गुरुवार, 8 मार्च 2012

शिवसेनेने दाखवला राज यांना कात्रजचा घाट!

नाशिक महापौरपदाची निवडणूक लढवणार
विशेष प्रतिनिधी, मुंबई

altनाशिकच्या महापौरपदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखविला आहे. यामुळे नाशिकला मनसेचा महापौर बनविण्याचे राज यांचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेची ही भूमिका पाठीत खंजीर खुपसणारी असल्याचे संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.
ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घाम फोडल्यानंतर महापौरपदासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची मनधरणी सुरु केली. यातूनच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांनी थेट राज ठाकरे यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी जाऊन साकडे घातले. यानंतर ठाण्यात शिवसेनेला जनादेश असल्याची भूमिका घेत राज यांनी शिवसेनेला थेट पाठिंबा जाहीर केला. ठाण्यातही मनसेच्या पाठिंब्याचे स्वागत करताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जर मनसेने नाशिकमध्ये पाठिंबा मागितला तर शिवसेनाप्रमुखांशी बोलून विचार करू असे सांगितले होते. प्रत्यक्षात गुरुवारी नाशिकमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेऊन मनसेवर राजकीय मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
याबाबत नाशिकचे शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांना विचारले असता मनसेने आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत. त्यातच आठ अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला असून संख्याबळाचा विचार करताना आमचा महापौर येणार हे स्पष्ट असल्यामुळे शिवसेनेने अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले. जनादेशाचे काय, अशी विचारणा केली असता, ठाण्यात भाजपची नगरसेविका पळवली जाईपर्यंत मनसे गप्प होती. त्यानंतरही आम्हाला केवळ चार जागांची गरज असल्याचे माहीत असतानाही राज ठाकरे गप्प बसून होते. शेवटच्याक्षणी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मनसेचे ४० नगरसेवक असून बहुमतासाठी २२ नगरसेवकांची त्यांना गरज आहे. सेना-भाजप व अपक्षांची संख्या अधिक असल्यामुळे आम्ही महापौरपदासाठी दावा केल्याचे ते म्हणाले.
राज यांनी ठाण्यात पाठिंबा दिल्यानंतरही आता शिवसेनेने नाशिकमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें