मंगलवार, 8 फ़रवरी 2011

मुंडे यांनी उचलली की सुपारी!

मुंडे यांनी उचलली की सुपारी!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 08, 2011 AT 12:15 AM (IST)
 
मनसेला युतीमध्ये आणण्याची सुपारी गोपीनाथरावांनी उचलली असली, तरी अशी समीकरणे परिस्थितीतून येतात, हेही त्यांना नागपूरच्या चिंतन शिबिरात सांगितले जाईल.

गोपीनाथ मुंडे यांना जेव्हा मोठ्या आत्मविश्‍वासाने बोलायचे असते, तेव्हा ते केसांवर कंगवा तर फिरवतातच; पण चक्क इंग्रजीतून बोलायला लागतात. रविवारी औरंगाबादमध्ये पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत समारोपाचे भाषण करताना ते इंग्रजीत म्हणाले, "पॉलिटिक्‍समध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आणि इम्पॉसिबलला पॉसिबल करण्यासाठी गोपीनाथ मुंडेच पाहिजे असतील, तर त्याला कोण काय करणार?' अर्थात हे मुंडे यांचे इंग्रजी आहे आणि ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर जरा जास्तच वाढले आहे. मराठी माणसाचे राजकारण करण्यासाठी ते इंग्रजीत आत्मविश्‍वासाने बोलले ते "मनसे'संदर्भात. देश पातळीवर राहूनही त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मनसेमुळे युतीचा पराभव झाला. यापुढे तो टाळायचा असेल, तर मनसेला भाजप- शिवसेना युतीबरोबर घ्यायला पाहिजे. आता सर्वांच्याच दृष्टीने ही गोष्ट तूर्त तरी "इम्पॉसिबल' आहे. ठाकरे घराण्यातील मोठ्या पातीचे आणि धाकट्या पातीचे जुळणार काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. राज ठाकरे नुसते भाजपच्या कार्यालयात गेले, तरी मोठ्या पात्याने किती थयथयाट केला होता! आता मनसे जर युतीतच येणार म्हटल्यावर काय होईल? राजकारणात अशक्‍य काहीच असत नाही, हे जसे खरे तसे बऱ्याच वेळेला शक्‍यही असत नाही, हेही खरे आहे. भाजप राजकीय अस्पृश्‍यता पाळत नाही, असे अनेकदा सांगितले जाते; पण भाजपबाबतची अस्पृश्‍यता पाळणारे काही कमी नाहीत हेही खरे. गोपीनाथांना हे सारेच माहीत आहे; पण पक्षांतर्गत खुंटी बळकट करण्यासाठी ते अचाट शक्तीचे प्रयोग करायला तयार होतात. १९९६ मध्ये भाजपचे सरकार केंद्रात तेरा दिवसांसाठी सत्तेवर होते. बहुमताची प्रचंड अडचण होती. त्या वेळी गोपीनाथांचे राजकीय गुरू असलेले प्रमोद महाजन म्हणाले होते, की थैल्या खोलल्यावर पाठिंब्यासाठी लाइन लागेल. महाजन यांच्या निर्धाराला पाठिंबा देणारे गोपीनाथ तेव्हा उपमुख्यमंत्री होते. प्रत्यक्षात पाठिंब्यासाठी लाइन लागलीच नाही आणि शेवटी सरकार पडले. इम्पॉसिबलचे इम्पॉसिबलच राहिले. मनसेने युतीच्या मांडवात बॅंड लावूनच काय; पण गुपचूप येणे सहजशक्‍य नाही. भाजपने जरी ठरवले तरी उत्तर भारतात हिंदी मतांचे काय करायचे? मूठभर मतांसाठी सूपभर मते गमवायची काय, असा प्रश्‍न निर्माण झाला, तर स्वाभाविकच भाजप सुपाकडेच धाव घेईल. युतीच्या मंडपात जाण्यासाठी मनसे आपली स्वतःची भूमिका सोडून देण्याची शक्‍यता नाही. समजा अशक्‍याचे शक्‍य झाले आणि मनसेचे इंजिन भाजपच्या तंबूत शिट्टी वाजवत घुसलेच, तर धनुष्यबाणाचे काय होईल? हे सारे माहीत असूनही गोपीनाथांनी स्वतःच जाहीर करून सुपारी उचलली. त्यामागे उद्धव ठाकरे यांना अस्वस्थ करण्याचा हेतूही असतो, राजकीय गणितही असू शकते. कदाचित भाजपनेही त्यास मौनात जाऊन मान्यता दिली असेल.

गोपीनाथांना पक्षीय खेळात फार मोठे मैदान सध्या तरी उरलेले नाही. म्हणून की काय सचिनला कॅप्टन करू नका; पण टीममध्ये तरी घ्या, असे ते कधी वळणाने, तर कधी आडवळणाने सांगत आहेत. आपण सचिन आहोतच, हेही ते रेटून नेत आहेत. पण, राजकारणात कधी कधी धावा न काढणारी मंडळीही विजय मिळवून देत असतात. हेही गोपीनाथांना माहीत आहेच, तरीही ते मोठी आव्हाने स्वीकारायला तयार होत आहेत. युतीमध्ये इंजिनाला वाट करून देणे, हे त्यापैकी एक. मनसेचे आमदार निलंबित झाले तेव्हा नाथांचा म्हणजे गोपीनाथांचा धर्म कुठे होता, असा प्रश्‍न मनसेवाल्यांनी चटकन विचारून टाकला, तर अशक्‍य शक्‍य करण्यासाठी गोपीनाथांनीच आमच्या पक्षात यावे, असे शिवसेनावाले म्हणून गेले. राजकारणातील शक्‍य- अशक्‍यतेमधील अंतर बऱ्याच वेळा कोणा एका व्यक्तीची शक्ती नव्हे, तर त्या-त्या वेळची परिस्थिती कमी करत असते. जसे की, कॉंग्रेसने डाव्यांचा पाठिंबा घेऊन सरकार चालवणे, कर्नाटकात भाजप आणि देवेगौडा यांनी एकत्र येणे किंवा केंद्रात भाजपने बावीस पक्षांची मोट बांधणे किंवा महाराष्ट्रातील "पुलोद'चा प्रयोग. आता असेही सांगितले जाईल, की गोपीनाथ इतके महाशक्तिशाली आहेत, की तेच परिस्थिती निर्माण करतील आणि बुद्धिबळाच्या पटावर स्वतःला हवी तशी सोंगटी मांडतील. या अशा पटावर प्यादेही राजाला मारू शकते, हेही त्यांना कळते, तरीही अशक्‍याचे रूपांतर शक्‍यतेमध्ये करण्यासाठी आपल्याशिवाय कोण आहे, असा एक चकवा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. कुणी सांगावे शक्‍य- अशक्‍यतेच्या या भानगडीवरच नागपूरच्या शाळेत भाजप एखादे चिंतन शिबिर भरवेल. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायला सांगून त्यांना ते ऐकवले जाईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें