शनिवार, 19 नवंबर 2011

उमेदवारीसाठी परीक्षा द्यावी लागणार - राज

उमेदवारीसाठी परीक्षा द्यावी लागणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 19, 2011 AT 04:02 PM (IST)
ठाणे - येत्या काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोणताच उमेदवार निश्चित नाही. निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिका-यांचा मेळावा षण्णमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, महापालिका आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाला लेखी परीक्षा द्यावीच लागणार आहे. मला सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर परीक्षा द्यावी लागेल. येत्या ४ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकांसाठी राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी ही लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवडणुकीसाठी कोणचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी या भ्रमात राहू नये. लेखी परीक्षेत पास झालेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती मी स्वतः घेईन आणि निवडणुकीचे तिकीट देईन, असे राज यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकांच्या उमेदवार निश्चितीसाठी राज्याच्या विविध भागात येत्या ४ डिसेंबरला सकाळी ११ ते साडे बारा या वेळात मनसे पदाधिका-यांच्या लेखी परीक्षा पार पडणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचे फॉर्म वाटप होणार असून, २२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत भरलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्जासाठी १ हजार रूपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक परीक्षार्थी इच्छुकाला हॉल तिकीट देण्यात येईल आणि परीक्षेत पास झाल्याशिवाय मुलाखतीला बोलावणार नाही. एखाद्या वॉर्डात एकही योग्य उमेदवार सापडला नाही तर तो वॉर्ड ऑप्शनला टाकेन. त्याठिकाणी मनसे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा राज यांनी केली.

राज ठाकरेंची आज षण्मुखानंदमध्ये राजकीय आतषबाजी

राज ठाकरेंची आज षण्मुखानंदमध्ये राजकीय आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 19, 2011 AT 01:00 AM (IST)

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 18) माहीममधील कोळी महोत्सवात राजकीय टीका-टिप्पणी टाळली. पण उद्या (ता. 19) षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात राजकीय आतषबाजी होण्याचे संकेत त्यांनी दिले.

मनसे आमदार नितीन सरदेसाई यांनी माहीम कॉजवे येथे आयोजित केलेल्या कोळी महोत्सवाचे आज राज ठाकरे यांनी उद्‌घाटन केले. यावेळी जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी या अभिनेत्यांसह आमदार बाळा नांदगावकर, शिक्षक सेनेचे संजय चित्रे आदी उपस्थित होते. या भूमिपुत्रांच्या महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत, असे राज यांनी सांगितले. या खाद्यमहोत्सवात राज यांच्यासह त्यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशीही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या.

सोमवार, 14 नवंबर 2011

गांधी कुटुंबामुळेच उत्तर प्रदेश मागासलेला - राज

गांधी कुटुंबामुळेच उत्तर प्रदेश मागासलेला - राज सकाळ वृत्तसेवा Tuesday, November 15, 2011 AT 01:00 AM (IST) मुंबई - उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ गांधी कुटुंब आणि कॉंग्रेसनेच सत्ता उपभोगली आहे. त्यांच्यामुळेच तेथील विकास थांबला आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशातील लोकांना महाराष्ट्रात जाऊन भीक न मागण्याचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधी यांना समज नाही, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. उत्तर प्रदेशातील लोकांनी महाराष्ट्रात जाऊन भीक मागू नये, असा सल्ला कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज दिला. या वक्तव्याचा खरपूस समाचार आज सायंकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला. महाराष्ट्राबाबत टीकाटिप्पणी करणाऱ्या अशा नेत्यांना आम्ही भीक घालत नाही आणि यापुढेही भीक घालणार नाही, असे त्यांनी सुनावले. उत्तर प्रदेशातून निवडून येऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी 17 वर्षे, इंदिरा गांधी यांनी 15 वर्षे आणि राजीव गांधी यांनी पाच वर्षे पंतप्रधानपद भोगले आहे. तेथूनच संजय गांधी लोकसभेवर गेले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधीही त्याच राज्यातून निवडून येतात. गांधी कुटुंबाला सातत्याने विजयी करणाऱ्या उत्तर प्रदेशात विकास झालाच नसल्याने तेथील लोकांना स्थलांतर करावे लागते. हे गांधी कुटुंबाचे अपयश आहे, असे टीकास्त्र राज यांनी सोडले. या विषयावर अधिक माहिती पाहिजे असल्यास राहुल यांची महाराष्ट्रात फुकटची शिकवणी घेण्यास आपण तयार आहोत, असे राज म्हणाले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राहुल गांधींच्या सल्ल्याचा कॉंग्रेसला फटका बसेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. मराठी माणसापासून रोजगाराच्या संधी लपवण्यात आल्या. आताही रेल्वेभरतीसाठी तब्बल साडेपाच लाख युवकांनी अर्ज दाखल केले आहेत. यापुढे नोकऱ्यांच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांतून दिल्याच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत होतो. अफजल गुरूला माफ करण्याचा प्रयत्न ओमर अब्दुला करतात. पण त्यांच्यावर कोणीही टीका करत नाही. असा प्रकार जर महाराष्ट्रात घडला असता, तर सर्व देश तुटून पडला असता, असा शेरा राज यांनी मारला