सोमवार, 12 जून 2017

सरकारच्या निर्णयाचे स्वागत - राज ठाकरे


मुंबई - सधन शेतकऱ्यांना वगळून सरसकट कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करीत आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरीही कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
आम्हाला "कर्जमाफी' हा शब्द मान्य नाही; मात्र शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही. आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित आहे, असे ठाकरे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. राज्य सरकारने त्यांच्या निर्णयाचा तपशील जाहीर करावा. यापुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या निर्णयाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. जिथे जिथे अन्याय होताना दिसेल तिथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

शुक्रवार, 2 जून 2017

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास मॅरेथॉन बैठक


मुंबई:  राज्यातील शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री चार तास झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या बैठकीनंतर कऱण्यात आला.
अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,   शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि  शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, ही समिती 31 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहेत.
तसंच दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. किंमतीबाबत 20 जूनपर्यंत  निर्णय होईल.
आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सरकार आर्थिक मदत करणार.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकरी संप आणि शेतकरी मागण्यांवर सुमारे चार तास चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे. अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीवर कार्यवाही केली जाईल.या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल “.
याशिवाय शेतकऱ्यांना  हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. त्यासाठी पावसाळी अधिवेशनात कायदा करण्यात येईल. शेतमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी राज्य कृषिमूल्य आयोग स्थापन करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
 • हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येणार आहे.
 • राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.
 • दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचार
 • वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार
 • थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय
 • शीतगृह साखळी निर्माण करणार
 • नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार
 • शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये : राज ठाकरे

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये : राज ठाकरे
मुंबई : शेतकऱ्यांचा राग समजू शकतो. जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये. त्या संपातही मालकांना त्रास झाला नाही, कामगारांना झाला, तसं शेतकऱ्यांसोबत होऊ नये, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाविषयी मनसेची भूमिका मांडली. शेतकरी संपाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारकडे पैसे नाहीत, आता म्हणतात कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
”शेतकरी आंदोलनाचा आणि पक्षाचा काय संबंध?”
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाशी जोडून मोकळं होऊ नका, ते मांडतात तो विषय योग्य की अयोग्य एवढं फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. शेतकरी संपात काही पक्षांचा सहभाग असून ते हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
शेतकरी संपात पक्षाचा सहभाग असला तरी त्यांचा प्रश्न योग्य की अयोग्य ते ठरवून त्यावर निर्णय घ्या. आपल्याकडे फक्त प्रश्न तयार होतात. त्याचं उत्तर मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले, त्याचं पुढे काय झालं? असंही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेवर हल्लाबोल
शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रश्नाविषयी राग किंवा चिड दिसत नाही. ते सध्या कुठे आहेत, तेच दिसत नाही. त्यांना जे काही खाती दिलेली आहेत. त्यातच ते व्यस्त आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेचाही समाचार घेतला.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
 • जवान आणि किसान दोघेही मरतायेत, भाजपवाले मात्र खुशाल – राज ठाकरे
 • योजनांना गोंडस नावं देऊन सरकार भुलवतंय – राज ठाकरे
 • निवडणुकीआधी घोषणा, सत्तेत आल्यानंतर घोषणा, पैसे आहेत का यांच्याकडे? – राज ठाकरे
 • अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर करावं, पण प्रश्न सोडवावा, ते महत्त्वाचं आहे – राज ठाकरे
 • शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा, शेतकऱ्यांसोबत कायमच आहे – राज ठाकरे
 • मराठा आरक्षणासाठीही मोर्चे निघाले, पुढे काय झालं?, आपल्याकडे तोडगे निघत नाहीत – राज ठाकरे
 • शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाचं लेबल का लावताय? – राज ठाकरे
 • सरकारकडून शेतकरी आणि जनतेची फसवणूक – राज ठाकरे
 • हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे – राज ठाकरे
 • सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? – राज ठाकरे
 • शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये – राज ठाकरे

गुरुवार, 18 मई 2017

...तर मनसे सुरक्षा देईल

मुंबई- डोंबिवलीत निर्माण झालेल्या फेरीवाल्यांच्या समस्येवर शिवसेना आक्रमक झाल्यानंतर मनसेनेही मुंबईत हा मुद्दा उचलून धरला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच मनसेच्या माजी नगरसेवकांनी घेराव घालत ही कारवाई त्वरित आणि कडक करावी अशी मागणी केली आहे. परंतु जर पोलीस संरक्षणाच्या नावाखाली ही कारवाई करता येत नसेल तर, मनसैनिक महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहील, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मनसे घेईल, असा शब्द माजी नगरसेवकांनी दिला आहे.
दादर-माहीममधील नागरिकांना होत असलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा त्रास लक्षात घेत मनसेच्या माजी नगरसेवकांनी महापालिका उपायुक्त आनंद वाग्राळकर यांना गुरुवारी सकाळी घेराव घातला. एफ दक्षिण विभागाच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. आनंद वाग्राळकर हे कधीही सामान्य नागरिकांना भेटत नाहीत. तसेच या विभागातील फेरीवाल्यांवरही ते कडक कारवाई करत नाहीत, असा आरोप करत उपयुक्तांना धडा शिकवण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी, सुधीर जाधव आणि विरेंद्र तांडेल यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आनंद वाग्राळकर यांना भेटण्यास गेले होते. यावेळी त्यांनी आनंद वाग्राळकर यांना घेराव घातला. वाग्राळकर यांनी आवश्यक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात धडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मनसेच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले.
मात्र ही कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा या माजी नगरसेवकांनी दिला. महापालिकेकडे अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा यंत्रणा नसल्यास मनसेच्या वतीने ती उपलब्ध करून देण्याची तयारीही धुरी यांनी दर्शवली.

बुधवार, 17 मई 2017

रामदेवबाबा राज ठाकरेंच्या भेटीला; अमितला योगाचे धडे

मुंबई - योगगुरू रामदेवबाबा यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी भेट वैयक्तिक असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी रामदेवबाबांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रामदेवबाबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.
पतंजली या आपल्या ब्रँडमुळे नावारूपाला आलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना ते योगाचे धडे देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अमित ठाकरे हे आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे राज ठाकरे देखील पक्ष पातळीवर जास्त कार्यरत नव्हते. तसेच उपचारासाठी राज अमितला घेऊन परदेशी गेले होते.

सोमवार, 24 अप्रैल 2017

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 'ठाकरे' हवेच !

राजकारणात फार रोखठोक भूमिका घेऊन चालत नाही. थोडा थंडा करके खाओ ! असे बोलले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्पष्ट आणि रोखठोक विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. 'पोटात एक आणि ओठात ऐक' हे त्यांना आयुष्यभर जमले नाही. जे नाही पटत ते बोलून मोकळे होत असत. परिणामाची चिंता ते कधी करीत बसले नाहीत. त्यांच्या ज्वलंत विचाराने राज्यात एक पिढी भारावून गेली. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार कदापि पुसले जाणार नाहीत. प्र. के. अत्रे काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, त्यांची या ना त्या कारणाने आठवण होत असते. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने अनेकांना घायाळ केले.
मराठी माणूस हा शिवसेनेचा आत्मा आहे हे बाळासाहेब अखेरपर्यंत सांगत राहिले. मराठी माणसाच्या मुद्यावर त्यांनी कदापी तडजोड केली नाही. हिंदुत्व वैगेरे नंतर आले. मराठी माणूस हीच शिवसेनेची ताकद होती आणि आज माहीत नाही. 
बाळासाहेबांच्या रोखठोकपणाची आज अचानक आठवण आली ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे. महापालिका निवडणुकीत मनसेने सपाटून मार खाल्यानंतर या पक्षाने मुंबईत चिंतन बैठक घेतली. या बैठकीत थोडी गरमागरम चर्चा झाल्याची वार्ता कानोकानी पसरली. पराजयाचे खापर नेत्यांनी राज यांच्यावर फोडल्याचे तर माझा विचार लोकांपर्यंत पोचविण्यात नेते अपुरे पडल्याचे राज यांचे म्हणणे होते. पराजयानंतर टीकेचे धनी प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला व्हावे लागते. त्यामध्ये तसे काही नवीन नाही.
राजकारणाच्या रणांगणात उतरल्यानंतर कोणी एक जिंकणार आणि कोणी तरी पराभूत होणार हे आलेच. पराभव झाला म्हणून कोणी संपत नाही. तो फिनिक्‍स पक्षाप्रमाणे उसळी घेऊ शकतो. आपण इंदिरा गांधीचे नेहमीच याबाबतीत उदाहरण देत असतो. आणीबाणीत धूळदाण उडूनही त्या पुन्हा सत्तेवर आल्या. या रणरागिनीच्या मनात जिद्द आणि पराजय पचविण्याची हिंमत होती. इंदिरा गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पराजय पचविण्याची हिम्मत प्रत्येक नेत्याने ठेवली पाहिजे. 
देशात आज मोदींची लाट आहे. या लाटेविरोधात दोन हात पुढे करण्याची हिंमतही विरोधकांनी दाखवायला हवी. नुसतीच टीका करण्यापेक्षा जो नेता रस्त्यावर उतरेल. जो लढेल तोच हिरो होईल. मोदींविरोधात वातावरण निर्मिती करण्याची तयारी ठेवा. मात्र त्यासाठी आपण आणि आपले चारित्र्य स्वच्छ असायला हवे. सरकारने तुम्हाला ईडीची भीती दाखवता कामा नये. 'कर नाही तर डर कशाला' असे म्हणणारे नेते हवेत. मला वाटते ती हिम्मत पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यात नक्कीच आहे. स्पष्ट आणि स्वच्छ विचार न डगमगता मांडायला हवेत. भाजप काय पुढील शंभरवर्षे सत्तेवर राहण्यासाठी जन्माला आला आहे का ? याचा विचार करायला हवा. 
अंतर्गत राजकारण काही असो. त्यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नेते नाराज आहेत. पक्षाचे काय करायचे आणि कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय तो पक्ष घेईल.
राजगडावरील बैठकीत राज ठाकरे यांना त्यांच्या नेत्यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वांनाच बरोबर घेण्याविषयी सांगितले. त्यावर राज यांनी मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. लोकांनी मला मते दिली नाहीत तरी चालेल असे स्पष्टपणे सांगितले ही स्वागतार्ह बाब आहे. शेवटी कुठेतरी पक्षाची ध्येयधोरणे असतातच ना! मराठीचा मुद्दा घेऊन जो पक्ष जन्माला आला त्या मुद्यालाच तिलांजली कशी देऊन चालेल! मताच्या लाचारीसाठी तडजोड करण्याचे कारणच काय हा प्रश्‍न उतरतोच. आज जागतिकीकरणात मराठीचा मुद्दा चालणार नाही असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला ती हिंदूत्वाकडे वळली. एकाचवेळी मराठी आणि हिंदूही अशी भूमिका घेऊन ती पुढे चालली आहे. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसं सोडली तर इतर प्रांतातील किती हिंदूंनी शिवसेनेला मते दिली हा ही संशोधनाचा भाग आहे. आज आपण काही म्हटले तरी अर्धीच मुंबई मराठी माणसाची आणि अर्धी परप्रांतीयांची आहे हे मान्य करावेच लागेल. मराठीचा मुद्दा सोडायचा नाही ही राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. मराठी माणसाला कोणी तरी वाली हवाच. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 'ठाकरे' हवेच अशी प्रत्येक मराठी माणसाची भूमिका असायला हवी. मग तो पक्ष मनसे असेल की शिवसेना?

शुक्रवार, 21 अप्रैल 2017

मनसेतील असंतोषाचा स्फोट?

मुंबई : तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पडझड अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते. 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. राज्यात अलीकडेच झालेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही मनसेची धुळदाण उडाली. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी गुरुवारी (ता.20) झालेल्या बैठकीत राज यांच्याच कार्यद्धतीवर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याची चर्चा आहे. 
पक्ष संघटना वाढवण्यासाठी राज घरातून बाहेर पडत नाहीत. पदाधिकाऱ्यांना कोणताही कार्यक्रम दिला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसाठी सत्तेतील शिवसेनेने राज्य सरकारला घाम फोडला असताना मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात नेतृत्वाला अपयश आले, असे आरोप या नेत्यांनी केल्याची चर्चा आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज ट्‌विट केले असून त्यांना पक्षातील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही राज यांच्याकडे त्यांच्या कार्यपद्धीबाबत नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते. 
मध्यंतरी शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉईंटचा विषय गाजला होता. त्यामागे राज यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीची पार्श्‍वभूमी असल्याचे समजते. पक्षासाठी आपण काम करणार नसाल तर मीही करणार नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्‍त करून देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट रद्द केला होता. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी भाजपसह शिवसेनेतही चढाओढ सुरू होती. 
मनसेने केलेली नाशिकमधील विकासकामे, तसेच अन्य ठिकाणच्या कामांना भेट देण्यासाठी राज ठाकरे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांना सोबत घेऊन फिरत असल्याची बाबही मनसे नेत्यांना खटकली असल्याची चर्चा दुसऱ्या फळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.