गुरुवार, 10 जून 2010

'मनसे'चे आमदार सर्वाधिक चर्चेत

'मनसे'चे आमदार सर्वाधिक चर्चेत
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 11, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या 13 मतांनी अखेर निर्णायक भूमिका पार पाडली. तरीही या मौल्यवान मतांसाठी संबंधित उमेदवारांना मतदानाच्या अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली. मनसेच्या आमदारांसाठी सकाळपासून विधानभवन परिसरात क्‍लायमॅक्‍स तयार करून ठेवण्यात आला होता. प्रत्यक्ष त्यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावल्यामुळे मनसेचे आमदार आज पुन्हा एकदा चर्चेत आले.

'मनसे'च्या तेरा मतांसाठी सर्व पक्षांनी फिल्डिंग लावली होती. मनसेची मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पारड्यात पडली. प्रसिद्धिमाध्यमांनाही मनसेच्या आमदारांची सकाळपासून प्रतीक्षा होती. दुपारी एकच्या सुमारास मनसे आमदार काही वेळातच मतदानाला पोहोचतील असा निरोप आला, पण अर्धा तास उलटून गेल्यानंतरही ते न आल्यामुळे सर्वांची प्रतीक्षा वाढली. तेवढ्यात राज्यसभेचे अपक्ष उमेदवार कन्हय्यालाल गिडवानी यांनी अर्ज मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले, त्यामुळे गिडवानींच्या माघारीची मनसेचे आमदार वाट पाहत होते, अशी चर्चा विधानभवनात सुरू झाली. काही उमेदवारसुद्धा पत्रकारांनाही मनसेचे आमदार कधी येत आहेत, याची मोबाईलवरून विचारणा करीत होते.

मनसेच्या आमदारांची राजकीय व्यूहरचना यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दुपारी अडीचच्या सुमारास विधानभवन परिसरात पसरले. त्यामुळे सर्वांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. हे सुरू असतानाच मनसेचे आमदार मनोरा आमदार निवासात मिसळ खात बसले होते. अखेर सव्वातीनच्या सुमारास बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, राम कदम, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, वसंत गीते, रमेश वांजळे, हर्षवर्धन जाधव, उत्तमराव ढिकले, रमेश पाटील हे सर्व आमदार पोहोचताच जोरदार घोषणाबाजी झाली. त्यांना कॅमेराबद्ध करण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनी व छायाचित्रकारांनी प्रचंड गर्दी केली. अखेर साडेतीनच्या सुमारास सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सर्व चर्चांना विराम मिळाला व एक क्‍लायमॅक्‍स संपला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें