शनिवार, 31 दिसंबर 2016

मनसे सोडणाऱ्यांवर पश्‍चातापाची वेळ - बाळा नांदगावकर

पुणे - ""महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यामुळे लोकप्रतिनिधींची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जे पक्ष सोडून जातील, त्यांना नंतर पश्‍चाताप होईल,'' अशा शब्दांत मनसेचे वरिष्ठ नेते आणि पुणे महापालिका निवडणुकीसाठी पुण्याचे प्रभारी बाळा नांदगावकर यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
मनसेतर्फे महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पुढील आठवड्यात होणार आहेत. त्यानिमित्त आढावा बैठक घेण्यासाठी शहरात आलेल्या नांदगावकर यांनी गुरुवारी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. विविध विषयांवरील पक्षाची भूमिका, निवडणुकीची तयारी, मराठी आणि पक्षांतराच्या मुद्यावर नांदगावकर यांनी या वेळी मोकळेपणाने गप्पा मारल्या. ऑगस्ट महिन्यापासून पुण्यातील निवडणुकीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर संवाद "प्रस्थापित' केल्याचे सांगत नांदगावकर यांनी यापुढे नागरिकांबरोबरही अशाच प्रकारे संवाद साधण्यात येईल, असे सांगितले.
पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचे मूल्यमापन कसे कराल, या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ""महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करताना पुणेकरांच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही पुणेकरांची क्षमा मागतो; पण बहुतांश लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रभागांमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती अधिकाधिक लोकापर्यंत पोचविण्यासाठी आता आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी नगरसेवकांबरोबर वैयक्तिक पातळीवर संवाद वाढविला आहे.''
पक्षांतराच्या मुद्यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, ""फक्त दहा वर्षे जुन्या असलेल्या आमच्या पक्षाने गेल्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळविले. निवडून आलेल्या नगरसेवकांना, नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षामुळे आणि राजसाहेबांमुळे ओळख मिळाली. पक्षामुळे हे सर्व जण मोठे झाले; परंतु सध्याच्या प्रभागरचनेनुसार निवडून येण्यासाठी म्हणून संधी साधत अन्य पक्षांत जाणाऱ्या या सर्वांना नंतर पश्‍चाताप होईल. प्रभागात चांगले काम करणाऱ्या विद्यमान नगरसेवकांसह जिंकून येण्याची क्षमता (इलेक्‍टिव्ह मेरिट) असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जाईल.''