आघाडीशी व्यवहार 'धन'से नव्हे, 'मन'से
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 13, 2010 AT 12:00 AM (IST)
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेने कोणाला साथ दिली, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'कृष्णकुंज' येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला मतदान करण्यासाठी मनसेने व्यवहार केल्याचा आरोप राज यांनी या वेळी खोडून काढला. याबाबत शिवसेनेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, की गेल्या महिन्यात झालेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत डावखरे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार मागे का घेतला, उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी किती थैल्यांचा व्यवहार केला, असा थेट सवालही त्यांनी शिवसेनेला केला. स्वत:च्या चुकांमुळे उमेदवार पराभूत झाल्याने, मनसेच्या नावाने शिवसेनेचा थयथयाट सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेने नाक खुपसू नये!विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या मतांना शिवसेनेने गृहित धरले होते काय, या प्रश्नाला राज ठाकरे यांनी उत्तर दिले. माझा पक्ष आणि माझी भूमिका स्वतंत्र आहे. मी कुणाशीही बांधील नाही. विधान परिषदेतला समझोता मनसेच्या राजकीय संबंधांची नांदी नाही, असे ते म्हणाले. मराठी माणसाने मनसेला कामाची पावती दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेच्या राजकारणात विनाकारण नाक खुपसू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
आझमी प्रकरणी शिवसेना गप्प का?आजपर्यंत शिवसेनेने राजकुमार धूत, प्रीतिश नंदी, घनःशाम दुबे, चंद्रिका केनिया यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याचा दाखला देत, ही मंडळी शिवसैनिक होती काय, असा सवालही श्री. ठाकरे यांनी केला. अबू आझमी प्रकरणात विधानसभेत शिवसेना मूग गिळून गप्प का बसली, त्यांनी मनसेला पाठिंबा दिला का, असा सवाल करत, मनसेला कुणीही गृहित धरू नये, असा सल्ला राज ठाकरे यांनी इतरांना दिला.