शनिवार, 4 मार्च 2017

मुंबईत भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही - देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर होणार महापौर.

मुंबई : मुंबईत महापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यामुळे मुंबईत शिवसेनाचा महापौर होणार, हे निश्चित झालं आहे.
मुंबईत महापौरपदासोबतच उपमहौपर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीची निवडणूकही भाजप लढणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार नाही, तर पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका भाजप निभावले, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय, मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबईच्या हितासाठी निर्णय घेतला असून, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करु. मात्र, शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजप मुंबईत यातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही!
  • महापौर
  • उपमहापौर
  • स्थायी समिती
  • बेस्ट समिती
  • प्रभाग समिती
शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया :
“मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक भाजप लढवत नाही, ही आनंदाची बाब आहे. मुंबईकरांचा कौल भाजपने स्वीकारल्याचा आनंदच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन करतो.”, असे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
शिवसेना नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया : मुंबईत शिवसेनेचा महापौर होईल, याचा आनंद आहेच. भाजपनं काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न होता. शिवाय, समित्यांवर दावा करायचा की नाही, हा भाजपचाच निर्णय आहे, असे शिवसेना नेते अनिल परब  म्हणाले.

गुरुवार, 2 मार्च 2017

मनसे पुन्हा आळवणार मराठीचा सूर - विकासकामांची चर्चा करुनही मते मिळत नाही.

मुंबई- महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ 7 नगरसेवक निवडून आणण्यात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला (मनसे) यश आले आहे. या सुमार कामगिरीनंतर पुन्हा एकदा संघटनेला नवी उर्जा देण्याचा मनसेचा मानस आहे. त्यासाठी मराठी अस्मितेच्या शिळ्याच कढीला नव्याने ऊत आणण्याच्या प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. रेल्वे तिकीट आणि वीजबिलावर छापण्यात आलेल्या गुजराथी भाषेतील मजकुराच्या निमित्ताने मराठीला वाचविण्यासाठी आगामी काळात मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय महत्वाकांक्षेतून जन्माला आलेल्या मनसेने सुरुवातीपासूनच भाषिक अस्मितेचा मुद्दा लावून धरला. परप्रंतीयांना केलेली मारहाण, दुकानांवर मराठी पाट्यांसाठी धरलेला आग्रह अशा अनेक आंदोलनांतून मनसेने लोकप्रियता मिळविली होती. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये या लोकप्रियतेच्या जोरावर पक्षाला चांगले यशही मिळाले. मात्र, त्यानंतरच्या काळात ठोस कार्यक्रम राबविण्यात आलेले अपयश आणि सामान्यांशी तुटलेली नाळ यामुळे मनसेची अवस्था केविलवाणी झाली.
2014 च्या विधानसभा निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला चांगलाच धक्का बसला. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीआधी स्वतः निवडणुक लढविण्याचे जाहिर केले होते. मात्र, मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे राज ठाकरेंनी तो मुद्दा गुंडाळला. यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये विकासकामांबाबत चर्चा करुन मनसेने पुन्हा आपला पिंड बदलण्याचा प्रयत्न केला. तरीही नाशिक महानगरपालिकेतील सत्तेतून मनसेला पायउतार व्हावे लागले आणि मुंबईत नगरसेवकांचा आकडा 27 वरुन 7 वर घसरला.
त्यामुळे विकासकामांची चर्चा करुनही आपली डाळ शिजत नसल्याचे मनसेच्या लक्षात आले आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेतच 'मनसे स्टाईल' आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. पश्‍चिम उपनगरातील बोरिवलीतील मनसे उपाध्यक्ष नयन कदम यांनी गुजराथी भाषेत वीजबील पाठविल्याबद्दल 'रिलायन्स एनर्जी'ला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. आता हाच मुद्दा घेऊन मनसे पुन्हा नव्याने 'खळ खट्याक' आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे.