गुरुवार, 14 सितंबर 2017

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज ठाकरेंचं शाळा-महाविद्यालयांना पत्र

मुंबई : गुरुग्राम येथील सात वर्षीय प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूलच्या देशभरातील शाखा पालकांच्या निशाण्यावर आल्या. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनेकदा निष्काळजीपणा झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करु नये, असं आवाहन केलं आहे.
देशाचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचं लैंगिक शोषण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या घटनांमुळे मान शरमेने खाली गेली आहे. शिवाय या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सरकार याबाबतीत गंभीर दिसत नाही, त्यामुळे मी स्वतः पत्र लिहून संवाद साधत आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
शैक्षणिक संस्थांचे सुरक्षिततेविषयीची कारणं वेगवेगळी असू शकतात. मात्र कोणतंही कारण न देता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण करावेत. यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील ती अग्रक्रमाने उचलावीत, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर मनसे सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल. मात्र तुम्ही जबाबदारीपासून पळ काढत आहात किंवा पालकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र नाहीत, असं आढळून आलं तर ते कदापि सहन केलं जाणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंचं शाळा-महाविद्यालयांना पत्र
 

मंगलवार, 12 सितंबर 2017

कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी


कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना खीळ बसली आहे. नव्याने कोणतीही कामे करण्याची पालिकेची ऐपत नसल्याने पालिकेने आपल्या स्थितीची श्वेतपत्रिका काढावी अन्यथा नागरिकांबरोबर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे पत्र पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी वेलारसू यांना पाठवले आहे.
पालिकेचा अर्थ संकल्प तयार करताना करण्यात येत असलेल्या चुकांमुळे आज स्पील ओव्हरचा आकडा वाढत आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींना कामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, या श्वेतपत्रिकेमुळे आर्थिक स्थिती नागरिकांनाही समजेल अशी अपेक्षा मंदार हळबे यांनी व्यक्त केली. प्रशासकीय यंत्रणा समय सूचकतेचा वापस न करता कामे करत आहेत. नविन अर्थसंकल्प तयार करताना कलम 102 नुसार सरत्या वर्षातील अखर्चिक रकमांना पुन्हा मंजुरी घेतली जात नसल्याची बाबही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याच कारणाने प्रशासन सादर करत असलेला अर्थ संकल्प वस्तूस्थितीला ध्रुव नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य अशी अनेक कामे ठेकेदार सोडून देण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या ठेकेदारांना त्यांच्या कामाची देयके वेळेत मिळत नसल्याने ही परिस्थिती उदभवू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. जर अशी परिस्थिती आली तर पालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी अर्थ संकल्प फुगवला असे सांगत आता आरोप प्रत्यारोपांचा खेळ शासन प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप हळबे यांनी केला आहे. प्रशासनाने श्वेतपत्रिका काढण्यास टाळाटाळ केली तर विरोधी पक्ष म्हणून आपल्याला नागरिकांबरोबर आंदोलनाचा पावित्रा स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.