शनिवार, 12 अक्तूबर 2013

राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात

रविवार, 13 ऑक्टोबर 2013 - 03:30 AM IST 

मुंबई - राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कॉंग्रेसच्या पराभवासाठी राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात, असे सूचक उद्‌गार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी काढले. दादरच्या खांडके बिल्डिंग नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

या मुलाखतीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासंबंधात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणांबद्दल शंका उपस्थित केल्याने वादळ उठले आहे. त्या मुलाखतीतच त्यांना राज आणि उद्धव येत्या निवडणुकीत एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधानही केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत आणि विभागप्रमुख सदा सरवणकर व्यासपीठावर उपस्थित होते.

दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने आणि दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर जोशी या मुलाखतीमध्ये स्फोटक व्यक्तव्ये करतील असा अंदाज होता; तो जोशी यांनी खरा ठरवला.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते; हेच स्मारक जर प्रबोधनकार ठाकरे यांचे बांधायचे असते आणि सरकारने टाळाटाळ केली असती; तर स्मारकासाठी बाळासाहेबांनी प्रसंगी सरकारही पाडले असते,' असे परखड मत व्यक्त करीत "कदाचित सध्याचे कॉंग्रेसचे सरकार योग्य प्रतिसाद देईल, असे उद्धव ठाकरेंना वाटले असेल,' अशी भूमिका त्यांनी घेतली. बाळासाहेब जी भाषा वापरत, ती सध्याचे नेतृत्व वापरत नाही. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अर्थात, ही टीका नसून बाळासाहेब आणि उद्धव या दोन नेतृत्वांतील तुलना असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

बाळासाहेबांच्या धोरणांमध्ये सातत्य होते. उद्धवही त्याच शिवसेनेचा वारसा पुढे नेत आहेत; मात्र शिवसैनिकांमध्ये पूर्वीची आक्रमकता राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी उद्धव यांनी आंदोलन केल्यास त्यामध्ये सहभागी होणारा पहिला शिवसैनिक मी असेन, असेही त्यांनी लगोलग जाहीर केले.

निवडणुकीच्या राजकारणातून अद्याप माघार घेतली नसल्याचे सांगत दादरमधून संधी नाही मिळाली; तर ठाण्यातून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, असे जोशी यांनी जाहीर केले. दादरमध्ये बाहेरील उमेदवार दिल्यानेच पराभव पत्करावा लागला. जेथे शिवाजी असतो, तिथे सूर्याजी पिसाळही असतो, असे सांगत दादरच्या पराभवाला स्वतः जबाबदार असल्याचे जोशी यांनी नाकारले.

गेल्या विधानसभेत पक्षाबरोबर गद्दारी करणाऱ्यांना प्रमोशन दिले जात असल्याबद्दल त्यांनी टीकेचा सूरही लावला. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेसच्या पराभवासाठी राज-उद्धव एकत्र येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खासदार राऊत यांनी मात्र पक्षनेतृत्वावरच सर्व जबाबदारी टाकण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. शिवसैनिक आदेशाची वाट पाहत नाहीत. प्रमुखांच्या आदेशांची त्यांना गरज नाही. देशाला वंदनीय असलेल्या नेत्याचे चिमूटभर स्मारक होत नसल्याने आपण त्यांची लेकरे म्हणवून घेण्यास नालायक ठरतो, असेही ते या वेळी म्हणाले.

"मनमोकळी चर्चा झाली' शिवसेनेच्या सध्याच्या नेतृत्वावर म्हणजेच उद्धव ठाकरेंवर टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण मनोहर जोशी यांनी आज दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मी कोणत्या संदर्भात आणि नेमके काय वक्तव्य केले, याची माहिती मी उद्धव ठाकरेंना दिली. या वेळी आमची मनमोकळी चर्चा झाली, अशी माहितीही जोशी यांनी दिली.

शिवसैनिक सरांना माफ करणार नाहीत - कदम जोशी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याने संतापलेले शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनी, सरांमुळेच स्मारकाचा विचका झाला अशी टीका केली. त्यांना जर बाळासाहेबांबद्दल आणि त्यांच्या स्मारकाबद्दल एवढा आदर असेल, तर त्यांनी "कोहिनूर'च्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी जागा का दिली नाही? असा प्रश्‍न कदम यांनी विचारला. उद्धव यांच्याबद्दल नाहक टिकाटिप्पणी झाल्यास सरांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असा थेट इशाराच त्यांनी दिला.

"सरांनी स्मारकाचा वाद सुरुवातीपासून वाढवला. आधी आंदोलनाची भाषा करणारे सर नंतर या विषयावर मूग गिळून गप्प बसले. त्यामुळे त्यांना खरोखरच स्मारक बांधण्याचा उत्साह होता की स्मारक होऊ नये यासाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला?' असा प्रश्‍नही कदम यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांशी कुणाचीच तुलना शक्‍य नाही - तावडे बाळासाहेबांच्या नेतृत्वाशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशी भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज घेतली. मनोहर जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंवरील टीका असल्याचे त्यांनी नाकारले. बाळासाहेबांचे नेतृत्व इतके उत्तुंग होते, की त्यांच्याशी अन्य कोणाचीच तुलना होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर जिवापाड प्रेम केले, अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेबांचे कौतुक केले. परळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे "आठवणीतले बाळासाहेब' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 1988-89 या काळात मी विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करीत असताना प्रमोद महाजन यांच्यासोबत "मातोश्री'वर गेलो होतो. त्या वेळी बाळासाहेबांच्या बहुआयामी नेतृत्वाचा अनुभव आला, अशी आठवण तावडे यांनी सांगितली.

गुरुवार, 10 अक्तूबर 2013

मनसेचे गणित कच्चे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राला विकासाच्या ब्ल्यू प्रिंटचे स्वप्न दाखवत असले तरी त्यांच्या नाशिकमधील कारभाऱ्यांना साधी महापालिकाही चालवणे जड जात आहे. बरेच दिवस घालवून, डोकेफोडी करून या कारभाऱ्यांनी सदस्यांच्या हाती अर्थसंकल्प दिला खरा, पण त्यात तब्बल ८१८ कोटी ९० लाख रूपयांचा घोळ असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

अर्थसंकल्पातील या प्रकारामुळे नाशिककरांची फसवणूक झाली असून त्यातून महापालिकेत सुरू असलेल्या दयनीय कारभाराची आणि चुकलेल्या गणिताचे आणखी एक प्रचिती आल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्तांनी मे महिन्यात स्थायी समितीला १ हजार ५५६ कोटी ८० लाख रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात काही योजनांचा समावेश करून त्यात भरीव वाढ करून अंदाजपत्रकाचा आकडा २ हजार ७५५ कोटीपर्यंत पोहचवला होता. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता असताना दीड महिना उशिराने अंदाजपत्रक महासभेमध्ये सादर झाले होते. महासभेने अंदाजपत्रकात काही योजनांचा समावेश करीत २ हजार ७५५ कोटी ९० लाख रूपयांच्या जम्बो अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. मात्र महासभा होऊनही सप्टेंबर महिन्याअखेरीस महासभेचा ठराव सदस्यांना मिळत नव्हता. महासभेच्या ठरावानुसार स्थायी समितीचा अर्थसंकल्प १ हजार ५४१ कोटी रूपयांचा होता तर महासभेने सुचवलेल्या वाढीसह तो १ हजार ९३७ कोटी रूपयापर्यंत पोहचला असे दिसून येते. महासभेने तयार केलेल्या ठरावानुसारच अर्थसंकल्प तयार करण्याचे बंधन झुगारून प्रशासनाने २ हजार ७५५ कोटी ९० लाख रूपयांचा अर्थसंकल्प तयार करून त्याच्या प्रती सदस्यांच्या हाती सोपविल्या आहेत.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधाकर बडगुजर यांनी महापौरांच्या अज्ञानांची क‌िव येत असल्याचे म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी ठराव करताना आणि नंतर प्रत्यक्षात अर्थसंकल्प तयार करताना महापालिकेच्या इतिहासातील ऐतिहासीक चूक केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात तब्बल ८१८ कोटी रूपयांची वाढ झाली असून ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. एकंदरीतच अर्थसंकल्पाचा प्रवास कासवगतीने सुरू आहे. त्यात एवढ्या मोठ्या चुका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून कुठल्या पध्दतीने कामकाज सुरू आहे याची प्रचिती येत असल्याचा दावा त्यांनी शेवठी केला.

चूक सुधारण्याचा प्रयत्न

ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पातील ८१८ कोटी ९० लाख रूपयांची चूक बडगुजर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी चूक झाल्याची कबूली देत अर्थसंकल्पात सुधारणा करू असे स्पष्टीकरण दिले. मात्र, अर्थसंकल्पात ८१८ कोटी ९० लाख रूपयांची वाढ होऊनही त्याकडे सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे ठरावात आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही.

दुरुस्तीसाठी विशेष महासभा

अर्थसंकल्पात झालेल्या चुकांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाला अर्थसंकल्पीय विशेष महासभेचे आयोजन करावे लागणार आहे. अर्थसंकल्पात त्याशिवाय दुरूस्ती करता येणार नाही. मागील वर्षी देखील अर्थसंकल्पाबाबत याच पध्दतीने घोळ घालण्यात आला होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आयुक्तांनी सादर केलेल्या सुधारीत अर्थसंकल्पानुसार कारभार हाकावा लागला होता. यावर्षी यापेक्षा वेगळी परिस्थिती राहणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी करणार नाही अशी चूक अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातून महापौरांचे अज्ञान तर दिसतेच तसेच सत्ताधारी कोणत्या प्रकारे महापालिकेचा कारभार हाकताहेत याची प्रचिती येते. याप्रकरणात सर्वसामन्य करदात्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत असल्याने संबंधीतावर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. - सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते

अर्थसंकल्याची प्रत नुकतीच सदस्यांच्या हाती आली असून त्याबाबत अभ्यास करूनच बोलणे उचित ठरेल. महासभेचा ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात खरोखर काही बदल आहेत. याबाबत माहिती घेऊन खुलासा करण्यात येईल. - अशोक सातभाई, मनसे गटनेता

ठरावानुसार अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थसंकल्प

आयुक्त - १ हजार ५५६ कोटी ८० लाख

स्थायी समिती १ हजार ५४१ कोटी २ हजार ३५९ कोटी ९५ लाख

महासभा १ हजार ९३७ कोटी २ हजार ७५५ कोटी ९० लाख