शनिवार, 14 अगस्त 2010

मनसेच्या आंदोलनाला कलावंतांचा पाठिंबा

मनसेच्या आंदोलनाला कलावंतांचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 15, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई -  मल्टिप्लेक्‍सवाल्यांना धडा शिकविणे गरजेचे होते. त्याकरिता कुणी तरी पुढाकार घेणे आवश्‍यक होते. मनसेने असा पुढाकार घेतल्याबद्दल मराठी कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबई-महाराष्ट्रात राहून यांची दादागिरी खपवून घेता कामा नये... मराठी चित्रपट त्यांनी लावलेच पाहिजेत... अशी प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीत आज उमटली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मल्टिप्लेक्‍सविरोधात आंदोलन केले. याबाबत काही कलाकार तसेच दिग्दर्शक आणि निर्मात्या मंडळींना बोलते केले असता त्यांनीही मल्टिप्लेक्‍सवाल्यांचा धिक्कार केला. निर्मात्या कांचन अधिकारी म्हणाल्या, ""मनसेने योग्य पाऊल उचललेले आहे. आपला त्याला संपूर्ण पाठिंबा आहे; मात्र तोडफोड किंवा हिंसाचार होता कामा नये असे आपणास वाटते. माझ्या चित्रपटांसाठी काही मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी नकार दिला होता. सध्याचे मुख्यमंत्री यापूर्वी सांस्कृतिक मंत्री होते. त्यांच्या राज्यात अशा प्रकारे मराठी चित्रपटांवर अन्याय व्हावा ही लाजीरवाणी बाब आहे.''

अभिनेत्री आणि निर्मात्या किशोरी शहाणे-वीज यांचा "ऐका दाजिबा' हा चित्रपट कालपासून सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. त्यांनीदेखील मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या मनमानीपणावर आसूड ओढले. त्या म्हणाल्या, ""कुणी तरी पुढे होऊन हा विषय हाती घेणे आवश्‍यक होते. मनसेने ते काम केले आहे. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देणे आवश्‍यक आहे. कारण हे मल्टिप्लेक्‍सवाले वेळ देतील ती सकाळची असेल आणि त्या वेळी चित्रपट पाहण्यास कोणीही येणार नाही, त्यामुळे लेखी आश्‍वासन घेणे गरजेचे आहे.''

दिग्दर्शक सुभाष काळे म्हणाले, ""महाराष्ट्रात राहून मराठी चित्रपट लावा... मराठी चित्रपट लावा... अशी भीक का मागायची. त्यांनी स्वतःहून मराठी चित्रपट लावले पाहिजेत. आम्ही एकेका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो आणि मल्टिप्लेक्‍सवाल्यांसमोर हात पसरायचे? आज जे काही झाले (आंदोलन) ते योग्य आहे.''

अभिनेता संजय नार्वेकरने मनसेने केलेले आंदोलन योग्य आहे अशी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ""राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कारण मराठी चित्रपट किंवा मराठी भाषा याकरिता भीक मागता कामा नये. आपण महाराष्ट्रात राहतो. तेथे मराठीचा सन्मान झाला पाहिजे. मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी सन्मानाने मराठी चित्रपट लावले पाहिजेत.''

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें