शुक्रवार, 30 जनवरी 2015

लाट येते...आणि जातेही!

मनसेच्या शिडात राज ठाकरेंनी भरले वारे

मुंबई

लहानपणापासूनच पराभव पाहत आल्याने मला पराभव नवा नाही. लाट येते आणि जाते. मात्र, आपण डगमगायचे नसते. बाहेर वादळ असले की आपण शांत रहायचे आणि बाहेर वातावरण शांत असले की आपण वादळासारखे बनायचे, असे आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

मनसेच्या मुंबईतील शाखाध्यक्षापासून ते विभागाध्यक्ष तसेच सरचिटणीस यांच्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर येथे पक्षाच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राज बोलत होते. शिवसेनाप्रमुखांना विविध लोक भेटायला यायचे, तेव्हा मी आणि उद्धव त्यांना जवळून पाहायचो. अनेक पराभव आम्ही पाहिले, असे राज यांनी सांगितले.

विभागात कशाप्रकारची कामे करायला हवीत, प्रत्येकाकडे कामांचे कसे वाटप व्हायला पाहिजे, याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना आमिर खान यांच्या थ्री इडियट चित्रपटातील एक क्षण दाखविण्यात आला. त्याचाच धागा पकडून अनेक तरुणांना शाखाध्यक्ष व्हायचे आहे, त्यामुळे तुम्ही चांगले काम केले नाहीत तर ते मागे उभे आहेत, हे ध्यानात ठेवा असे सांगत राज यांनी शाखाध्यक्षांचे कान टोचले.

मान मिळत नसल्याबाबत महिलांकडून होणाऱ्या तक्रारींचा यावेळी राज यांनी समाचार घेतला. मान हा सन्मानाने मिळवायचा असतो आणि अपमान गिळायचा असतो. अपमान पचवायला शिका आणि मान हा सन्मानाने मिळवायला शिका, असे राज म्हणाले. नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत प्रत्यक्षात माझी भूमिका नीट समजून घेतली गेली नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाचे असायला हवेत गुजरातचे नाही, असे आपले म्हणणे होते. मात्र तुम्ही ते समजून घेतले नाहीत आणि लोकापर्यंत तशापद्धतीने पोहोचवले नाहीत, असेही राज यावेळी म्हणाले.

शाखेचे खाते उघडा

प्रत्येक शाखाध्य‌क्षाने बँकेत खाते उघडून पक्षासाठी गोळा केलेली वर्गणी त्यात जमा करावी. एक कोषाध्यक्ष नेमून त्याचा हिशोब ठेवावा आणि या पैशांमधून विभागात कार्यक्रम घ्यावेत, असा सल्ला राज यांनी यावेळी दिला.

डायलॉगने अस्वस्थता

यावेळी काही वक्त्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यातील एका वक्त्याने 'बंदूक की गोली पर जो राज करता है वह बंदूक की गोलीसेही मरता है और मीडिया पर जो राज करता है, उसे मीडियाही खत्म करता है', अशा आशयाचा डायलॉग मारल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली.