मुंबई - नागरिकांनी टीका केली नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी
महागडे सूट शिवले असते, अशी टीका करीत मोदींना फक्त गुजरातबद्दल प्रेम आहे,
असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाणला. मुंबईतील गोरेगाव येथील
मनसेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक
ओबामा भारताच्या दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान मोदी यांनी स्वतःचे नाव
कोरलेला सूट परिधान केला होता. त्याची किंमत काही लाखांच्या घरात असल्याची
चर्चा झाली होती. त्याचा लिलाव करून मिळालेले कोट्यवधी रुपये गंगा नदीच्या
शुद्धीकरणासाठी देण्यात आले आहेत. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी आपल्या
शैलीत खरपूस टीका केली. चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान व्हावी यासाठी
लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मोदींच्या पदरात भरघोस मते टाकली. आता
मोदींच्या शाही सुटाची कथा ऐकताना याच नागरिकांच्या मनात काय घालमेल होत
असेल, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. चोहोबाजूंनी टीका झाली नसती तर
त्यांनी आणखी सूट शिवून त्यांचाही लिलाव केला असता, असा टोलाही त्यांनी
लगावला. सुटाच्या लिलावातून गंगा नदी कशी शुद्ध होणार, सूट केवढा आणि गंगा
केवढी, असे मिस्कीलपणे राज म्हणाले. सुटाचा लिलावही गुजरातमध्येच का केला,
अन्य राज्यात का नाही, असा सवाल करीत ते म्हणाले, यावरून मोदींचे प्रेम
फक्त गुजरातवर असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री असताना तुम्ही गुजरातचे
होतात, आता पंतप्रधान या नात्याने तुम्ही सर्व राज्यांवर समान प्रेम केले
पाहिजे, असे राज मोदींना उद्देशून म्हणाले.
निवडणुकीच्या आधी
टोलबंदीची आश्वासने देणारे शिवसेना-भाजपचे नेते सत्तेवर आल्यावर मूग गिळून
गप्प का बसले आहेत, असा सवाल राज यांनी केला.
Visit My Blog : Will Love you Forever
Visit My Blog : Will Love you Forever