शनिवार, 15 जनवरी 2011

विकास करणाऱ्यांनाच राज्यामध्ये संधी मिळते

'विकास करणाऱ्यांनाच राज्यामध्ये संधी मिळते'
-
Saturday, January 15, 2011 AT 12:00 AM (IST)

मुंबई - संधी केवळ विकास करणाऱ्यांना मिळते, रमेश किणीसारख्या माणसांना मार्गातून काढून टाकणाऱ्यांना नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. राज यांनी औरंगाबादच्या सभेत "मौका सभी को मिलता है' असे वक्तव्य करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिलेल्या इशाऱ्याला मेटे यांनी उत्तर दिले.

"राष्ट्रवादी भवन'मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले की, राज यांची टीका किळसवाणी, संस्कृती धुळीस मिळविणारी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. राज्याची परंपरा, संस्कृती धुळीस मिळविली. या टीकेमुळे कार्यकर्ते संतापले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरणही मेटे यांनी दिले. मात्र, हा हल्ला व पक्षाने मेटेंना उपाध्यक्ष पदावरून कमी केल्याची घटना, सत्ताधाऱ्यांनी आधी मनसेबाबत घेतलेली "संयमी' भूमिका, मराठा आरक्षण समितीतून मेटे यांना वगळणे आदी विषयांवरून पत्रकारांनी मेटे यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यामुळे मेटे गोंधळून गेले. केवळ राज यांच्या विषयावरच बोलेन, असे सांगत बाकीच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याचे टाळत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत, आदित्य ठाकरे यांच्याकडून धुव्वा उडाल्याने नैराश्‍य आलेल्या राज यांनी चर्चेत राहण्यासाठी बेताल बडबड केल्याची टीकाही मेटे यांनी केली. तसेच, आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल राज यांना फारसे प्रेम नाही. जाधव यांना पाच जानेवारीला मारहाण झाली; पण राज नऊ जानेवारी रोजी त्यांना पाहायला गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले

शुक्रवार, 14 जनवरी 2011








गुरुवार, 13 जनवरी 2011

राज यांची टीका नैराश्‍यातून - उपमुख्यमंत्री

राज यांची टीका नैराश्‍यातून - उपमुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 14, 2011 AT 12:30 AM (IST)


मुंबई - आम्ही विकासाचे राजकारण करणारे लोक आहोत, ज्यांना लोकांच्या प्रश्‍नांशी काही देणे-घेणे नाही, असे लोक शिवराळ भाषा वापरतात, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला. राज यांनी नैराश्‍यातून आपल्यावर टीका केली आहे, मुख्यमंत्र्यांबद्दलही त्यांनी वाईट उद्‌गार काढले, अशी भाषा वापरल्याने तेच जनतेच्या मनातून उतरतील, अशी प्रतिक्रिया पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

औरंगाबाद येथे काल (ता. 12) मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. मंत्रालयात आज त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी आपल्यावर नैराशातून आरोप केले, त्याची किती दखल घ्यायची? असा उलट सवाल केला. मात्र, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला कमरेखालची शिवराळ भाषा वापरायची हे बरोबर नाही, मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी असंसदीय भाषेत टीका केली, त्यामुळे राज जनतेची सहानुभूती गमावून बसतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांच्या मारहाणीचे आपण कधीही समर्थन केलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु जाधव यांनीही पोलिसांना मारहाण केली, हेही बरोबर नाही, असे पवार यांनी निदर्शनास आणले.

मौका सभी को मिलता हैं


मौका सभी को मिलता हैं
Print



राज ठाकरे यांचा ‘दादा’-‘आबा’ यांना इशारा
औरंगाबाद, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना माज आला आहे. बीड येथे शिक्षकाला झालेली मारहाण, शिवनेरी किल्ल्याजवळील हेलिकॉप्टरवर केलेली दगडफेक, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या घरावर झालेला भीषण हल्ला, दादोजी कोंडदेव प्रकरण, जैतापूर आणि वसई येथील नागरिकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीच चिथावणी होती,’’ असा सनसनाटी आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विराट सभेत केला. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ला चढविला. ‘‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?’’, असा सवाल करून ते म्हणाले, ‘‘भिवंडी येथील दोन पोलिसांना दगडाने ठेचून मारले, त्या वेळी सरकारकडून हर्षवर्धन जाधवला दिलेल्या वागणुकीसारखे वर्तन करण्यात आले होते का? कारण त्या ठिकाणी त्यांची मते जातात. राष्ट्रवादीच्या लोकांना माज आला आहे. बीड येथील औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकाला फोडून काढण्यात आले, बडविण्यात आले. हे कायद्याचे राज्य आहे का? कोणी यांना प्रश्न विचारायचे नाही का?’’
शिवनेरी किल्ल्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हेलिकॅप्टर आणि सभेत दगडफेक केली. त्या वेळी हेलिकॅप्टरमध्ये विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. दगडफेक करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांवर केवळ गुन्हे दाखल केले. त्यांना फोडून काढण्याची हिंमत या राज्य सरकारच्या पोलिसांकडे नव्हती. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये शिवसंग्रामचे कार्यकर्ते होते. या भीषण हल्ल्यातून केतकर वाचले. या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना आमदारकी भेट देण्यात आली, अशी टीका करून राज म्हणाले, ‘‘निळूभाऊ खाडीलकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यांना पोसले जात आहे. जाती-पातीचे विष पेरून राजकारण केले जात आहे. जातीपातीच्या चिखलातच महाराष्ट्राला राहू दिले जात आहे. दादोजी कोंडदेव प्रकरणात इतिहास बदलला जाणार आहे का? इतिहासात दोष असतील तर ते चर्चेने सोडवा.’’ ‘जास्त अंगावर येऊ नका,’ असा इशाराही आर. आर. आणि अजितदादांना देताना राज म्हणाले, ‘‘ पोलीस दलाच्या आडून लढू नका. हिंमत असेल तर होऊन जाऊ द्या.’’ आर. आर. पाटील यांनी मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरमें छोटी छोटी बातें होती हैं’ असा डायलॉग लगावला होता. याला ‘मौका सभी को मिलता हैं’ हा ‘सत्या’ चित्रपटातील संवाद त्यांनी सांगितला. हर्षवर्धनचे आई-वडील काँग्रेसच्या राजवटीतील त्यांच्याच पक्षाचे आमदार होते. त्यांचा मुलगा मनसेकडे का आला, म्हणूनच त्याला बडविण्यात आले आणि याला चिथावणी आर. आर. आबा आणि अजित पवार यांचीच आहे. कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे काय हाल होतात, असे अजित पवार जालन्याच्या सभेत म्हणाले होते. आर. आर. आणि अजित पवार यांचे आदेश असल्यामुळेच ही मारझोड करण्यात आली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

बुधवार, 12 जनवरी 2011

पोलिसांचे निलंबन झालेच पाहिजे - राज ठाकरे

पोलिसांचे निलंबन झालेच पाहिजे - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 13, 2011 AT 12:45 AM (IST)


औरंगाबाद - "आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन झालेच पाहिजे,'' अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. 12) येथे केली. "निलंबन झाले नाही, तर विधानसभेत काय करायचे ते बघून घेऊ,' असा इशारा देत या मारहाण प्रकरणामागे गृहमंत्री आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मनसेतर्फे आमदार जाधव मारहाण प्रकरणी आयोजित निषेध सभेत श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार श्रीमती तेजस्विनी जाधव यांच्यासह आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले की, हर्षवर्धन यांचे वडील आणि आईदेखील कॉंग्रेसच्या आमदार होत्या. मात्र, हर्षवर्धन मनसेत आले. सध्या मनसेची ताकदही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा राग आर. आर., अजित पवार यांना होता. तो त्यांनी आमदार जाधव यांच्यावर काढला. कन्नड तालुक्‍यातील एका गावात दारूबंदी करा, अशी महिलांची मागणी होती. ती घेऊन आमदार जाधव काही महिन्यांपूर्वी आर. आर. पाटील यांना भेटायला गेले होते. तेथेही त्यांच्याविरुद्धच गुन्हा नोंदविण्यात आला, वाहने जप्त करण्यात आली. त्यावेळी हर्षवर्धनला मारहाण करणारे कोकणे, पवार हे पोलिस अधिकारी कन्नड तालुक्‍यात कार्यरत होते. त्याचवेळी दारूबंदीची मागणी मान्य केली असती तर हा पुढचा संघर्ष टळला असता. त्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन हर्षवर्धन जाधव मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यात त्यांचे काय चुकले? मुख्यमंत्र्यांसोबत फुटकळ लोक फिरतात. त्यांच्याऐवजी एक आमदार सोबत असला तर चालत नाही का? लोकांचे म्हणणे, त्यांच्यावरील अन्याय आमदाराने मांडायचा नाही का? खरे तर आमदार जाधव यांना मारझोड करण्याचा निर्णय पोलिस स्वतः घेऊच शकत नाहीत. त्यांना आर. आर. किंवा अजित पवार यांचा आदेश असल्याशिवाय मारहाण होणारच नाही. आमदार जाधव यांना पोलिस ठाण्यात पाऊण तास बसवून ठेवण्यात आले. हा पाऊण तास पोलिस अधिकारी आदेशाचीच वाट पाहत होते. अजित पवार यांनी कालच "कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे काय झाले ते पाहा' असे वक्तव्य केले. याचा अर्थ आमदार जाधव यांना मारहाण करण्याचे आदेश तुमचे होते, असा होतो.


भिवंडीत पोलिसांना ठेचून मारणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. पोलिस अधिकारी, नागरिकांचे बळी घेणाऱ्या अतिरेकी कसाबला भेटायला आर. आर. पाटील तुरुंगात जातात. त्याची विचारपूस करतात. अजित पवारांच्या सभेत प्रश्‍न विचारणाऱ्या शिक्षकाला पोलिस ठाण्यात बदडून काढले जाते. हे कायद्याचे राज्य आहे का? बाहेरच्या राज्यांतून अनधिकृतपणे जे लोंढे येतायत, त्यांना हाकलण्याऐवजी घरे दिली जात आहेत.


शिवनेरी किल्ला येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर फक्त गुन्हे नोंदवून सोडले जाते. कारण या संघटना आर. आर. पाटील, अजित पवार यांच्या आहेत. या संघटनांना हाताशी धरून जातीपातीचे विष पेरण्याचा, राजकारण करण्याचा उद्योग सुरू आहे.
दादोजी कोंडदेव पुतळ्याचा संदर्भ देत श्री. ठाकरे म्हणाले की, इतिहासात काही दोष असतील तर ते चळवळीने सोडवा. पुरावे समोर आणा, तपासा आणि ठरवा. पण केवळ काही नगरसेवकांच्या ठरावावरून पुतळा हलविण्यात आला. शिक्षक कोणत्या जातीचा असावा, हे ठरवून कुणी शिक्षण घेते का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्मण होते, हा इतिहास बदलणार का?


आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे चांगले काम केले. अजित पवारही मला चांगले वाटले होते. रोखठोक माणूस आहे. काही तरी चांगले करतील, असे वाटले होते. पण हे तर आमदारालाच मारहाण करत आहेत. आता त्यांनी जास्त अंगावर येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. आतापर्यंत मी नेहमीच पोलिसांच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवला आहे. पोलिसांनीही हे लक्षात ठेवावे. सरकारच्या नादी लागून आमच्यावर अत्याचार करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले

राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला निघाले

राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला निघाले
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 12, 2011 AT 12:55 PM (IST)


औरंगाबाद  -  आमदार हषवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत.  या सभेसाठी दुपारी बारा वाजता श्री. ठाकरे हे पुण्याहून औरंगाबादला येण्यासाठी निघाले आहेत. साधारणतः दुपारी चार ते साडेचार वाजण्याचा दरम्यान ठाकरे यांचे औरंगाबादेत आगमन होणार आहे. तेथून ते थेट सुभेदारी विश्रामगृहावर जाणार आहेत.

दरम्यान, आमदार जाधव यांना हर्सुल कारागृहात सोडण्याची कारवाई सुरू आहे. तर श्री. ठाकरे यांच्या सभेला गर्दी व्हावी, असे नियोजन पक्षाच्या स्थानिक आणि मराठवाडा पातळीवरच्या नेत्यांनी केले आहे.  मराठवाड्यातील पक्षाच्या प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याला सभेला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि वाशिम येथुनही कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे. तर मुंबईहून मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यकर्ते या सभेला येणार आहेत. राज ठाकरे आपल्या भाषणातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देतील असा विश्‍वास कार्यकर्त्यांना आहे. 

मंगलवार, 11 जनवरी 2011

'राज'च्या सभेवर पोलिसांच्या 200 कॅमेऱ्यांची नजर

'राज'च्या सभेवर पोलिसांच्या 200 कॅमेऱ्यांची नजर
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 12, 2011 AT 12:15 AM (IST)

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी बुधवारी (ता. 12) आयोजित केलेल्या सभेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय अत्याधुनिक तंत्राचा वापर करून या सभेवर नजर ठेवण्याचीही तयारी पोलिसांनी केली आहे. त्यासाठी मराठवाड्यातून दोनशे व्हिडिओ कॅमेरे मागविण्यात आले आहेत.

ही सभा बुधवारी (ता. 12) संध्याकाळी साडेपाच वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये भावना दुखावतील किंवा प्रक्षोभ होईल, असे वक्तव्य केल्यास प्रमुख वक्‍त्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा स्वरूपाच्या अटी आहेत. त्याचप्रमाणे ही सभा वेळेवर सुरू व्हावी आणि वेळेवर संपवावी, अशीही अट घातली आहे. या सभेसाठी बाहेरच्या जिल्ह्यांतून कार्यकर्ते येणार असल्याने शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तपासणी केली जाणार आहे. तर वाहनांचे व्हिडिओ शूटिंगही केले जाणार आहे. शहरातील प्रमुख चौकांसह सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खुशालचंद बाहेती यांनी दिली.

या बंदोबस्तात राज्य राखीव पोलिस दलाचे जवान, शीघ्र कृती दल, दंगा काबूचे पथक, "एसआरपीएफ'च्या दोन कंपन्या; तसेच वज्र आणि पाण्याचा मारा करणाऱ्या वाहनांनाही तैनात करण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या मदतीला बीड, जालना, उस्मानाबाद येथून पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. शहराबाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना ओळखणाऱ्या त्या-त्या शहराचे विशेष शाखेचे पोलिस कर्मचारीही शहरात दाखल झाले आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनांचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना ओळखता येईल, या पद्धतीने शूटिंग करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. तर शहरात 60 ठिकाणी फिक्‍स पॉइंट लावण्यात आले आहेत. प्रत्येक पॉइंटवर सभेला जाणाऱ्यांची शूटिंग केली जाणार आहे. सभेच्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणावर कॅमेऱ्यांचा वापर करून शूटिंग करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाहेती यांनी दिली. सभा आटोपल्यावर काही अनुचित प्रकार करताना कोणी आढळलयास त्या ठिकाणी कलर सोडणाऱ्या "डाय गॅस'चा वापर करण्यात येणार आहे.

'डाय गॅस'चा वापर करणारराज ठाकरेंच्या सभेत पहिल्यांदाच "डाय गॅस'चा वापर केला जाणार आहे. जर या सभेत किंवा सभेनंतर जर गोंधळ झाला तर पोलिस ज्याप्रमाणे अश्रुधुराचा वापर करतात, त्याच पद्धतीने या "डाय गॅस'चा वापर करणार आहेत. या गॅसमधून रंग बाहेर पडतो, तो रंग होळीच्या रंगाप्रमाणे अंगाला लागतो. एकदा हा रंग लागला, की तो पंधरा दिवस तरी निघत नाही. त्यामुळे नंतर गुन्हे दाखल करण्यासाठी किंवा गोंधळ घालणाऱ्यांना पकडण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्याचा वापर या सभेसाठी पहिल्यांदा औरंगाबादेत केला जात आहे

जाधव, बनकर यांची हर्सूल कारागृहात रवानगी

जाधव, बनकर यांची हर्सूल कारागृहात रवानगी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 11, 2011 AT 12:56 PM (IST)

औरंगाबाद - पोलिसांनी केलेल्या मारहाणप्रकरणी आमदार हषवर्धन जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांना आज (मंगळवार) हर्सूल कारागृहात हलविण्यात आले. बुधवारी (ता. 12) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादेत होणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आमदार जाधव आणि दिलीप बनकर पाटील यांची हर्सूलमध्ये रवानगी केल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

वेरूळ लेणी येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी निघालेल्या जाधव आणि बनकर पाटील यांना पोलिसांनी मारहाण केली होती. त्यानंतर साधारणतः दोन दिवस आमदार जाधव यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यावेळी आमदार जाधव यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना उपचारानंतर हर्सूल कारागृहात नेण्याऐवजी तिथेच उपचारार्थ दाखल केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आज त्यांना हर्सूल कारागृहात दाखल केले आहे. 

रविवार, 9 जनवरी 2011

जाधव यांच्या भेटीला ठाकरे, विलासराव देशमुख, मुंडे, पालकमंत्रीही

जाधव यांच्या भेटीला ठाकरे, विलासराव देशमुख, मुंडे, पालकमंत्रीही
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 10, 2011 AT 12:15 AM (IST)

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. नऊ) सकाळी 11 वाजता न्यायालयाच्या आदेशाने घाटी रुग्णालयात जाऊन जखमी आमदार हर्षवर्धन जाधव आणि जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी आमदार जाधव यांच्याशी एकांतात चर्चा केली.
दरम्यान, रविवारी दिवसभरात आमदार जाधव यांना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, खासदार गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेल्या आमदार हषवर्धन जाधव यांना वेरूळ लेणीच्या पायथ्याशी पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना खुलताबाद पोलिस ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. त्यानंतर रविवारी (ता. नऊ) त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. ते विमानतळावरून सुभेदारी विश्रामगृहात आले. तेथून ते आमदार जाधव यांना भेटण्यासाठी घाटी रुग्णालयात पोहचले. तत्पूर्वी श्री. ठाकरे यांना भेटण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली.

सध्या आमदार जाधव हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ही परवानगी श्री. ठाकरे यांना घ्यावी लागली. आमदार जाधव यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हे खास हेलिकॅप्टरने मुंबईहून औरंगाबादला आले होते. त्यांच्यासोबत आमदार शिशिर शिंदे, अतुल सरपोतदार, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे होते. या वेळी घाटी रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
श्री. ठाकरे यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि या प्रकारात जखमी झालेल्या दिलीप बनकर यांचीही भेट घेतली. या वेळी आमदार जाधव यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्या तेजस्विनी जाधवही उपस्थित होत्या. श्री. ठाकरे यांना एकट्यालाच आमदार जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मुंबईहून ठाकरे यांच्यासोबत आलेल्या आमदार शिशिर शिंदे यांच्यासह नेत्यांनाही खोलीच्या बाहेर थांबावे लागले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ठाकरे यांनी आमदार जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते सुभेदारीकडे रवाना झाले.

दरम्यान, राज ठाकरे आलेले असताना आमदार जाधव यांचे सासरे खासदार रावसाहेब दानवे यांनाही आमदार जाधव यांच्या खोलीत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळी खासदार दानवे आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.

"शोध मराठी मनाचा' कार्यक्रमाच्या समारोपानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, खासदार गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार श्री. जाधव यांची भेट घेतली. या वेळी श्री. देशमुख यांनी या प्रकरणी आपण कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन दिले, तर श्री. मुंडे यांनी या मारहाणीचा निषेध केला.

शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार जाधव यांना झालेल्या मारहाणप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नियुक्ती केली आहे. त्यामध्ये आमदार संजय सिरसाठ, आमदार किशनचंद तनवाणी आणि आमदार संतोष सांबरे यांचा समावेश आहे. या समितीनेही रविवारी (ता. नऊ) आमदार जाधव यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेही उपस्थित होते.