शनिवार, 26 फ़रवरी 2011

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला मनसेची कुसुमाग्रज उद्यानात ‘चकाचक’ गांधीगिरी

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला मनसेची

कुसुमाग्रज उद्यानात ‘चकाचक’ गांधीगिरी
 नाशिक, २६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी दिनाच्या पाश्र्वभूमीवर, कविवर्य कुसुमाग्रज काव्य उद्यानात मनसेने स्वच्छता मोहीम राबवून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले. तसेच या उद्यानाच्या सौदर्यकरणासाठी मनसेचे विधानसभेतील उपगटनेते आ. वसंत गीते यांनी दहा लाख रूपयांचा निधी आमदार निधीतून उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षांनिमित्त, शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रजांच्या नाशकात नाशिक महापालिकेने निर्मिलेले उद्यान सध्या अत्यंत दुर्लक्षित आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठय़ा प्रमाणावर ढिग साचलेले होते. यामुळे मनसेने गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करून केरकचरा, मातीचे ढिग, पालापाचोळा साफ केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण उद्यान परिसरासह व कोनशिला पाण्याने धुवून काढण्यात आली.
 झाडांना पाणी देण्यात आले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे तसेच कोनशिलेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मनसेचे आ. गीते यांनी उद्यानासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून या कामाचे प्राकलन त्वरित काढण्याचे निर्देश पालिकेस दिले आहेत. याप्रसंगी अनील वाघ, समीर शेटे, संजय दंडगव्हाळ, नंदू वराडे आदी उपस्थित होते.
कुसुमाग्रज जन्मशताब्दी
पेठे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी सकाळी ९ वाजता वेळूंजे येथील आदिवासी भागातील आश्रमशाळेत तात्यासाहेबांच्या कविता वाचन, गीत गायन, कुसुमाग्रजांच्या आठवणी, आश्रमशाळेस कुसुमाग्रजांची पुस्तके भेट देणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रजांचे आदिवासी भागावर अधिक प्रेम असल्याने माजी विद्यार्थ्यांनी जन्मशताब्दीचा पहिला कार्यक्रम खास करून नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वेळुंजे आश्रमशाळेत आयोजित केला आहे.

गुरुवार, 24 फ़रवरी 2011

युतीमध्ये मनसे हा बालिशपणा - राज ठाकरे

युतीमध्ये मनसे हा बालिशपणा - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 25, 2011 AT 02:00 AM (IST)
 

मुंबई - भाजप व शिवसेनेच्या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश करण्याच्या गोपीनाथ मुंडे यांच्या मताशी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शविल्यानंतर राज ठाकरे यांनी मात्र हा बालिशपणा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नागपूर येथील एका खटल्यासाठी उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आज सायंकाळी विदर्भ एक्‍स्प्रेसने रवाना झाले. त्या वेळी प्रसिद्धिमाध्यमांनी गडकरी यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, "हा बालिशपणा आहे. कोणीतरी बाहेरून विधाने करायची व त्यावर आम्ही आमची भूमिका कशी काय ठरविणार? प्रत्येक गोष्टीला एक प्रक्रिया असते. त्यामुळे या विषयावर मला काही बोलायची गरज आहे, असे वाटत नाही. तसेच या युतीबाबत माझे कोणाशीही बोलणे झालेले नाही वा मला कोणीही भेटले नाही. त्यामुळे ही गोष्ट होऊ शकत नाही.'

उद्या सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पातील अपेक्षांसंदर्भात ते म्हणाले, "रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या कधीच पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? मुंबई व महाराष्ट्रात येणारे बोहरेचे लोंढे थांबवावेत, हीच आपली अपेक्षा आहे. या लोंढ्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडतो.'

मंगलवार, 22 फ़रवरी 2011

सचिनला एफएसआय नाकारणे ही दुर्दैवी बाब

सचिनला एफएसआय नाकारणे ही दुर्दैवी बाब
-
Wednesday, February 23, 2011 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई - महाराष्ट्राच्या मातीत दम आहे, पण जगविख्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्याच घरासाठी कायदेशीररीत्या मागितलेला फक्त 300 चौरसफुटांचा "एफएसआय' नाकारणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये दम नाही, अशी टीकेची झोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठविली. सचिनसारख्या सच्च्या क्रिकेटपटूला गुजरात व तामिळनाडू सरकारने स्वतःहून जागा दिली असती, पण महाराष्ट्र सरकारने त्याला "एफएसआय' नाकारणे ही अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट असल्याची खरमरीत टीकाही राज ठाकरे यांनी केली.

वांद्रे पश्‍चिम येथील हिल रोडवर सचिन बंगला बांधत असून त्या बंगल्यात त्याला स्वतंत्र जीम बांधायची आहे, त्यासाठी त्याला अतिरिक्त एफएसआयची गरज आहे. त्यासाठी सचिनने किमान 250 ते 300 चौ. फूट अतिरिक्त एफएसआय मिळावा यासाठी नगरविकास विभागाकडे अर्ज केला होता. पण सचिनला अतिरिक्त एफएसआय देण्यास नगरविकास विभागाने नकार दिल्याचे वृत्त वाचून आपणास अतिशय खंत वाटली, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरांमधील अनधिकृत झोपड्यांवर कोणीही कायद्याचा बडगा उगारीत नाही. सुमद्रकिनारीही बिनधास्तपणे बेकायदा बांधकामे केली जातात. असंख्य लोक "आदर्श'पणे एफएसआय ढापतात. पण सचिनसारख्या जगविख्यात खेळाडूला सरकार एफएसआय कशी नाकारू शकते, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. जर त्यांनी परवानगी न मागताच बांधकाम केले असते तर मग नगरविकास विभागाने काय नंतर तपासणी केली असती का, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या बाहेरून येथे येऊन अनधिकृतपणे झोपड्या बांधायच्या. कालांतराने या झोपड्या अधिकृत करून बाहेरच्या लोकांना अधिकृतपणे घर सरकार देऊ शकते. सचिन गुजरात किंवा तामिळनाडूसारख्या राज्यात जन्माला आला असता तर तेथील सरकारने सचिनला काय काय दिले असते. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच असलेल्या नगरविकास खात्याकडून एकही फाईल हलत नसताना नेमकी सचिनच्याच फाईलला या विभागाने कसा काय नकार दिला? मुख्यमंत्र्यांनी उलट ही फाईल स्वतःहून मागवून घेऊन त्यावर कार्यवाही करणे आवश्‍यक होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सर्वपक्षीय आवाहनया संदर्भात आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र देणार आहोत. पण सचिनसाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यावे व मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी आपण बोलणार आहोत, असेही राज यांनी नमूद केले.