मंगलवार, 7 मई 2013

शाहरूख खान दहशतवादी नाही - राज ठाकरे

शाहरूख खान दहशतवादी नाही - राज ठाकरे
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2013 - 04:13 PM IST


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलकता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानच्या वानखेडे मैदानावरील प्रवेशाबाबत पाठराखण करत, शाहरूख खान हा दहशतवादी किंवा गुन्हेगार नाही की ज्यामुळे त्याला मैदानावर जाण्यापासून रोखले जात असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले, ''शाहरूखला आज रात्री होणाऱ्या सामन्यासाठी वानखेडे मैदानावर मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) प्रवेश दिला पाहिजे. त्याने मागील वर्षी घडलेल्या घटनेबाबत सार्वजनिकरित्या माफी मागितलेली आहे. त्यामुळे त्याला माफ करण्यात यावे आणि मैदानात प्रवेश देण्यात यावा.''

शाहरूख खानवर एमसीएकडून वानखेडे मैदानावर प्रवेशासाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. आज रात्री मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये वानखेडेवर सामना होणार आहे. या सामन्याला उपस्थित राहण्यासाठी शाहरूख परवानगी देण्यात यावी, अशी प्रदेश काँग्रेसनेही मागणी केली आहे. मात्र, एमसीएचा त्याला विरोध आहे.

रविवार, 5 मई 2013

राज-गिरीश भेट; 'मनसे' कोडे कोण उलगडणार?

राज-गिरीश भेट; 'मनसे' कोडे कोण उलगडणार?
- कैलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2013 - 02:00 AM IST


जळगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नव्या पिढीचा राजकारणी आणि उमदे नेते, अशीच व्याख्या केली जाते. राजकीय जीवनात ते प्रत्येक पाऊल अत्यंत विचाराने टाकतात. अगदी उगाच करावी म्हणून ते कोणावरही टीका करीत नाहीत. कोणालाही भेटीअगोदर किंवा कोणाचीही भेट घेण्याअगोदर ते त्यांची संपूर्ण माहिती घेतात. माणूस कामाचा आहे असे वाटले तर त्याला वेळ देतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांतर्फे सांगितले जाते. आजच्या जळगाव दौऱ्यात त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी बराच वेळ चर्चा केली. त्यामुळे ही भेट राजकारणाच्या नवीन समीकरणाची नांदी ठरेल काय? अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दु:खाच्या समयी "दारावर' भेटण्यास आल्यास त्यात राजकारण करू नये, त्याबाबत विचारही करू नये, असे म्हटले जाते. त्यामुळे राज ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्या केवळ भेटीचा अन्वयार्थ लावला जाऊ शकत नाही. तरीही औरंगाबाद ते मुक्ताईनगर मार्गात जामनेर लागले, तेथे आमदार गिरीश महाजन यांचे निवासस्थान आहे म्हणून राज ठाकरे हे आमदार महाजन यांना भेटावयास गेले, असे सहज होऊ शकते का? असा विचार केला तर राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या बाबतीत असा विचार होऊच शकत नाही. दोन्ही ठाकरे बंधू सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर फिरत आहेत. राज ठाकरे यांनी जळगाव येथे जाहीर सभा घेऊन महाराष्ट्र दौरा संपविला; परंतु या संपूर्ण दौऱ्यात ते कोणालाही उगाच भेटलेले नाहीत. काही ठिकाणी तर इतर पक्षांच्या भेटावयास आलेल्या नेत्यांचीही भेट नाकारल्याचे वृत्त आहे. मग ते आज जामनेर येथे आमदार महाजन यांच्या निवासस्थानी स्वत: गेले. बराच वेळ थांबले. यामागे कारण "राजकीय' निश्‍चित आहे.
आमदार महाजन हे सध्या भाजपमध्ये नाराजच आहेत. आज त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपद आहे. दोन वर्षांपूर्वी जळगाव येथे भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्या वेळी आमदार महाजन हे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. गिरीश महाजन की सुधीर मुनगंटीवार अशी स्पर्धा होती. त्या वेळी प्रदेशाध्यक्षपदी मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले. आमदार महाजन यांनी जळगावात कार्यक्रम आहे, आपण यजमान आहोत याचे भान ठेवून मुनगंटीवार यांच्या निवडीचे स्वागत केले. त्यानंतर दोन वर्षांनी अशी कोणती किमया घडली की महाजन यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून एकदम मागे पडले? या वेळी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही घेण्यात आले नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत पक्षाच्या प्रदेशस्तरावर आमदार महाजन यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना आणि मनसे एकत्रीकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या समन्वयातूनच राज्यात नाशिक महापालिकेत प्रथम भाजप, शिवसेना आणि मनसेची युती झाली. याशिवाय, जळगाव जिल्हा परिषदेत भाजप- शिवसेना युतीतही वाद झाला होता. मात्र, त्यांनी समझौता घडवून आणला आणि पुन्हा युतीची सत्ता आली. शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते आमदार सुरेशदादा जैन यांचे जिल्हा भाजपशी फारशी पटत नाही; परंतु आमदार महाजन यांच्याशी मात्र त्यांची घट्ट मैत्री आहे. अटकेनंतर आमदार जैन यांची त्यांनी अनेक वेळा भेटही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात युतीचे "नाते' काहीअंशी जुळवून ठेवले आहे. आमदार महाजन यांनी पक्षासाठी प्रत्येक वेळी कार्य केले. प्रदेशस्तरावरून त्यांच्या कामाची दखल घेतली गेली नाही. भाजपमध्ये राष्ट्रीयस्तरावर नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात वाद असल्याचे गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. राज्यात मुंडे गट जोरात आहे. त्यातही आमदार महाजन हे "गडकरी गटा'चे मानले जातात. 

त्यामुळे आमदार महाजन यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून मागे पाडण्यात आले. या वेळी तर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही घेण्यात आले नाही. प्रदेशाध्यक्षपद हे एकमेव कारणच नसले, तरी जिल्ह्यातील अंतर्गत वाद यामुळे त्यांची पक्षात नाराजीच आहे. यातच नुकत्याच झालेल्या जामनेर महापालिका निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला आणि आमदार महाजन यांची पालिकेवरची पकड निसटली. मात्र, यामागेही आमदार महाजन यांची "नाराजी'ची खेळी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी अद्याप तरी उघडपणे कुठेही जाहीर केली नाही. पक्षातील लहान कार्यकर्त्यांपासून तर राज्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्याबाबतची माहिती आहे. शिवसेनेचे नेते आमदार रामदास कदम यांनी नुकतेच शिवसेनेत होणारी "घुसमट' जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्याप्रमाणेच आमदार महाजन हेही पक्षातील नाराजीचा केव्हा तरी "स्फोट' करण्याची शक्‍यता आहे. मात्र, ते वेळ शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचेही सांगितले जात आहे.
आमदार महाजन यांची भाजपमध्ये होत असलेल्या अंतर्गत घुसमटीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांची प्रदीर्घ झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राज्यात सत्तेवर यायचे असेल, राज्यातील प्रत्येक भागावर आपले प्रभुत्व असले पाहिजे, याची चांगली जाण राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे पक्षबांधणीसाठी राज्यात ते अशाच उमद्या शिलेदाराच्या शोधात आहेत. खानदेशात गिरीश महाजन यांच्यासारखा शिलेदार मिळाल्यास पक्षाला निश्‍चित बळकटी येईल, याचा त्यांना विश्‍वास आहे.
जळगाव येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी केवळ एका "चिठ्ठी'वर कोणतेही न केलेले "राजकीय भाष्य' आणि आजच्या दौऱ्यात आमदार महाजन यांची घेतलेली प्रदीर्घ भेट याचे काही "नाते' निश्‍चित नसावे, असे मानले तरीही राज ठाकरे हे कुणालाही उगाच भेटत नाहीत, हेसुद्धा विसरून चालणार नाही. मात्र, ठाकरे- महाजन भेटीचे "राज' केव्हातरी "मनसे' उघड होईलच ना! त्यामुळे आपण एवढेच म्हणू शकतो, "भाई, आगे- आगे देखो होता है क्‍या?'



OTHER VIDEO



Watch Marathi Movies बालक पालक

राज ठाकरे आले अन्‌ छावणी पाहून गेले!

फुलंब्री- फर्शी फाटा येथे मनसेतर्फे उभारण्यात आलेल्या जनावरांच्या छावणीस राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 5) भेट दिली. राज ठाकरे येणार असल्याने सर्व स्तरांतील लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

राज ठाकरे नेहमीच्या स्टाईलने वाहनातून उतरले. चारा छावणीपासून 15 ते 20 फूट अंतरावर उभे राहून त्यांनी जनावरांची पाहणी केली. ते येथे जवळपास 15 मिनिटे थांबले. राज यांच्यासाठी छावणी हा नवा विषय होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे बरेच प्रतिनिधी होते; मात्र कोणतेही आवाहन न करता अथवा छावणीबाबत काहीही न सांगता राज निघून गेले.

पुरणपोळी थाळीतच!
राज ठाकरे भेट देण्यासाठी येणार म्हणून छावणीच्या प्रथम रांगेत गाय-वासरू व दुभत्या गाई बांधल्या होत्या. या जनावरांना राज यांच्या हाताने पुरणपोळी भरवायची होती म्हणून दोन-तीन कार्यकर्ते थाळीमध्ये पुरणपोळी घेऊन उभे होते.
त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर राज म्हणाले, "हे काय आहे?' तेव्हा कार्यकर्त्यांनी पुरणपोळी आपल्या हाताने गोमातांना भरवायची आहे, असे सांगितले. तेव्हा राज म्हणाले, "तूच खा आणि बाजूला हो.' लगेच पुरणपोळीवाले बाजूला सरकले. राज निघून गेले. पुरणपोळी थाळीतच राहिली. नंतर इतर कार्यकर्त्यांनी पुरणपोळ्या जनावरांना भरविल्या.


OTHER VIDEO