गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या अर्ध्या
डझनाहून अधिक उमेदवारांच्या विजयात ज्यांनी हातभार लावला ती "महाराष्ट्र
नवनिर्माण सेना' यंदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की नाही, याबाबत
गेले काही दिवस सातत्याने उठणाऱ्या वावड्यांवर अखेर पडदा पडला आहे.
मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात सात उमेदवारांची घोषणा करून, राज ठाकरे
यांनी हा पडदा टाकला असला, तरी त्याच वेळी आपली आगामी खेळी नेमकी काय असेल,
याबाबतची जनतेच्या मनातील उत्सुकता कायम राहावी, याचीही दक्षता घेण्यात ते
यशस्वी झाले आहेत! त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या उमेदवारांची घोषणा
करतानाच, आपले खासदार हे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा
देतील, असेही जाहीर करून ते मोकळे झाले आहेत. केंद्रात भाजपला मदत, राज्यात
युतीला विरोध, असे अजब समीकरण मांडून ज्याला त्याला हवा तो अर्थ काढण्याची
सोय मनसेच्या घोषणेने करून ठेवली आहे. मनसेचे किती खासदार विजयी होतील, हा
प्रश्नच असला, तरीही यात एक गोम आहेच. मुंबई या आपल्या बालेकिल्ल्यात
भाजप उमेदवारांच्या विरोधात राज यांनी एकही नाव जाहीर केलेले नाही.
त्यांच्या सात उमेदवारांपैकी फक्त एकच उमेदवार पुण्यात भाजपविरोधात लढणार आहे! शिवाय, मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात आपले आणखी काही उमेदवार आपण येत्या दोन-चार दिवसांत जाहीर करू, असे त्यांनी सांगितल्यामुळे याबाबतची त्यांची खेळी त्यानंतरच स्पष्ट होऊ शकते. राज यांच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्न तर निर्माण झाले आहेतच; पण त्यामुळेच त्यांच्या मनात नेमके काय आहे, याबाबतही लोकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ शकते. मनसेचे खासदार मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार असतील, तर मग त्यांनी शिवसेना-तसेच भाजप यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे कारणच काय? मोदी पंतप्रधान व्हावेत, असा विचार राज यांनी आजच केलेला असणे शक्य नाही. मोदी आणि राज यांचा दोस्ताना जुना आहे. 2007 मध्ये गुजरातेत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी नरेंद्रभाईंना शुभेच्छा पोचवण्यासाठी राज यांनी शिशिर शिंदे यांना धाडले होते. शिवाय, गुजरातमधील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आपल्या "थिंक टॅंक'ला घेऊन मध्यंतरी राज जातीने गुजरातेत गेले होते आणि तेथे त्यांचे लाल गालिचा घालून स्वागतही झाले होते. तरीही दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यांनंतर भाजपच्या नेत्यांनी त्या टीकेचा खरपूस समाचार घेतल्यामुळे आधी भाजप आणि राज यांच्यात असलेल्या कमालीच्या "सौहार्द'पूर्ण संबंधांमध्ये बराच तणावही निर्माण झाला होता. मग आता नेमके असे काय घडले, की मोदी हेच पंतप्रधान व्हावेत, असे राज यांना अचानक वाटू लागले, या प्रश्नाचे उत्तर गेल्या पंधरवड्यात नितीन गडकरी यांनी मनसेने निवडणूक लढवू नये, यासाठी घेतलेल्या राज यांच्या भेटीत आहे काय? की ही विधानसभा निवडणुकीसाठी वेगळ्या समीकरणांची जुळवाजुळव आहे? या आणि अशाच अनेक प्रश्नांचा भूलभुलैया राज यांच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. मुळात, उद्धव आणि राज या दोघांच्या कट्टर शत्रुत्वामुळेच त्या दोघांबरोबरच भाजपचेही राजकारण पेंड खात आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. महायुतीत राज यांना सामावून घेण्यास भाजपमधील कोणाचाच विरोध नव्हता आणि केवळ उद्धव यांच्यामुळेच ते शक्य झालेले नाही, हेही आता गुपित राहिलेले नाही. खरे तर राज यांची गेल्या काही दिवसांत भलतीच कोंडी झालेली होती. एकीकडे उद्धव यांच्याशी असलेले हाडवैर आणि दुसरीकडे भाजपशी असलेली मैत्री, अशा पेचात ते सापडले होते. त्या वेळी शेकापचे जयंत पाटील आणि जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे यांनी त्यांची भेट घेतली आणि तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू करून दिली. त्यामुळे देशात गेले चार महिने लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागले असताना, स्वस्थचित्त राहिलेल्या राज यांच्या ताकदीचे महत्त्व अधोरेखित झाले. पण तिसऱ्या आघाडीच्या या चर्चेवर पुन्हा भाजप नेत्यांनी विधान परिषद निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्यासाठी राज यांची भेट घेऊन पाणी फिरवले, पण त्यामुळेच राज ठाकरे जोरात आले, ही बाबही नाकारण्याजोगी नाही. या पार्श्वभूमीवर अखेर राज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवारांचे धाबे काही प्रमाणात दणाणून गेले असणार, हे उघड आहे. पण आता मनसेचे बळ पाच वर्षांपूर्वीइतके राहिले आहे काय, याचा विचार साऱ्यांनीच करायला हवा. शिवाय, या वेळी जनतेपुढे आम आदमी पक्षाचाही पर्याय खुला आहेच. पण एक मात्र नक्की! राज मैदानात उतरल्यामुळे प्रचारात रंगत येणार आणि टीव्ही चॅनेलांचाही टीआरपी वाढणार, हेही नसे थोडके!