सकाळ वृत्तसेवा
Monday, December 07, 2009 AT 02:04 PM (IST)
नागपूर - अबू आझमी हा विषय संपलेला आहे असे सांगून मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी आझमीप्रकरण बंद करा अशी विनंती केली. विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते. अधिवेशन गाजविण्यासाठी मनसेचे आमदार अभ्यास करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
श्री. नांदगावकर म्हणाले, पत्रकार परिषद घेऊन आझमी हिरो बनायला निघाले आहेत. त्यांना सांगायचे तेवढे सांगितले गेले आहे. आता तो विषय बंद झाला आहे. तेच ते करण्यापेक्षा राज्यात जनतेचे इतरही प्रश्न आहेत ते मांडू. मनसे आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावर विरोधी पक्षांनी सहकार्याचे आश्वासन दिले. सभागृह यावर निर्णय घेईल तेव्हा त्यांच्याकडूनही अपेक्षा राहील. मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. पक्षाचे स्वत:चे अस्तित्व आहे. ते दाखविण्यासाठी पक्षाचे आमदार पूर्ण तयारीनिशी आले आहेत. नवीन टिमला अभ्यासासाठी विषय दिले आहेत. ते तयार होत आहे. सभागृहात याची झलक बघायला मिळेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
मुंबईतील अधिवेशनाप्रमाणे मनसेचे आमदार हे अधिवेशनही गाजवतील. सभागृहात आणि बाहेरही आक्रमक राहतील. सबंध राज्याचा पिण्याचा प्रश्न आहे. विदर्भातील प्रश्न आहे. महागाई आहे. स्थगन, लक्षवेधी आदी आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. केवळ आझमीत बुडून राहण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.