नाशिकला मनसेचाच महापौर
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, March 10, 2012 AT 03:15 AM (IST)
मुंबई - एका बाजूने दोर ढिला सोडला तरी दुसऱ्या बाजूने घट्ट पकडून ठेवत असल्याचा दाखला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच ऐन निवडणुकीत पक्षाबरोबर दगाबाजी करणाऱ्या गद्दारांना एप्रिलमध्ये साफसफाईची मोहीम राबवून धडा शिकविणार असल्याचा इशारा देत, या इशाऱ्याला एप्रिल फूल समजण्याची चूक करू नका, असेही त्यांनी या वेळी गद्दारांना खडसावले.
मनसेचा सहावा वर्धापनदिन आज षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह चित्रपट निर्माते महेश मांजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, आजच्या सभेला मीडियाला अपेक्षित खाऊ देणार नसल्याचे त्यांनी भाषण सुरू करताच जाहीर केले. सहा वर्षांपूर्वी पक्ष काढताना अनेकांनी अनेक सल्ले दिले. पक्ष काढल्यावर लवकर उठण्याचे सल्लेही देण्यात आले होते. पण सहा वर्षांतील मनसेच्या कामगिरीने सल्ला देणाऱ्यांची "झोपमोड' केल्याचा टोला राज यांनी लगाविला.
सहा वर्षांत 13 आमदार आणि शंभर नगरसेवक असा पल्ला पक्षाने गाठला आहे. पण मुंबई आणि ठाण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच गणिताची गडबड एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. जागा जिंकून देणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार आहे. पण निवडणुकीतील गद्दारी सहन करणार नाही. काही कार्यकर्त्यांनी पैशांचे व्यवहारही केले असल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. काही जणांनी मैत्री जपली, काही बेसावध राहिले, काहींनी विजय गृहीत धरला, ऐन निवडणुकीत असे वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार म्हणजे होणारच, असे राज यांनी बजाविले आहे. एप्रिलनंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून या निवडणुकीने मला काय शिकविले याचा दाखला या वेळी देणार असल्याचे ते म्हणाले.
2014 मध्ये चमत्कार पाच वर्षांत मुंबईतील 7 जागांच्या 28 जागा झाल्या आहेत. पाच वर्षांत सात वर्षांचा मुलगा 28 वर्षांचा झाला आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळणार, तेव्हा तेव्हा सत्ता काबीज करीत जाणार, असे सांगतानाच राज यांनी 2014 मध्ये चमत्कार घडणार म्हणजे घडणारच, असा आशावाद व्यक्त करून मनसे मोठ्या संख्येने जागा मिळविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
जॉर्ज ऑर्कझॅडन व्हा! सुरतवर पहिल्यांदा शिवाजी महाराज स्वारी करण्यासाठी गेले त्या वेळी तेथील मोगलांचा इनायत खान हा सरदार पळून सुरतच्या किल्ल्यावर जाऊन बसला होता. तर त्याउलट जॉर्ज ऑर्कझॅडन याने आपल्या मोजक्या सैनिकांसह शहरात गस्त घालून लढण्याची तयारी दर्शविली होती. काही कारणाने शिवाजी महाराजांनी सुरतवरून मोर्चा वळविला. त्यानंतर जॉर्जचा या महाबत खान या सरदाराने रत्नजडित तलवार देऊन सत्कार करण्याचा प्रयत्न केला. पण जॉर्जने स्वतःला मिळणाऱ्या तलवारीऐवजी आपल्या देशाला व्यापाराच्या करातून सवलत देण्याची मागणी केली. सदासर्वकाळ आपल्या देशाबद्दल विचार करणाऱ्या जॉर्जसारखे तुम्हीही सदैव पक्षाचाच विचार करणारे कार्यकर्ते व्हा, असे भावनिक आवाहन राज यांनी या वेळी केले