शनिवार, 24 अक्टूबर 2015

'ध'चा 'मा' टाळण्यासाठी 'राज ठाकरे लाइव्ह'

मुंबई - परप्रांतीयांच्या विरोधात बोलताना राष्ट्रीयस्तरावर राज ठाकरे यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या भाषणांची विशेषतः इंग्रजी आणि हिंदी माध्यमांकडून होणारी तोडफोड टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन फंडा अमलात आणला आहे. यासाठी राज ठाकरे यांची भाषणे यूट्यूबवर लाइव्ह होण्यास सुरवात झाली असून, याचा लाभ प्रत्यक्ष सभेला उपस्थित न राहणाऱ्यांनाही होणार आहे. तसेच सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणारा भाजप एकमेव पक्ष असल्याचे भाजपचे नेते सांगत असले तरी सर्वप्रथम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या बाबतीत मनसेचे एक पाऊल पुढेच असल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी केला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. यामुळे त्यांच्यावर अनेकदा माध्यमांतून आणि राजकीयस्तरावरून टीका होत असल्याने माझ्या भाषणांचा अर्थ आणि माध्यमांनी केलेली मोडतोड यावर राज यांनी अनेकदा नाराजी व्यक्‍त केली होती. विशेषतः हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमे आपली प्रतिमा परप्रांतीयांच्या विरोधात निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हाच "ध चा मा‘ टाळण्यासाठी मनसेने राज ठाकरे यांची भाषणे यूट्यूबवर लाइव्ह करण्यास सुरवात केली आहे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल गुरुवारी डोंबिवली येथे झालेले पहिले भाषण यूट्यूबवर लाइव्ह करण्यात आले. त्यामुळे कोणतेही विधान, त्याची पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांचा बोलण्याचा हेतू याबाबत प्रसारमाध्यमांसह जनतेला उकल होण्यास मदत होणार असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.