शुक्रवार, 21 अप्रैल 2017

मनसेतील असंतोषाचा स्फोट?

मुंबई : तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पडझड अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते. 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. राज्यात अलीकडेच झालेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही मनसेची धुळदाण उडाली. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी गुरुवारी (ता.20) झालेल्या बैठकीत राज यांच्याच कार्यद्धतीवर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याची चर्चा आहे. 
पक्ष संघटना वाढवण्यासाठी राज घरातून बाहेर पडत नाहीत. पदाधिकाऱ्यांना कोणताही कार्यक्रम दिला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसाठी सत्तेतील शिवसेनेने राज्य सरकारला घाम फोडला असताना मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात नेतृत्वाला अपयश आले, असे आरोप या नेत्यांनी केल्याची चर्चा आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज ट्‌विट केले असून त्यांना पक्षातील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही राज यांच्याकडे त्यांच्या कार्यपद्धीबाबत नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते. 
मध्यंतरी शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉईंटचा विषय गाजला होता. त्यामागे राज यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीची पार्श्‍वभूमी असल्याचे समजते. पक्षासाठी आपण काम करणार नसाल तर मीही करणार नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्‍त करून देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट रद्द केला होता. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी भाजपसह शिवसेनेतही चढाओढ सुरू होती. 
मनसेने केलेली नाशिकमधील विकासकामे, तसेच अन्य ठिकाणच्या कामांना भेट देण्यासाठी राज ठाकरे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांना सोबत घेऊन फिरत असल्याची बाबही मनसे नेत्यांना खटकली असल्याची चर्चा दुसऱ्या फळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.

तुम्ही माझी भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात कमी पडलात - राज ठाकरे

मुंबई - महापालिका निवडणुकींचा माहोल पार पाडल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पराभवाचे, चुकांचे चिंतन करण्यासाठी बैठक पार पडली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
मी मांडलेली भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यात तुम्ही कमी पडलात, असा ठपका राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आल्याचे कळते, तर उमेदवार निवडीच्या प्रक्रियेबाबत पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविल्याचे कळते. राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज' या निवासस्थानी गुरुवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची बैठक बोलवण्यात आली होती. सुमारे दोन तास ही बैठक चालली. महापालिकेतल्या पराभवाबाबत नेते, सरचिटणीस यांनी पहिल्यांदाच राज यांच्यासमोर त्यांची परखड मते मांडल्याचे कळते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर तुमच्याकडून पक्षाची भूमिकाच येत नाही, असे मत मांडल्याचे कळते.
त्यावर राज ठाकरे यांनी मी भूमिका मांडतो; पण तुम्हीच माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोचवायला कमी पडत आहात, असे सांगितल्याचे कळते. पक्षाच्या कार्यकर्त्यांची आता भावना आहे, आता आपण मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ केले पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी मी मराठीचा मुद्दा असा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नकोत, असे सांगितल्याचे कळते. निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरविताना राबवण्यात आलेल्या काही प्रक्रियांवरही नेत्यांनी आक्षेप नोंदवल्याचे कळते. दरम्यान, निवडणुकीतील पराभवाला पक्षात जबाबदार कोण याबाबत या बैठकीत काहीच स्पष्टता झाली नसल्याचे कळते. पक्षात आता अध्यक्ष, नेते, सरचिटणीस आणि कार्यकर्ते असे सरळ तीन गट पडल्याचेही बैठकीतून पुढे आले आहे.