सोमवार, 30 मई 2011

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा ठाम विरोध

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा ठाम विरोध
-
Tuesday, May 31, 2011 AT 03:00 AM (IST)
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका रेल्वे स्थानकाला देण्याचा आग्रह धरून त्यांचे व्यक्तिमत्त्व लहान करू नका असे बजावतानाच, बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्त्वाचा आदर करण्यासाठी पाचशे रुपयांच्या नोटांवर त्यांचे छायाचित्र छापावे, त्यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी आग्रह धरावा, अशी सूचना करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला गुगली टाकली. दादर स्थानकाचे चैत्यभूमी असे नामकरण करण्यास आपला ठाम विरोध असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर आणि प्रेम असेल, तर त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारवर दबाव आणावा. डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र नोटांवर छापा, असा आग्रह लोकसभेत धरावा, असे राज यांनी स्पष्ट केले. "कृष्णकुंज' या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजकारणासाठी महात्म्यांच्या नावाचा वापर करू नका. नामांतराने मूळ सामाजिक, आर्थिक समस्या सुटणार नाहीत. आपल्याच लोकांनी ठेवलेली नावे काढून नवीन नावे देण्यास माझा ठाम विरोध असेल असे ठणकावून ते म्हणाले, की माझा विरोध व्यक्‍तीला नाही; तर महापुरुषांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करण्याच्या प्रवृत्तीला आहे. जुनी नावे काढून नवीन नामकरण करण्यात संपूर्ण राजकारण दडलेले असते आणि असे राजकारण समाजाच्या उन्नतीसाठी हानीकारक असते.

नामांतराने मूळ समस्या सुटत नाहीत, असे स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्यानंतर तिथल्या सुविधा बदलल्या का? मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव दिल्यानंतर त्या विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीत बदल झाला का? केवळ नामांतराचे राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे गरीब आणि गरजू बांधवांच्या समस्या सुटत नाहीत. म्हणून नामांतर करण्यास आपला ठाम विरोध आहे.

महान लोकांची नावे लहान वास्तू, रस्ते यांना देण्यास माझा कायम विरोध आहे. मग माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कोणी घेतला तरी त्याचा मी विरोधच करीन, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव एका रस्त्याला दिल्यानंतर पुन्हा वांद्रे-वरळी सागरी सेतूला त्यांचे नाव कशाला हवे? महाराष्ट्रात अनेक थोर पुरुष होऊन गेले, त्यांची नावे का दिली जात नाहीत? केवळ चारपाच नावांच्या पलीकडे जायचेच नाही, ही पद्धतच चुकीची आहे, असा टोला त्यांनी लगावला