राज ठाकरे यांनी 'राजनीती' पाहिला !
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 23, 2010 AT 12:30 AM (IST)
लातूर - न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (ता. 21) रात्री येथील पीव्हीआर चित्रपटगृहात पत्रकारांसह "राजनीती' हा चित्रपट पाहिला. "राजकारणातील भाऊबंदकी'वर हा चित्रपट आधारित आहे.
उमरगा येथील न्यायालयात हजर राहिल्यावर श्री. ठाकरे सोमवारी दुपारी येथे आले होते. दुपारी पत्रकारांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी दिवसभर चर्चा केली. रात्री त्यांचा येथेच मुक्काम होता. दुसरा कोणताही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे त्यांनी रात्री "राजनीती' चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांना निरोप देऊन बोलावून घेतले. तीन तास पत्रकार व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी "राजनीती' चित्रपट पाहिला. सत्ता, खुर्चीसाठी भाऊ भावाचा नसतो या थीमवर हा चित्रपट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर कार्यकर्त्यात याच विषयाची चर्चा होती. पीव्हीआरच्या वतीने सिनेमा मॅनेजर पवनसिंग, चित्तरंजन मलिक, विलास दाभाडे, विष्णू कुलकर्णी, इरफान शेख, अनिल कुलकर्णी, लक्ष्मीकांत शिंदे यांनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले. श्री. ठाकरे चित्रपट पाहणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. चित्रपटगृहातही अनेक पोलिस तैनात होते. श्री. ठाकरे यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था वेगळीच होती. चित्रपट संपल्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे श्री. ठाकरे पहिल्यांदा चित्रपटगृहाबाहेर जातील, त्यानंतर प्रेक्षकांनी जावे, असे सांगण्यात आले होते; पण श्री. ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रेक्षकांना बाहेर जाऊ दिले व नंतर ते पत्रकारांशी बोलत चित्रपटगृहाबाहेर पडले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें