सोमवार, 21 दिसंबर 2009

महाराष्ट्र केसरी' बनकरने घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र केसरी' बनकरने घेतली राज ठाकरेंची भेट
-
Sunday, December 20, 2009 AT 01:54 PM (IST)


मुंबई - 'महाराष्ट्र केसरी' हा किताब पटकावलेल्या विजय बनकर याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कुस्तिगीरांना मदत करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असून, 'हिंद केसरी' स्पर्धेसाठी बनकर यांना आवश्‍यक ती आर्थिक मदत देण्याचेही राज यांनी आश्‍वासन दिल्याची माहिती मनसेचे आमदार रमेश वांजळे यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली.

राज ठाकरे यांच्या भेटीला बनकर हे चांदीची गदा घेऊनच आले होते. त्यांच्यासोबत खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे होते. त्यांनीच ही भेट घडवून आणली. वांजळे हेही कुस्तीपटू असून विजय बनकर यांच्या वडिलांकडून त्यांनी तालमीत कुस्तीच्या डावपेचांचे प्रशिक्षण घेतले होते.

बनकर यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर त्यांनी आता "हिंद केसरी' कुस्ती स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. तरुणांनी क्रिकेट आणि अन्य खेळाडू बनण्यापेक्षा कुस्तीपटू व्हावे, त्यामुळे आरोग्यही तंदुरुस्त राहते, असा सल्लाही बनकर यांनी या वेळी दिला.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धांसाठी कुस्तिगीरांना मदत करण्यासाठी व त्यांच्यातील होतकरू पैलवानांना पुढे आणण्यासाठी मनसेच्या वतीने ट्रस्ट स्थापन केला जाईल. यासंबंधीची बैठक जानेवारी महिन्यात होईल, असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे आमदार वांजळे यांनी सांगितले.