राज ठाकरेंच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले!
सिद्धेश्वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, March 07, 2012 AT 03:45 AM (IST)
मुंबई - 'जनमताचा आदर करीत' ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वांत जास्त जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सशर्त पाठींबा देण्याच्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेने भाजपाचे कमळ फुलले आहे! राज यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणातील भविष्यकालीन समीकरणे बदलणार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना सत्तापालटासाठी संधी प्राप्त होईल, अशी आशा भाजप नेत्यांना वाटत आहे.
"याचसाठी केला होता अट्टाहास, मनसेशी मनोमिलन व्हावे' ही भाजपाची भूमिका असली तरी शिवसेना यात अडसर ठरत होती. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देण्यावरून भाजपचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विचारणा करण्यास गेले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी "सत्तेसाठी भलत्या सलत्या बिळात शिरू नका' असा सल्ला या नेत्यांना दिला होता. तरीही भाजपचे नेते हिरमुसले नव्हते. भाजपस शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर घरोबा कोणत्याही परिस्थितीत करायचा नव्हता आणि नाही. मात्र मनसेसोबत जेथे शक्य होईल तेथे संधान साधता आले तर आपल्या पथ्यावरच पडेल ही आशा भाजपच्या नेत्यांनी सोडली नव्हती. त्यांच्या या आशेला ठाण्यातील वातावरण आणि परिस्थितीने मदत केली. ठाण्यात शिवसेना क्रमांक एकवर असली तरी महापौर पदाचा जादूई आकडा पार करण्यासाठी सेनेला बाहेरच्या रसदीचा गरज होती. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या बरोबरचे "मधूर' संबंध वापरत महायुती-मनसेमधील मनोमिलनामधील अंतर "ठाणे पॅटर्न'च्या निमित्ताने कमी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे "राज ठाकरे यांची आजची भूमिका केवळ एक पाऊल पुढे येण्याची नसून ती झेप आहे', ही बोलकी प्रतिक्रीया भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली.
मनसेसोबत आघाडी करावी, हा भाजपश्रेष्ठींचा मनसूबा आता गुपित राहिलेला नाही, असे पक्षात बोलले जाते. शिवसेना-भाजपा-रिपाई-मनसे हा चतुष्कोन 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात सत्तापालटासाठी हमखास उपयोगी पडेल याची खात्री भाजपच्या नेत्यांना आहे. शिवसेना, भाजपा आणि मनसे या पक्षांनी आपली बलस्थाने, ताकद ओळखून आघाडीचा सामना केला तर त्याचा फायदा सर्वांनाचा होणार आहे. या अर्थाने हा चतुष्कोन होणे किती गरजेचे आहे, याचे व्यावहारीक गणितही या नेत्याने सांगितले. विधानसभेच्या सुमारे 100 जागांवर मनसेची मते प्रभाव पाडू शकतात. ही वस्तूस्थिती आमच्या जोडीदाराने जाणून घेतली तर "कार्याध्यक्षांना' महायुतीचा आताचा त्रिकोण हा चौकान करण्यात काहीही वावगे वाटणार नाही. तरच राज्यात आघाडी सरकारला आपण खाली खेचू शकतो, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें