नाशिकला उत्तम दर्जाचे शहर बनवू - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Friday, March 16, 2012 AT 01:15 AM (IST)
महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर मनसेच्या विजयात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे खास विमानाने नाशिकला आले होते. प्रथम मनसे मुख्यालयात भेट दिल्यानंतर श्री. ठाकरे थेट महापौरांच्या "रामायण' निवासस्थानी आले. रामायण येथे पोचताच कार्यकर्त्यांच्या अंगात जोश संचारला. मनसेच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. रामायण बंगल्यावरून ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वप्रथम त्यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले. नाशिककरांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शहरवासीयांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलू. नाशिकला उत्तम दर्जाचे शहर बनवून दाखवू. शिवसेनेच्या मनात काय आहे ते नाशिककरांनी पाहिले आहे. नागपूर महापालिकेत मुस्लिम लीगने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने थयथयाट केला नाही; परंतु भाजपने मनसेला पाठिंबा दिल्यानंतर झालेल्या थयथयाटावरून मनसेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना कोणत्या थराला गेली आहे, हे समोर आले आहे, असे ते म्हणाले.
आधी किल्ले सुधारा!
अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होणार नाही हा अंदाज मला यापूर्वीच होता. स्मारक बनविण्याआधी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे जतन करणे गरजेचे आहे. किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. तेथील बिकट अवस्थेमुळे शिवप्रेमीसुद्धा जात नाहीत. त्यामुळे शिवस्मारक बनविण्याआधी शासनाने किल्ल्यांची दुरवस्था थांबवावी, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
जकात खासगीकरणाचा मुद्दा गुलदस्त्यात
महापालिका निवडणुकीत मनसेने सत्ता आल्यास सर्वप्रथम जकात खासगीकरण रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. आज महापालिकेत मनसेचा महापौर झाल्यानंतर जकात खासगीकरण रद्द करणार का, या प्रश्नावर ठाकरे यांनी आजच माझ्या पोतडीतून सर्व काढून घेणार का, असा प्रतिप्रश्न करून जकात वसुलीच्या खासगीकरणाचा मुद्दा गुलदस्त्यात ठेवला आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें