लहान मुले, तरुण, तरुणी रडताना पाहून त्यांना धीर देणारे नेतेही गलबलून जात होते.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची घोषणा होताच, तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांनाच नव्हे, तर अनेक वर्षे त्यांच्यासमवेत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही रडू कोसळले. रस्त्यावर असलेल्या शिवसैनिकांनी तर हंबरडाच फोडला. शिवसेनेच्या यानंतरच्या एकाही सभेत बाळासाहेब दिसणार नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकायला मिळणार नाही, याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें