शुक्रवार, 25 जनवरी 2013

विधानसभेच्या 110 जागा "मनसे' जिंकणार

विधानसभेच्या 110 जागा "मनसे' जिंकणार

-
Friday, January 25, 2013 AT 01:15 AM (IST)
देवरूख- ""मनसेने राज्य सरकारची 35 कोटींची जागा वाचवली. त्याबदल्यात त्यांनी आम्हाला अटकेचे बक्षीस दिले. आता त्यांचे दिवस भरले आहेत. चालू विधानसभेत आमची संख्या 11 वर आली असली तरी येत्या विधानसभेत आम्ही हाच आकडा 110 नेणारच. त्यासाठी कार्यकर्त्यांनो जीवाचे रान करा आणि राजसाहेबांच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी सज्ज व्हा'', असे आवाहन "मनसे'चे ज्येष्ठ आमदार शिशिर शिंदे यांनी येथे केले.

संगमेश्‍वर तालुका "मनसे'च्या वतीने शहरातील माटे-भोजने सभागृहात आयोजित रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसेचे दादरचे आमदार नितीन सरदेसाई, पक्षाचे सरचिटणीस जयप्रकाश बाविसकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख संजय नाईक, कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिर्के, खेडच्या नगराध्यक्षा गौरी पुळेकर, उपनगराध्यक्ष किशोर चिखले, संगमेश्‍वरचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

खचाखच भरलेल्या सभागृहाचा जोश पाहून सुरवातीपासूनच शिंदे यांनी आक्रमक भाषण केले. गटबाजी करणे, एकमेकांच्या तंगड्या ओढणे ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मक्‍तेदारी आहे. ती त्यांच्याकडेच राहू दे. आपल्या कार्यकर्त्यांनी हे न करता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काम करा. मध्यंतरी आलेली मरगळ आज दूर झाली आहे, हेच अफाट उपस्थितीचे लक्षण आहे. जनतेच्या घरापर्यंत पोहचा,त्यांचे प्रश्‍न मांडा, ते सोडविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरा, प्रशासनाशी हुज्जत घाला, ही जनताच आपली शक्‍ती आणि संपत्ती असल्याचे प्रत्येकाने मनावर ठसवा. येत्या विधानसभेत आमदारांची सेंच्युरी मारण्यासाठीची सुरवात आपण देवरुखातून करत आहोत. मुंबईत परप्रांतीयांचे आक्रमण कळीचा मुद्दा बनला आहे.

कोकणातही आता केरळी घुसू लागले आहेत. त्यांची दादागिरी मोडून काढा आणि त्यांना कोकणातून कायमचे हाकलून द्या. कॉंग्रेसच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे दिल्लीतील बलात्कार प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या पक्षाचा चिटणीस दिग्विजय सिंग हा अतिरेक्‍यांना साहेब म्हणतो. अशांना चपलांचा मार द्या, प्रत्येकवेळी मारझोड, जाळपोळ करणे गरजेचे नाही. जनतेच्या मनात शिरून त्यांच्या मनात, घरात आपले पक्‍के स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.

सरचिटणीस जयप्रकाश बाविसकर यांनीही संपर्कप्रमुख संजय नाईक यांच्या कामाचे कौतुक करून यापूर्वी खेड झाले आता देवरूख नगरपंचायतीवर "मनसे'चा चौरंगी झेंडा फडकवायचाच असा निर्धार करण्याचे आवाहन केले. राज्याची आघाडी सरकारने पुरती वाट लावली आहे. त्यांची मान आता शरमेने खाली जाईल, असा देदिप्यमान विजय मिळवायचा असेल तर "मनसे'च्या प्रत्येक कार्यकर्त्याने आजपासून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनीही खेडनंतर देवरूख नगरपंचायतीवर "मनसे'चा झेंडा फडकून राज्यातील दुसरी नगरपंचायत "मनसे'कडे येण्याचा विक्रम घडणार असल्याचे आजच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाल्याचे सांगितले. यापुढे हलगर्जीपणा चालणार नाही तर प्रत्येकाने काम करा असा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा "मनसे'तर्फे खेडच्या नगराध्यक्ष गौरी पुळेकर, तसेच उपनगराध्यक्ष चिखले यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी परिश्रम घेणारे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमातंर्गत संगमेश्‍वर तालुक्‍यातील काटवली, विघ्रवली, सायले, चोरवणे, साखरपा भागातील तसेच लांजा तालुक्‍यातील शेकडो कार्यकर्त्यांनी "मनसे'त जाहीर प्रवेश केला. मेळाव्यानंतर संगमेश्‍वर-लांजा-राजापूर, संगमेश्‍वर-चिपळूण, संगमेश्‍वर-रत्नागिरी अशा तीन विधानसभा मतदारसंघाप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. मेळाव्याला जिल्हाभरातून सुमारे 3 हजार मनसैनिक उपस्थित होते