शनिवार, 14 जनवरी 2012

मनसेचे लक्ष्य : 'त्या' 50 जागा

मनसेचे लक्ष्य : 'त्या' 50 जागा
विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 14, 2012 AT 04:00 AM (IST)


मुंबई - देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि आघाडीचे राजकारण रंगात आले असताना मनसेने मात्र कुणाच्याही कुबड्या न घेता "प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक वॉर्ड जिंकायचाच', असा निर्धार करत शड्डू ठोकले आहेत. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाच्या 50 जागा मिळवणे, हेच मनसेचे "टार्गेट' आहे.

महापालिकेच्या 2007 मधील निवडणुकीत 50 मतदारसंघांत मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या वॉर्डांत मनसेने चांगलेच आव्हान उभे केले होते. या निवडणुकीसाठी मनसे अधिक ताकदीने तयारीला लागली आहे. गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांतील समीकरणे बदलली होती. काही प्रभागांत मनसे उमेदवारांना भरभरून मते मिळाली होती. त्यापैकी अनेक ठिकाणी शिवसेनेची पिछेहाट झाल्याचे आढळले आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन मनसेने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एक प्रभाग जिंकायचाच, अशी रणनीती आखल्याचे समजते. त्यासाठी प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, राम कदम, नितीन सरदेसाई या आमदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबईत मनसेचे शिरीश चोगले, जितू नागवेकर, सुप्रिया पवार, परमेश्‍वर कदम, शैला लांडे, प्रकाश पाटणकर, राजेंद्र लाड आणि आमदार झालेले मंगेश सांगळे असे सात नगरसेवक आहेत. या जागा पुन्हा मनसेला मिळाव्यात, यासाठी मनसे ताकद लावणार आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या अन्य 50 मतदारसंघांतील उमेदवारांना कडवे आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

व्यूहरचनेला अनुभवाचा आधार सर्व मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केल्यास मराठी मतांचा मोठा टक्का असलेल्या महत्त्वाच्या जागा थोड्या मतांसाठी हातातून निसटतात, हा गेल्या निवडणुकीतील अनुभव गाठीशी आहे. त्या आधारावरच या निवडणुकीची व्यूहरचना आखल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. चेंबूर, घाटकोपर, भांडुप मुलुंड, माहीम, विलेपार्ले, कांदिवली, चारकोप, दादर, परळ, साकीनाका, शिवाजी पार्क, वरळी बीडीडी चाळी, सातरस्ता, वरळी डेरी, शिवडी, माझगाव डॉक, लिबर्टी गार्डन आदी मराठी भाषकांचे प्राबल्य असलेल्या भागांत मनसे मोठा रसदपुरवठा करणार असल्याचे सांगण्यात आले

नागपूर नव्हे, मनसेच्या 'रडार'वर मुंबई!

नागपूर नव्हे, मनसेच्या 'रडार'वर मुंबई!
-
Saturday, January 14, 2012 AT 04:15 AM (IST)
 

नागपूर - मनसेच्या रडारवर सध्या नागपूर महापालिका नाही. या महापालिकेतील विरोधी बाक बळकट करू, असे वक्‍तव्य पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी केले. अमरावती येथील कार्यकर्ता संमेलन संपवून नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मनसेचे "टारगेट' मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या चार महापालिका आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरसाठी एकूण 96 जणांची यादी पक्षाकडे आल्याची माहितीही दिली.

श्री. नांदगावकर म्हणाले, मनसे राज्यातील सर्व महापालिका व जिल्हापरिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद निवडणूक आधी घेऊन बुचकळ्यात टाकले. मात्र, नगरपालिका निवडणुकीत राज्यात 70 नगरसेवक आल्याने कार्यकर्ते एकलव्याप्रमाणे काम करीत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीतही यश मिळेल. मात्र, महापालिकात मोठे यश मिळेल. राज्यातील चार महापालिकेत सत्ता येईल. मुंबईत तर 70 जागांपेक्षा जास्त जिंकू. नाशिक व ठाण्यातही चांगले वातावरण आहे. पुण्यातही पक्ष सत्तेत बसेल. अमरावती व अकोला येथे महापालिकेसंदर्भात चांगले वातावरण आहे. संमेलनातील गर्दीवरून हे स्पष्ट झाले. माजी आमदार ज्ञानेश्‍वर धाने पाटील यांच्याकडे पक्षाने अमरावतीची जबाबदारी दिली आहे. तीन टर्म आमदार राहिलेल्यांनी पक्षात प्रवेश घेतल्याने मनसेची ताकद वाढली आहे.

खुद्द राज ठाकरे या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. परीक्षेतील गुण, त्यांच्या वैयक्‍तिक डाटा, निरीक्षकांचा अहवाल यावेळी त्यांच्यापुढे असेल. त्यामुळे मेरिटच्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल. काही इच्छुक अपरिहार्य कारणामुळे लेखी परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांनाही पुन्हा परीक्षेची संधी दिली गेली. त्यांच्याही वैयक्‍तिक मुलाखत घेतली जाणार असल्याचे श्री. नांदगावकर यांनी सांगितले. हेमंत गडकरी, प्रवीण बरडे यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीत कुस्ती, सत्तेसाठी दोस्ती! आमच्याकडे नामदेव, रामदास, सोपानदेव नाही. आम्ही एकला चलो रे आहे. युती करून कार्यकर्त्यांना भांडीच धुवायला लावायची नाहीत. शिवसेना हळूहळू स्वत:च रिकामी होत आहे. त्यांची युती व आघाडीचा फायदा मनसेला होईल. त्यांनी स्वतंत्रपणे लढून दाखवावे, असे आव्हानही श्री. नांदगावकर यांनी दिले.

बुधवार, 11 जनवरी 2012

शांतता... राज "मास्तर' परीक्षा घेत आहेत...

शांतता... राज "मास्तर' परीक्षा घेत आहेत...
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 11, 2012 AT 02:00 AM (IST)
पुणे - ना वाद्यांचा दणदणाट ना घोषणाबाजी ना कार्यकर्ते ...ना झेंडे ना वाहनांचा लवाजमा... फक्त शांतता...नियोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांची लगबग अन्‌ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा तणाव... असे चित्र विधी महाविद्यालय रस्ता येथील "राज महाल' येथे दिसत होते. त्याला कारण ही तसेच होते, मनसेचे राज "मास्तर' महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तोंडी परीक्षा घेत होते..

राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीचे "रणशिंग' फुंकल्यानंतर सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या, काही पक्षांनी मुलाखतीचे कार्यक्रम जाहीर केले. मुलाखतीच्या ठिकाणी वाजत गाजत, घोषणा देत, पक्षाचे झेंडे फडकावित इच्छुक उमेदवार दाखल होत असतात असे चित्र नेहमीच दिसते. मनसेच्या "अंतिम' परीक्षेत मात्र, या सर्व प्रकारांना फाटा दिल्याचे दिसले. विधी महाविद्यालय रस्ता येथे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे "राज महाल' हे निवासस्थान आहे. या ठिकाणी पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतींना मंगळवारी प्रारंभ झाला, सलग तीन दिवस हा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राज"मास्तरां'नी आपल्या कार्यकर्त्यांची तोंडी परीक्षा घेण्यास सुरवात केली. निवासस्थानाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपात एक एक इच्छुक उमेदवार दाखल होत होते. प्रत्येकाने सांगितलेल्या वेळीच यावे, असे निरोप दिले गेले होते. कोणीही शक्तिप्रदर्शन करू नये, बरोबर कार्यकर्ते, पक्षाचे झेंडे, वाहने आणू नयेत, अशा सूचना पक्षाने दिल्या होत्या. त्याचे पालन इच्छुक उमेदवारांनी केले. हातात कार्य अहवाल घेऊन दाखल होणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर "अंतिम ' परीक्षेचा तणाव दिसत होता. पक्षाचे प्रमुखच मुलाखत घेणार असल्याचे दडपण त्यांच्या मनावर होते, यातून विद्यमान नगरसेवकही सुटले नाहीत. तोंडी परीक्षेला येणाऱ्याचा कार्य अहवाल, लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका- गुण याची माहिती राज"मास्तरां'ना देण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येकाचा अहवाल, गुण पाहून राज"मास्तर' तोंडी परीक्षा घेत होते.

दुपारी एकपर्यंत पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुपारी तीन वाजता मुलाखतीचा दुसरा टप्पा सुरू झाला. मधल्या "सुट्टी'त मुलाखतीच्या नियोजनात गुंतलेल्या कार्यकर्त्यांनी पुढील वेळापत्रकानुसार इच्छुकांच्या मोबाईलवर संपर्क साधून मुलाखतीचा निरोप दिला. सायंकाळपर्यंत दोनशे जणांच्या मुलाखती पार पडल्या

सोमवार, 9 जनवरी 2012

एकदा एकहाती संधी द्या - राज ठाकरे

प्रतिनिधी , मुंबई
altगेल्या ५० वर्षांत राजकारण्यांनी महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान केले आहे. एकदा मला संधी द्या. अपयशी झालो तर पन्नास-पंचावन्न वर्षे फुकट गेली म्हणून समजा. माझ्याकडे सर्व गोष्टींचा ‘तोड’ गा आहे. माझे इंजिन केवळ आत्मविश्वासावर धावत आहे. एकदा एकहाती संधी देऊन तर पाहा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. लोकमान्य सेवा संघ श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये संजय मोने आणि प्रशांत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ही मुलाखत ऐकण्यासाठी लोकसेवा संघाच्या मैदानात प्रचंड गर्दी जमा झाली होती.
गेल्या पन्नास वर्षांमध्ये महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. मिळतील तेवढे पैसे ओरबाडण्याचे काम चालू आहे. मुंबई सुधारण्याचे सर्व तोडगे माझ्याकडे आहेत. प्रथम तुम्ही तोडगा तर स्वीकारा, असे ते म्हणाले.
पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या परीक्षांसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पालिकेत निवडून जाणारे नगरसेवक सक्षम असले पाहिजेत म्हणून हा खटाटोप केला. नगरसेवक, आमदारांची आणि खासदारांची कर्तव्ये काय आहेत, हे सर्वाना माहीत असायला हवे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हिंदू मिलची जागा मिळावी, याकरिता गोंधळ सुरू आहे. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे उपस्थित होतात. आणि निवडणुका पार पडल्या की त्यांचे विस्मरण होते, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील नेते देशाचा विचार करतात, तर इतर प्रांतांतील नेते आपापल्या प्रांतांचा विचार करतात. त्यामुळे आता आपण सर्वानी महाराष्ट्राचा विचार करण्याची वेळ आली आहे. बेळगाव प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, वर्षांतून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी, तसा हा प्रश्न हाताळला जात आहे. बेळगाव-निपाणीसारखी आदी शहरे महाराष्ट्रात आली तर त्याने काय फरक पडणार आहे, तिथली २५ लाख माणसे इथे आली तर पस्तावतील. येथे रामराज्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.
असामान्य व्यक्तींनी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागू नये. एक कलाकार म्हणून अमिताभ बच्चन यांनी देशाच्या सीमाही ओलांडल्या. प्रांताची भाषा त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले. पेडर रोडचा पूल होऊ नये, यासाठी तेथील रहिवासी लतादीदी आणि आशा यांना पुढे करीत आहेत, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र श्रोत्यांच्या साक्षीने रेखाटले. तत्पूर्वी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांना गेल्या काही वर्षांमध्ये मी पाहिलेले नाही. त्यावर एका मुलाखतकाराने सांगितले की, मग तुमच्या हृदयातील बाळासाहेब साकारा, या प्रतिप्रश्नामुळे भावूक झालेल्या  राज ठाकरे यांनी मार्कर घेऊन कॅनवासवर शिवसेनाप्रमुखांचे व्यंगचित्र रेखाटले.

मनसे मुंबईत सर्व जागा लढवणार

मनसे मुंबईत सर्व जागा लढवणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 10, 2012 AT 03:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे 227 जागा लढवण्याचे निश्‍चित केले असून, त्यांच्या उमेदवारांची यादी 20 जानेवारीला जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या यादीमध्ये मनसेच्या परीक्षेला न बसणाऱ्यांचीही नावे असतील, असे दिसते. ठाण्यामध्ये मात्र मनसे सर्व जागा लढवणार नाही, असेही कळते. तेथील काही प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणे गरजेचेच नाही, असे मनसेला वाटत आहे.

मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये आपली नेमकी किती ताकद आहे, हे अजमावून पाहण्यासाठीच मनसेने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याचे दिसते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि दुसरीकडे शिवसेना, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन महायुती यांच्या लढतीमध्ये काही प्रभागांत आपला उमेदवार पक्षाची ताकद नसतानाही निवडून येण्याची शक्‍यता मनसेच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मोजक्‍याच जागा लढवण्याऐवजी सर्व जागांवर उमेदवार उभे करावेत, अशा निष्कर्षावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले असल्याचे कळते. मतांचे विभाजन होण्याचा फायदा कुठेही होणे शक्‍य आहे. त्यामुळे सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे एका मनसे नेत्याने सांगितले.

मनसेने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचे ठरवतानाच "केवळ परीक्षा देणाऱ्यांनाच उमेदवारी' ही अट मात्र काढून टाकण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. एखादा इच्छुक परीक्षेत उत्तीर्ण झाला असेल; पण त्याची निवडून येण्याची क्षमताच नसेल, तर काय उपयोग, असा सवाल मनसेचे नेतेच करीत आहेत. तसे त्यांनी राज ठाकरे यांनाही सांगितले आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता पाहूनच मनसे आपले उमेदवार नक्‍की करेल, असे दिसते. परिणामी, परीक्षेला न बसलेले अनेक उमेदवार मनसेच्या यादीत दिसले, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. अर्थात "परीक्षेला बसलेले आणि उत्तीर्ण झालेले बरेच उमेदवार आमच्या यादीत असतील,' असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

ठाण्यामध्ये मात्र मनसे 100 हून कमी उमेदवार उभे करेल, असे कळते. तेथील काही प्रभागांतून आपला उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता नसेल आणि चांगले उमेदवारच मिळत नसतील, तर उगाच सर्व जागा लढवण्याचा हट्ट धरणे मनसेला उचित वाटत नाही, असे सांगण्यात आले.

- राज ठाकरेच करणार यादी निश्‍चित
- परीक्षा न दिलेल्यांनाही उमेदवारीची शक्‍यता
- परीक्षा हीच एकमेव अट नव्हती
- निवडून येण्याच्या पात्रतेवर भर