शनिवार, 10 दिसंबर 2011

ठाण्याच्या निवडणुकीत दांडपट्टा चालवणार - राज

ठाण्याच्या निवडणुकीत दांडपट्टा चालवणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 11, 2011 AT 01:45 AM (IST)
ठाणे - हे ठिकाण जाहीर सभेचे नाही तर सांस्कृतिक मेळाव्याचे आहे, निवडणुकीचा हंगामही जानेवारीत सुरू होईल. त्यामुळे मनसेचा दांडपट्टा त्यावेळीच चालेल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात केले . उन्नती गार्डन येथे मनसेचे नेते सुधाकर चव्हाण यांनी गेला आठवडाभर आयोजित केलेल्या महाराष्ट्र धर्म महोत्सवाचा समारोप आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, राजकारणात 50 टक्के आरक्षण महिलांसाठी लागू झाल्यापासून सभांना होणारी महिलांची गर्दीही वाढत चालली आहे. रस्त्यांवर लागणाऱ्या होर्डिंग्स आणि पोस्टरवर महिला इच्छुकही झळकू लागल्या आहेत, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, आता या साऱ्याचा फैसला परीक्षेनंतर लागणार आहे. परीक्षेमुळे उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येणार नसले तरी त्यानिमित्ताने त्यांना महापालिका कशी चालते याचा अभ्यास करता आला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. विजयराज बोधनकरांच्या व्यंगचित्रांचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले, माझाही हात शिवशिवतो, मात्र व्यंगचित्रे आता काढायला वेळच मिळत नाही, असे सांगून आता हात शिवशिवले की खळ्ळ्य....खट्ट्याक सुरू होते, असा टोला त्यांनी लगावला. आवश्‍यक तेव्हा मराठी साहित्याचे वाचन करतो, असे सांगून संदर्भासाठी हे वाचन नेहमी कामाला येते, असे त्यांनी सांगितले. आपण काही येथे भाषण करायला आलेलो नाही. त्यामुळे निवडणुकांच्यावेळी आपला दांडपट्टा चालेल, असे सांगून त्यांनी भाषण आवरते घेतले. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या शेकडो तरुणांची काहीशी निराशा झाली. यावेळी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सुधाकर चव्हाण यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शर्मिला ठाकरे, सरचिटणीस नितीन सरदेसाई, ठाणे जिल्हा संघटक मनोज चव्हाण, राजन गावंड आदी उपस्थित होते

मंगलवार, 6 दिसंबर 2011

पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे - राज

पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 07, 2011 AT 01:45 AM (IST)

मुंबई - कोणाचाही विरोध असला, तरी पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेत, जर या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेणार असाल, तर यापुढील प्रत्येक उड्डाणपूल हा जनसुनावणी घेऊनच झाला पाहिजे, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (मंगळवार) दिला. त्यामुळे राजकीय विरोधामुळे या उड्डाणपुलावरून येत्या काळात राजकीय उड्डाणे सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्थानिकांच्या विरोधामुळे राज्य सरकारने पेडर रोडवरील उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रद्द केला. मुंबईतल्या या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. सरकारच्या या भूमिकेवर राज ठाकरे यांनी मंगळवारी जोरदार टिकास्त्र सोडले. उड्डाणपुलाला विरोध हा केवळ पेडर रोडवासीयांचा अजेंडा असून, मंगेशकर कुटुंबीयांना पुढे करून हा अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेता, मग मुंबईतील इतर पूल, स्कायवॉक व मोनो रेल्वे उभारणीसाठी जनसुनावणी का नाही झाली, असा परखड सवाल करीत यापुढे पेडर रोडसाठी जनसुनावणी झाल्यास संपूर्ण मुंबईतील लोक जनसुनावणीला जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
पेडर रोडवासीयांच्या या भूमिकेचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, "मुंबईत रोजच्या रोज इतर प्रांतातून लोक येतात, गाड्या वाढतात, याबद्दल हे कधीही बोलत नाहीत. उद्या शिवाजी पार्क आणि वरळीतील रहिवासी सागरी सेतूवर आक्षेप घेतील. राज्यात होत असलेल्या प्रकल्पांना होणाऱ्या विरोधाबद्दल विचारले असता, हा विरोध राजकीय असेल तर मोडून काढला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

जयंत पाटील "चकित चेंडू'
या पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांची "चकित चेंडू' अशी खिल्ली उडवत त्यांची नक्कल राज ठाकरे यांनी केली. पाटील यांनी बोजा-बिस्तरा उचलून उपनगरात राहायला जावे, मग या उड्डाणपुलाबद्दल बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हा पूल भारतीयांसाठी आहे
हा पूल उभारल्यास आपण दुबईत राहायला जाऊ, असा इशारा ज्येष्ठ पार्श्‍वगायिका आशा भोसले यांनी दिला होता. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, आपल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपण भारतीय असल्याचे सांगितले होते. मग हे दुबई भारतात येते का हे माहीत नाही; पण हा पूल भारतीयांसाठी आहे. त्यांच्या परळच्या घराजवळदेखील उड्डाणपूल आहेच. त्यांनी दहा वर्षांपूर्वी हे विचार व्यक्त केले होते. मग त्याचा प्रतिध्वनी आताही ऐकू येतो का, असा सवालही त्यांनी केला.

वाहतूक पोलिस फक्त शिट्या वाजविणार काय?
गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेश सारंगी यांच्या मुलाला पोलिसांनी पकडल्यामुळे वाहतूक पोलिसांचे दंड वसूल करण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. मग हे पोलिस काय फक्त शिट्या वाजविणार काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आयएएस अधिकाऱ्याला झटका आला म्हणून का हा निर्णय घेण्यात आला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली

रविवार, 4 दिसंबर 2011

मनसेचा नगरसेवक होण्यासाठी 3156 जणं उत्सुक

मनसेचा नगरसेवक होण्यासाठी 3156 जणं उत्सुक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 04, 2011 AT 03:47 PM (IST)
मुंबई - महापालिकेच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज (रविवार) पार पडली. या परिक्षेसाठी राज्यभरातून 3156 उमेदवार बसले होते. राज्यात सहा ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली.

यात पुण्यातून 611, मुंबईतून 1208, नाशिक येथे 648, नागपुरातून 104, ठाणे 397 आणि पिंपरी-चिंचवड येथून 188 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल जाणून घेण्यास सर्वच उमेदवार उत्सुक आहेत, असे यातील काही उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.