तुमच्या, आमच्या आणि त्यांच्या मनातलं!
प्रकाश अकोलकर
Thursday, July 26, 2012 AT 03:45 AM (IST)
आपल्या आजारी भावाचं सारथ्य करत राज ठाकरे त्याला "मातोश्री'वर घेऊन गेले आणि तर्क-वितर्कांना ऊत आला. पण प्रश्न "एक नंबर'चा आहे. तो सोडवायचा कसा, या लाखमोलाच्या प्रश्नाचं उत्तरही तितकंसं अवघड नाही.
"तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही!'
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हे पहिलं वाक्य उच्चारलं आणि अनेकांच्या मनातील सुप्त आकांक्षांना आशा-निराशेचे धुमारे फुटले. या अनेकांमध्ये मीडियावालेच फक्त होते, असं समजण्याचं कारण नाही. त्यात दोघा भावांनी खरोखरच एकत्र यावं, अशी मनापासूनची इच्छा असलेले अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक होते. तसंच राज यांना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राची सत्ता हाती येणं अशक्य आहे, अशी खात्री पटलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही होते. शिवाय, हे दोन्ही भाऊ खरोखरच एकत्र आले, तर त्यांच्या भाऊबंदकीनंतर सुरू झालेली आपली दुकानं बंद होतील, या भीतीनं पोटात गोळा आलेले दोन्ही बाजूंकडील दुकानदारही होते!
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे "लीलावती'तून बाहेर आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना आपल्या गाडीतून नेले.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण आलं, तेव्हा "आता मिळालीच आपल्याला "ती' हेडलाईन!' या भावनेनं अनेकांना उचंबळून आलं. खरं तर गेल्याच आठवड्यात मीडियातील एक मोठा समूह "ती' हेडलाइन सूचक पद्धतीनं करून मोकळा झाला होता. गेली सहा-सात वर्षं आपल्याच भावाशी जीव तोडून भांडणारा भाऊ, तोच भाऊ आजारी पडल्यावर त्याला भेटायला गेला आणि अनेक जाणकार मैदानात उतरले. आपल्या आजारी भावाचं सारथ्य करत राज ठाकरे त्याला "मातोश्री'वर घेऊन गेले. अवघा मीडिया या एका दृश्यामुळे गहिवरून गेला. दोन भावांचा एकत्र फोटो काढण्यासाठी गेली सात वर्षं वाट बघणाऱ्या तमाम फोटोग्राफरची हा अनुपम क्षण कॅमेराबद्ध करण्यासाठी झुंबड उडाली होती. अर्थात, काही सुज्ञांचा त्यास अपवाद होता आणि "जरा धीरानं घ्या...' असा सल्लाही ते इतरांना देत होते. पण त्यांच्याकडे हेटाळणीच्या नजरेनं बघितलं जात होतं आणि "यांना इतरांचं काही बरं झालेलंही बघवत नाही!' अशी बोटं मोडली जात होती.
गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी एकामागोमाग एक गुगली चेंडू टाकून, भले भले राजकीय विश्लेषक, टीव्हीवरले बोलघेवडे आणि शिवाय दोन्ही संघटनांतल्या सैनिकांनाही त्रिफळाचित केलं होतं. असाच आणखी एक धक्का त्यांनी या पत्रकार परिषदेत "जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही!' असं वाक्य उच्चारून दिला, तेव्हा टीव्हीवरून ही पत्रकार परिषद बघताना शेजारी बसलेले "शिवसेना' या चार अक्षरांनी आजही मोहरून जाणारे आणि संघटनेत पहिल्या दिवसापासून घाम गाळणारे एक माजी आमदार म्हणाले : "पण एकत्र आले, तर "नंबर वन' कोण?'
खरं तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि ते सर्वांनाच मान्य झालं असतं, तर आज या "भाऊबंदकी'च्या खेळातून रोजच्या रोज होणाऱ्या करमणुकीला आपण मुकलो नसतो का? त्यामुळेच "नंबर वन कोण?' या लाखमोलाच्या प्रश्नाचं उत्तर न देताही पुढे काय काय होऊ शकतं, याचा विचार करता येतो.
शिवसेना-भाजप युतीनं 1995 मध्ये सत्तेवर येताना मुंबईतील 34 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. आता मुंबईतील एकूण आमदारांची संख्या आहे 36 आणि त्यात "मनसे'चे आमदार आहेत सहा, भाजपचे आहेत पाच आणि शिवसेनेचे आहेत अवघे चार! नाशकातले तर तिन्ही आमदार मनसेचेच आहेत. विधानसभेच्या या निवडणुकीनंतर दोन-अडीच वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांत या चित्राचे रंग थोडेफार बदलले असले, तरी मूळ ढाचा कायम आहे. पुण्यासारख्या शहरातून मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आला आहे. याचा विचार भाजपनं केला आहे आणि त्यामुळेच पुढे काय करावं लागणार आहे, याची त्यांना खात्री आहे. त्याच वेळी आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी- राज ठाकरे यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आले खरे; पण त्यांनी जागा 140 पेक्षा अधिक लढवल्या होत्या. शिवाय, त्यांचे दोन आमदार -एक कन्नडचे हर्षवर्धन जाधव आणि खडकवासल्याचे (आता दिवंगत) रमेश वांजळे हे ज्या कोण्या पक्षातर्फे उभे राहिले असते, त्या पक्षातर्फे निवडूनच आले असते. या साऱ्याचा विचार राज ठाकरे यांनी केला असेलच. त्यामुळेच जे आपल्या मनात आहे, तेच राज ठाकरे यांच्याही मनात असू शकतंच!
पण प्रश्न "एक नंबर'चा आहे. तो सोडवायचा कसा, या लाखमोलाच्या प्रश्नाचं उत्तरही तितकसं अवघड नाही. दोन्ही भाऊ वेगळेच राहून "बिझिनेस वा प्रोफेशनल डील' करू शकतात आणि ते डील यदाकदाचित यशस्वी झालंच, तर पुढे काय करायचं तो निर्णय घ्यायची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोपवून मोकळं होण्याचा मार्ग उपलब्ध आहेच. त्यामुळेच भाजपचे काही जुने-जाणते कार्यकर्ते "बाळासाहेब फक्त शिवसेनेचे नेते थोडेच आहेत, ते तर महाराष्ट्राचे नेते आहेत!' अशी भाषा करू लागले आहेत.
त्यामुळेच "तुमच्या' मनात जे काही आहे, ते उद्धव वा राज यांच्या मनात येतच नसेल, असं त्या दोघांनी छातीठोकपणे सागितलं, तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार