शुक्रवार, 29 जुलाई 2016

मुंबईसाठी 'भाईबंध'; 'मातोश्री'वर राज

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा प्रस्ताव शिवसेनेने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर (मनसे) ठेवला आहे. निमित्त ठरले, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी "मातोश्री‘वर जाऊन उद्धव यांच्या घेतलेल्या भेटीचे. गेली अनेक वर्षे दुरावलेले हे चुलत बंधू भेटल्यामुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्‍यता आहे. 

भाजपने उघडलेली आघाडी आणि गेल्या काही वर्षांच्या सत्तेमुळे निर्माण झालेले प्रस्थापितविरोधी (ऍन्टीइन्कम्बन्सी) वातावरण भेदण्यासाठी मराठी मतांनी एकत्र येणे हा एकमेव पर्याय शिवसेनेसमोर असून, तो प्रत्यक्षात आणण्याच्या हालचाली शिवसेनेतून सुरू झाल्या आहेत. राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंबरोबर अत्यंत सलगीचे संबंध असलेल्या "सामना‘चे संपादक संजय राऊत यांनी या भेटीची कल्पना मांडली होती. ती स्वीकारत आज ठाकरे बंधूंची प्राथमिक भेट झाली. काही वर्षांच्या मध्यंतरानंतर झालेली ही भेट दोन्ही पक्षांनी मराठी माणसाला एकत्र आणून निवडणुकीला सामोरे जावे यासाठी होती. भाजप येत्या काही दिवसांत मुंबईच्या महापालिकेतून बाहेर पडेल आणि कारभाराची चौकशी सुरू करेल, अशी भीती असल्याने शिवसेना नवा भिडू शोधते आहे. मराठी मतांचे एकत्रीकरण हा निवडणूक जिंकवून देणारा एकमेव मुद्दा असल्याने ठाकरेंनी एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत फारसे काही हाती लागेल अशी शक्‍यता वाटत नसल्याने, आज राज यांनी भावाला भेटण्याची तयारी दाखवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संबंधातला तपशील ठरवण्यास वेळ असला, तरी ही शक्‍यता तपासून पाहण्यास दोघांचीही हरकत नाही, हा कार्यकर्त्यांना अत्यंत विधायक मुद्दा वाटतो आहे.
 राज ठाकरे यांचे समर्थक बाळा नांदगावकर हे शिवसेनेत परतणार अशी शक्‍यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्‍त केली जात होती. त्यांचे शिवसेनेशी असलेले सुमधुर संबंध लक्षात घेता; त्यांना आज मध्यस्थ ठेवण्यात आले होते. "ही दोन भावांची नव्हे, तर दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट असल्या‘चे विधान करीत त्यांनी या भेटीमागील राजकीय रंगांना जगासमोर आणले आहे. मनसेला या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसले, तरी प्रत्येक वॉर्डात मनसे खेचणार ती मते अर्थातच शिवसेनेच्या विरोधात जातील. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्याचा विचार या भेटीमागे आहे, असे सांगितले जाते. मुंबईतील उपनगरांत शिवसेनेची मते फारशी नसल्याने या भागात हार मानावी लागेल, अशी भीती शिवसेना नेत्यांना वाटते, त्यामुळे एकत्र येण्याची धडपड सुरू आहे. 

राज यांनी 'मातोश्री'वर जाऊन घेतली उद्धवची भेट

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री‘वर जाऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली असून, भेटीचे कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राज व उद्धव यांनी एका खोलीमध्ये चर्चा केली. यावेळी चर्चेदरम्यान दोघांशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. चर्चेनंतर दोघांनी जेवणही केले. राज यांनी उद्धव यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. तसेच निघण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे दर्शनही घेतले.‘

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस झाला. त्यानंतर राज यांनी आज मातोश्रीवर हजेरी लावली आहे. यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे-जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाई या पार्श्वभूमीवरही ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ओवैसींच्या फोटो केकवर राज यांनी ठेवली सुरी

राज व उद्धव ठाकरे यांच्या भेटी-
23 नोव्हेंबर 2008 -  राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची पुस्तके परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.
16 जुलै 2012 - उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
20 नोव्हेंबर 2012 - बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र.
3 नोव्हेंबर 2014 - राज ठाकरेंच्या मुलीला अपघात. यावेळी उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट.
17 नोव्हेंबर 2014 - बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र.

सोमवार, 25 जुलाई 2016

भारतात 'शरियत'सारखा कायदा हवा - राज ठाकरे

गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही हे सरकारचे अपयश
कोपर्डी (जि. नगर) - गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेलीच नाही. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. महिलांची छेडछाड आणि बलात्कारासारखे गुन्हे थांबविण्यासाठी आता  ‘शरियत‘सारखा एखादा कायदा देशातही आणावा लागेल, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.

ठाकरे यांनी आज सकाळी येथे येऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर ते गावकऱ्यांशी बोलत होते. असे गुन्हे का होतात, हे तपासले पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘पीडित कुटुंबाची शस्त्र परवान्याची मागणी आहे. त्यांना तो मिळेलही; पण तेवढ्यावर भागणार नाही. केवळ शस्त्रे हा यावर उपाय नाही. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक पाहिजे. कायदा राबविणाऱ्या सरकारची भीती असली पाहिजे. ती गुन्हेगारांना नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकार बदलले; पण ते दिसत नाही. कायद्याची भीती नसेल तर असे राज्य व देश चालणार नाही.‘‘
अशा गुन्हेगारांना कायदा समजत नसेल, तर "शरियत‘सारखा एखादा कायदा भारतात येणे आवश्‍यक आहे. त्यात असे कृत्य करणाऱ्यांचे हात-पाय तिथल्या तिथे छाटले जातात. पुन्हा असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. अशा नराधमांना हीच शिक्षा योग्य आहे, अशी आक्रमक भूमिका ठाकरे यांनी या वेळी मांडली. या पीडित कुटुंबाला मदत मिळत असली तरी त्यांचे दुःख मोठे आहे. त्यांच्या घरातील एखाद्याला तरी सरकारी नोकरी मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
"ऍट्रॉसिटी‘चा धाक व त्यामुळे इतर समाजांवर दहशत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले, त्यावर ठाकरे म्हणाले, ‘या कायद्याचा कुणी गैरफायदा घेत असेल, तर त्यावर पर्याय आणला पाहिजे. सरकारने त्याबाबत गांभीर्याने पावले टाकली पाहिजेत. सध्या अधिवेशन सुरू आहे. त्यात काय होते ते पाहू.‘‘
माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, मनसे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रिटा गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, नगरचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे आदी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री वेळ मारून नेतात‘
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच येथे येऊन गेले; पण ते कायमच वेळ मारून नेतात, असा आरोप करून राज ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री जे सांगतात, त्याची अंमलबजावणी आणि घोषणांची पूर्तता करीत नाहीत; पण या प्रकरणात त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.‘