बुधवार, 23 मार्च 2011

पुणे हे मुंबईचे डंपिंग ग्राउंड - राज ठाकरे

पुणे हे मुंबईचे डंपिंग ग्राउंड - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 24, 2011 AT 12:15 AM (IST)
 

पुणे - "परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे मुंबईची वाट लागली. मुंबईची ही अवस्था होण्यासाठी काळ लागला; परंतु आता पुणे, ठाणे आणि नाशिक ही शहरे मुंबईची डंपिंग ग्राउंड झाली आहेत,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. "पाच वर्षे माझ्या हाती सत्ता द्या आणि मगच पाहा,' असे आवाहन त्यांनी केले.

राज ठाकरे यांनी आज महापालिकेत आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन शहराच्या प्रश्‍नासंदर्भात चर्चा केली. या वेळी पाणीपुरवठ्यापासून ते बीआरटीपर्यंतच्या मागण्यांचे लेखी निवेदन आयुक्तांकडे दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे शहराच्या प्रश्‍नांसंदर्भात मी यापूर्वीही अनेकदा बोललो आहे. या शहरात सुधारणा झाली पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""जगभरातील शहरे पाहता मनात निराशा येते. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही. आपल्या राज्यातील शहरांनी काय घोडे मारले आहे. त्यांची प्रगती होऊ शकत नाही. आपल्या राज्यातील शहरांमध्ये प्ररप्रांतीयांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जागा मिळेल तेथे झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. मुंबईची क्षमता संपली, जागा नाही म्हणून आता पुणे, ठाणे, नाशिक शहरे ही मुंबईची डंपिंग ग्राउंड होऊ लागली आहेत. त्याचा ताण या शहरांवर येऊन बकालपणा वाढू लागला आहे. हे लक्षात येऊनही अपेक्षित नियोजन होत नाही.'' महापालिकेने द्यावयाच्या सुविधा बांधकाम व्यावसायिक देऊ लागले आहेत. सर्वच गोष्टींचे खासगीकरण होत चालले आहे. तसेच होणार असेल, तर सरकारची गरज काय, असा सवालही त्यांनी केला.

बीआरटीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "अशा पद्धतीने नियोजन होणार असेल, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देणार नसेल, तर शहराचा बकालपणा हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. वाहतुकीबाबत परदेशात कडक नियम आहेत. परंतु, परदेशातील मोटार कंपन्यांचे गाड्यांचे डंपिंग आपली शहरे होत आहे. त्यातूनच सार्वजनिक वाहतूक सक्षम होऊ न देण्यासाठी या कंपन्यांकडून प्रयत्न केले जातात. पाण्याची हीच परिस्थिती आहे. बेचिराख झालेले देश उभे राहू शकतात, तर आपल्या शहरांचा विकास का होऊ शकत नाही.''

तुमच्याकडेही टग्या आहे....
"महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातचा विकास होत आहे. कारण, तेथे महत्त्वाकांक्षी नेतृत्व आहे,'' असे राज ठाकरे म्हणाले. पुण्याबद्दल बोलताना त्यांनी, "तुमच्याकडेही टग्या आहे. आताच विकास करून घ्या. नंतर होणार नाही,' अशी टिप्पणी केली.

पुणे- राज ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट

पुणे- राज ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 23, 2011 AT 12:43 PM (IST)
 

पुणे - पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) महापालिका आयुक्त महेश झगडे यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांनी प्रथमच पुणे महापालिकेत जाऊन आयुक्तांशी शहरातील प्रमुख सहा मागण्यांवर चर्चा केली. राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांमध्ये बीआरटी सेवेमध्ये सुधारणा करावी, महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक जागांवर लक्ष ठेवावे, शहरातील वाढते अपघात कमी करावेत, पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी, मुळा-मुठा नद्यांमधील प्रदूषण कमी करावे आणि महिलांसाठी सार्वजनिकस्वच्छतागृहे उभारावीत यांचा समावेश होता. राज ठाकरे या सर्व मुद्द्यांवर आयुक्तांचे लक्ष वेधून हे प्रश्न सोडवावेत असे सांगितले.

मंगलवार, 22 मार्च 2011

उपमहापौर शेख यांचा "मनसे'त प्रवेश

उपमहापौर शेख यांचा "मनसे'त प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 23, 2011 AT 12:00 AM (IST)


नगर - उपमहापौर नजीर शेख यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रवेशावर अखेर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट आणि औपचारिक प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह ते उद्या मुंबई येथे जात आहेत.

शेख महापालिकेत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. सत्तेसाठीच्या संख्येच्या राजकारणात त्यांना उपमहापौरपदासाठी संधी देण्यात आली. राजकारण करण्यासाठी अपक्ष म्हणून नव्हे, तर कोणत्या तरी एका पक्षाचा झेंडा हाती असणे आवश्‍यक असल्याचे त्यांचे मत होते. यासाठी त्यांनी "मनसे'ची निवड केली. मुंबईतील त्यांच्या मित्रांनीही त्यांना "मनसे'त येण्याचा आग्रह धरला. यासंदर्भात त्यांची चर्चा थेट मुंबईतील पक्षाच्या नेत्यांबरोबरच सुरू होती. त्यांनी "मनसे'त प्रवेश करू नये, यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला होता; मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नगर येथे भव्य सभा घेऊन प्रवेशसोहळा करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यापूर्वी मुंबईत जाऊन ठाकरे यांची भेट घेऊन औपचारिकरीत्या प्रवेश करण्यात येणार आहे. तसेच, नगर येथे सभा घेण्यासाठी त्यांना आग्रहही करण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास गिरवले, जिल्हा संघटक सचिन डफळ, नगरसेवक गणेश भोसले व किशोर डागवाले, शहराध्यक्ष सतीश मैड आदींसह उद्या मुंबईत जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.