शनिवार, 19 फ़रवरी 2011

विधान परिषद निवडणुकीवर मनसेचा बहिष्कार!

विधान परिषद निवडणुकीवर मनसेचा बहिष्कार!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
 
संजय मिस्कीन
मुंबई - विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त करण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे मनसेचे विधानसभेतील 13 आमदार आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विधान परिषदेसाठी होणाऱ्या मतदानात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
दोन जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आघाडी आणि शिवसेना यांच्या उमेदवारांत सरळसरळ लढत होत असल्याने मनसेची मते कोणाच्या पारड्यात जातात, याची उत्सुकता दाटली होती. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांपैकी कोणालाही मतदान केले, तरी मनसेला राजकीय टीकेला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चेला रोखत "झाकली मूठ' कायम राहावी यासाठी मनसेने मतदानावर बहिष्कार घालण्याची सावधगिरी बाळगल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीच्या प्रयत्नांवर पाणी
या निवडणुकीत मनसेच्या मतांना खेचण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. काही मनसे आमदारांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दूरध्वनी करून आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याची विनंतीही केल्याचे समजते. मनसेच्या 13 आमदारांनी आघाडीचे उमेदवार किरण पावसकर यांना मतदान करावे, असे साकडे घालण्यात आले होते; मात्र मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र संताप मनसे आमदारांमध्ये आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मनसेने सहभागी होऊ नये, अशी भूमिका काही आमदारांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडली होती. तसाच निर्णय राज यांनी घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे.

बुधवार, 16 फ़रवरी 2011

युतीनेच झंडू बाम लावत बसावे- राज

युतीनेच झंडू बाम लावत बसावे- राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 16, 2011 AT 01:28 PM (IST)
 
नाशिक - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेसारख्या झंडू बामची युतीमध्ये गरज नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर आज (बुधवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी युतीनेच झंडू बाम लावीत बसावे, आम्हाला युतीची गरज नाही, असा टोला लगाविला आहे.

आजपासून नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना युतीचा प्रस्ताव नाकारला. राज म्हणाले, ''आम्हाला शिवसेना, भाजप आणि मनसे असा युतीचा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे आमचे धोरण आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते स्वतः बदनाम होतील.

मंगलवार, 15 फ़रवरी 2011

मनसे म्हणजे "झंडू बाम'

मनसे म्हणजे "झंडू बाम'
वृत्तसंस्था
Wednesday, February 16, 2011 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश करण्याची कल्पना मांडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना शिवसेनेने आज झटका दिला. मनसे म्हणजे "झंडू बाम' असून ही बाटली तुमच्याच खिशात ठेवा, असा खरमरीत इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "सामना'च्या अग्रलेखातून दिला.

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपला सत्ता मिळवायाची असेल, तर शिवसेना-भाजप यांच्याबरोबर मनसेला सोबत घ्या, असा आग्रह मुंडे यांच्याकडून गेल्या आठवडाभरापासून सुरू होता. शिवसेनेने मात्र मुंडे यांच्या कल्पनेतील त्रिपक्षीय युतीबाबत कुठेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे शिवसेना गप्प असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती; पण आज शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुखांनी मुंडे यांच्या कल्पनेतील स्वप्नांना थेट सुरुंग लावला. मनसे हा झंडू बाम असून त्यांच्यासमवेत युतीचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे या अग्रलेखात स्पष्टपणे सांगितले आहे; पण ज्यांना मनसे या "झंडू बाम'बरोबर युती हवी आहे, त्यांनी त्या बामची बाटली खिशातच ठेवावी, अशी उपरोधिक टीका शिवसेनाप्रमुखांनी अप्रत्यक्षरीत्या केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेल्या 22 वर्षांपासून झालेली ही युती म्हणजे "आदर्श घोटाळा' नसून राष्ट्रीय विचारांची उसळलेली लाटच आहे, असे स्पष्ट करतानाच ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील युतीकडे सगळ्यांचे लक्ष असते. त्यामुळे या युतीचा पाया मजबुत राहणार नसेल, तर लोक कळसही चोरून नेतील, असा उपरोधिक टोलाही मुंडे यांना मारला आहे.

मुंडे कोण बोलणारे?
शिवसेना-भाजप युतीमध्ये अन्य कुठला पक्ष पाहिजे वा नको, हे ठरविणारे व बोलणारे गोपीनाथ मुंडे कोण? असा रोखठोक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. युती ही एकट्या मुंडे यांची नाही, तर शिवसेना-भाजपची आहे. त्यामुळे युतीमध्ये कोण असावे व नसावे, याचा निर्णय शिवसेनाप्रमुख व उद्धव ठाकरे घेण्यास समर्थ आहेत. राजकारणात अशक्‍य असे शक्‍य करण्याची भाषा बोलणारे मुंडे हेही कधीतरी शिवेसेनेत येण्यास अतिशय उत्सुक होते, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.

मुंडेंचा मनसे युतीचा प्रस्ताव योग्यच

मुंडेंचा मनसे युतीचा प्रस्ताव योग्यच
सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, February 16, 2011 AT 12:45 AM (IST)
 
मुंबई - भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेण्याचा मांडलेला प्रस्ताव योग्यच असल्याचे मत शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांनी खासगीत व्यक्‍त केले आहे. मुंबईत मराठीपेक्षा हिंदी भाषकांचे प्रमाण अधिक असल्याने सत्तेच्या चाव्या राखण्यासाठी उद्धव आणि राज या दोन्ही भावांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे; मात्र त्यांच्यातून विस्तव जात नसल्याने हा प्रस्ताव पुढे न्यायचा तरी कसा, असा प्रश्‍न शिवसेना नेत्यांना पडला आहे.

मुंबई महापालिका हाती राखणे शिवसेनेसाठी आवश्‍यक आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने खेचलेल्या मतांमुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. मनसेचा जोर आजही कायम आहे का, याचा विचार करायला हवा; मात्र तो वस्तुनिष्ठपणे व्हावा, असा दृष्टिकोन सेनेत दबक्‍या आवाजात मांडला जात होता. त्यातच मुंडे यांनी तीन पक्षांची मोट बांधण्याचे विधान केले. शिवसेनेने "सामना' या मुखपत्रात अग्रलेख लिहून मुंडे यांचा प्रस्ताव धुडकावून लावला असला तरी भाषा नेहमीप्रमाणे जहाल नाही. मराठी मते एकत्र आल्याशिवाय सत्ता राखणे कठीण असल्याचे मत या पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुखांसमोर मांडणे अगदीच अशक्‍य नसल्याचे मानले जाते आहे.

शिवसेनेतील मैत्रीवादी गटाने मराठी टक्‍क्‍यांची; तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी तयार केली आहे. हा विषय समोर आणणे आवश्‍यक असल्याचे मत समविचारी नेत्यांच्या कानी घातले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यातून विस्तव जाणेही अशक्‍य असल्याने हा प्रस्ताव मान्य होणार नाही, याची कल्पना असली तरी मतांचे राजकारण लक्षात घेता तो मांडण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका नेत्याने नमूद केले.

योग्य वेळी हा प्रस्ताव शिवसेनाप्रमुखांसमोर एखाद्या वरिष्ठ नेत्यामार्फत मांडावा, अशा विचारात ही मंडळी असतानाच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे एकीकरणाची भूमिका मांडल्याने दोन्ही भावांना सावध होता आले. त्यामुळे आता ही मांडणी पूर्वीपेक्षा काहीशी कठीण झाल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत तीव्र आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतरही दोघांच्याही जागांत वाढ झाली ही भूमिका दोघे बंधू घेतील, अशी अपेक्षा पक्षातील नेते व्यक्त करीत आहेत.

राज ठाकरे उद्या नाशिकला

राज ठाकरे उद्या नाशिकला
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 15, 2011 AT 01:00 AM (IST)
 
नाशिक - महापालिकेच्या पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी (ता. 16) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या वेळी ते विविध बैठकांत नगरसेवक, तसेच पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती सचिव व विधिमंडळ उपनेते आमदार वसंतराव गिते, शहराध्यक्ष आमदार नितीन भोसले यांनी दिली. 

नाशिक हे राज्यातील प्रमुख महानगर असल्याने व येथील महापालिकेच्या निवडणुका येत्या वर्षात होत असल्याने विविध राजकीय पक्षांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आलेल्या "मनसे'च्या अपेक्षाही वाढल्या आहेत. या पक्षाच्या दृष्टीने आगामी निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. राज ठाकरे यांनी स्वतः त्यासाठी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नाशिकने "मनसे'ला दिलेली साथ लक्षात घेऊन त्यांनी आत्तापासूनच राजकीय व्यूहरचना करण्यास प्रारंभ केला आहे. कल्याण पालिकेतील चमकदार कामगिरीनंतर आता नाशिकवर "मनसे'चा झेंडा फडकावण्याचे स्वप्न पूर्ण करायचेच, असे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
येत्या बुधवारी राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सकाळी नऊला मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील वॉर्डप्रमुख, विभागप्रमुख, त्यानंतर दुपारच्या सत्रात पश्‍चिम विभागातील पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिशः चर्चा होऊन त्यांना श्री. ठाकरे भेटतील. सायंकाळी नगरसेवक व शहर पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल. गुरुवारी (ता. 17) सकाळी नऊला नाशिक पूर्व विधानसभा व दुपारच्या सत्रात नाशिक रोड मतदारसंघातील विभाग व वॉर्डप्रमुखांची बैठक होईल. महिला, वाहतूक, रोजगार-स्वयंरोजगार आदी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतुल चांडक व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

रविवार, 13 फ़रवरी 2011

सातारा-'मनसे जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घ्या'

सातारा-'मनसे जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घ्या'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 13, 2011 AT 02:47 PM (IST)
 

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर चुकीच्या तक्रारीवरून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मनसेचे माढा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यावरील गुन्हा शुक्रवारपर्यंत माघार घ्यावा, अन्यथा तालुकानिहाय आंदोलने केली जातील. तसेच कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी आज (रविवारी) येथे पत्रकार परिषदेत दिला.

सामाजिक कार्यातून जिल्ह्यात मनसे लोकांपर्यंत पोचली आहे. बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी व जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही पध्दतीने आंदोलन करीत आहेत, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, खटावचे तालुकाध्यक्ष संदीप गोडसे यांनी वडूज येथील बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पुदाले यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल आंदोलने केली. अतिक्रमण प्रश्‍नावर गोडसेंना जाणीवपूर्वक अडविण्याचा प्रयत्न केला. सध्या चोरीच्या गुन्हा दाखल करून त्यांना तुरूंगात ठेवले आहे. माढा मतदारसंघाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना खोट्या तक्रारीवरून दरोड्याच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्यांच्यावरील गुन्हे येत्या शुक्रवारपर्यंत मागे घ्यावेत. अन्यथा तालुकानिहाय आंदोलन केले जाईल. तसेच सर्व कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यात पवनचक्‍क्‍या कंपन्या व बोगस इन्शुरन्स कंपन्यांच्या विरोधात आम्ही आक्रमक भुमिका घेतली आहे. असे असताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल कयन त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होत आहे. यासंदर्भात मनसेच्या १३ आमदारांचे गटनेते आमदार बाळ नांदगांवकर यांनी पालकमंत्री व पोलिस अधीक्षक यांना पत्राव्दारे कळविले आहे. आगामी अधिवेशनात याबाबत मनसेचे आमदार प्रश्‍न उपस्थित करणार आहेत. आगामी काळात पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांना पक्षाचे पदाधिकारी भेटणार आहेत.

यावेळी शांताराम कारंडे, कऱ्हाड पाटण जिल्हाध्यक्ष विकास पवार, विद्यार्थी सेनेचे युवराज पवार, फिलिप भांबळ, नगरसेवक दादा शिंगण, आर. एल. सावंत, वाई उपजिल्हाप्रमुख मयूर नळ, सातारचे प्रशांत शिंदे, कऱ्हाडचे राजेंद्र केंजळे, महेश जगताप, किशोर भिंगाडे, बंटी माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.