बुधवार, 7 सितंबर 2011

सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर

सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर
-
Wednesday, September 07, 2011 AT 04:00 AM (IST)

मुंबई - मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना व मनसेने एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज केले. मराठी माणसाचे मत एकच असल्याने ते मत तुम्ही कापून घेणार काय, असा प्रश्‍नही त्यांनी या पक्षांना उद्देशून केला.

शिवसेना हा मराठी माणसाचा आधार होता; मात्र तुम्ही त्यातून मनसे हा वेगळा पक्ष का स्थापन केलात, असा थेट सवाल नानांनी मुलाखतकार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांना विचारला. त्यावर महाभारतातील कृष्णाच्या दुर्योधनासोबतच्या अयशस्वी शिष्टाईचे उदाहरण देऊन पारकर यांनी तसे होणे अशक्‍य असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. मुंबई गणेश महोत्सव-2011 अंतर्गत "नाना रंग' हा नाना पाटेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम "महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान'तर्फे साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.

अण्णा हजारे यांचे व त्यांच्या आंदोलनाचे पाटेकर यांनी कौतुक केले; मात्र ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या आयुष्यातून भ्रष्टाचाराचे पूर्ण निर्मूलन होईल, तेव्हाच अण्णांच्या आंदोलनात सामील होईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. "टीम अण्णा'मधील किरण बेदी व अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. राजकारणात जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले

मंगलवार, 6 सितंबर 2011

"राज ठाकरेंचा गुजराती मतावर डोळा नाही''

"राज ठाकरेंचा गुजराती मतावर डोळा नाही'
वृत्तसंस्था
Tuesday, September 06, 2011 AT 06:33 PM (IST)मुंबई- ""आगामी महापालिका निवडणुकीत गुजराती समाजाच्या मतावर डोळा ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला नव्हता, तर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला राज्याचा विकास पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी तो दौरा होता. '' अशी माहिती मनसेचे नेते आणि आमदार बाळा नांदगावकर यांनी आज (मंगळवारी) दिली.

ते म्हणाले,"" राज ठाकरे यांना गुजरातचा दौरा करायचा होता. मात्र त्यांची आणि मोदींच्या समन्वयाबाबत तारीख निश्‍चित होत नसल्याने दौरा लांबत गेला. शेवटी गेल्या महिन्यात राज यांना गुजरातचा दौरा करावा लागला. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली की ते पुन्हा गुजरातचा दौरा करणार आहेत. त्यामुळे मनसेचा गुजराती मतांवर डोळा आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांविषयी बोलताना नांदगावकर म्हणाले, की वास्तविक गुजरात आणि महाराष्ट्राची एकाच दिवशी स्थापना झाली. गुजरात मात्र महाराष्ट्राच्या पुढे गेला. आम्ही मागे राहिलो. त्यांनी विकास कसा केला. याची दखल घेण्याची गरज आहे.''

नांदगावकर यांनी यावेळी शिवसेना-भाजपवरही टीका केली ते म्हणाले, ""मुंबईकरांनी युतीला महापालिकेत सत्तेवर आणले, मात्र ते आता वीस वर्षांनी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी लोकांसमोर कोणत्या चेहऱ्यांनी ते जाणार आहेत.'