मंगलवार, 15 दिसंबर 2015

'दिलवाले'वर बहिष्काराबाबत भूमिका अधिकृत नाही - राज

मुंबई - ‘दिलवाले‘ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले होते. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगळी भूमिका मांडत चित्रपटावर "बहिष्कार टाकणे ही मनसेची अधिकृत भूमिका नसल्याचे‘, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले.
android-slow? click here

राजकीय पक्षांची भूमिका हीच त्यांच्या पोटशाखा असणाऱ्या संघटनांची अधिकृत भूमिका मानली जाते. मनसेमध्ये मात्र मुख्य पक्षाची भूमिका आणि पक्षाची पोटशाखा असणाऱ्या चित्रपट सेनेच्या भूमिकेत अंतर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चित्रपट सेनेने "दिलवाले‘ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यानंतर राज ठाकरे यांनी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे आज जाहीर करीत चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनाच अडचणीत आणले आहे. "चित्रपट सेनेचे म्हणणे योग्य असले तरी चित्रपटावर बहिष्कार टाकणे ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही‘, असे मनसेने अधिकृतरीत्या कळवले आहे.

अभिनेता शाहरुख खान याने चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली, मात्र राज्यातील दुष्काळग्रस्तांना त्याने अद्याप मदत केली नसल्याने संतापलेल्या चित्रपट सेनेने शाहरुखच्या आगामी "दिलवाले‘ चित्रपटाला विरोध करीत हा चित्रपट पाहण्यापेक्षा नाना पाटेकर यांच्या दुष्काळग्रस्तांना मदत करणाऱ्या "नाम‘ या संस्थेला चित्रपटाच्या तिकिटीचे पैसे देऊन या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले नसले तरी "महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्राला विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्यांनी ठेवली पाहिजे‘ असा टोला मात्र शाहरुख खानला लगावला आहे.