कृष्ण कुंज'ची सुरक्षा होणार अधिक कडेकोट
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 01, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडेकोट होणार आहे. त्यांच्या "कृष्ण कुंज' निवासस्थानाच्या कम्पाऊंडच्या भिंतींची उंची वाढविण्याचे काम सध्या जोमाने चालू असून, प्रवेशद्वाराची रचनाही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
राज ठाकरे यांना यापूर्वीही काही वेळा धमकी आली होती. समाजवादी पक्षाचे मध्य प्रदेशमधील माजी आमदार समरिते यांनीही राज ठाकरे यांच्यासाठी एक कोटीची सुपारी दिली होती; तर काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय ब्राह्मण सभेनेही राज ठाकरे यांना थप्पड मारून दाखविणाऱ्यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. तत्पूर्वी मुंबईत मनसेने केलेल्या परप्रांतीयांच्या आंदोलनाच्या वेळी राज यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची मागणी मनसेच्या नवनिर्वाचित आमदारांनी वारंवार विधानसभेत केली होती. त्यानंतर राज यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा झाली होती. या व्यवस्थेमध्ये दोन कार्बाईनधारी पोलिस व एका पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळाल्यानंतर राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजी पार्क येथील कृष्ण कुंज इमारतीच्या सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्याची सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्यामुळे भिंतींच्या पलीकडचे सहज दिसते; पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भिंतींची उंची 12 फुटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सध्याच्या प्रवेशद्वाराची रचनाही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या साध्या गेटऐवजी उंच रेलिंगचे गेट बसविण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे बदल करण्यात आल्याचे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले