बुधवार, 21 दिसंबर 2011

बेळगावप्रश्नी नितीन गडकरींशी चर्चा - राज

बेळगावप्रश्नी नितीन गडकरींशी चर्चा - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 21, 2011 AT 12:57 PM (IST)
नागपूर - बेळगाव सीमाप्रश्नी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी प्रवासादरम्यान विमानात चर्चा केली असल्याचे, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी हि माहिती दिली. कर्नाटकातील मराठी भाषिकांना कानडी आली पाहिजे, असे वक्तव्य करून चर्चेत आलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

राज ठाकरे म्हणाले, ''नितीन गडकरी यांच्याशी मी चर्चा केली असून, ते या विषयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेळगावप्रश्नी मी काय बोलतोय आणि सांगतोय हे न ऐकता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांकडून त्याचा विपर्यास केला जात आहे. नात्यांच्या चष्म्यातून राजकारणाकडे बघणे सोडून दिले पाहिजे. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष वेगवेगळे असून, यामध्ये दरवेळी भाऊबंदकी आणणे चुकीचे आहे. उद्धवबरोबर माझा वाद नसून, दोघांचे विचार वेगळे आहेत.'

सोमवार, 19 दिसंबर 2011

कर्नाटकातील मराठी माणसाला कानडी आली पाहिजे - राज ठाकरे

कर्नाटकातील मराठी माणसाला कानडी आली पाहिजे - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 20, 2011 AT 01:00 AM (IST)
मुंबई - सीमावासीयांसाठी शिवसेनेचे आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. अशा आंदोलनामुळे येथील आणि तेथील लोकांची डोकी फुटत आहेत. शिवसेनेला एवढाच जर हा विषय महत्त्वाचा वाटला होता, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) काळात सोक्षमोक्ष का लावला नाही, असा टोला "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला आहे. कर्नाटकात राहणाऱ्या मराठी माणसाला कानडी आलीच पाहिजे, याबाबत आपले दुमत नसून, तेथील मराठी संस्कृतीवर मात्र घाला घातला जात असल्याने त्याला आपला विरोध असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आज या पदाधिकाऱ्यांनी राज यांची भेट घेतली. त्या वेळी राज यांनी अशाच प्रकारे आंदोलन सुरू राहिल्यास पुढील 150 वर्षांत या विषयाचा सोक्षमोक्ष लागणे शक्‍य नसल्याचे सांगितले. मुळात या विषयावर मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानांना निवेदने देऊन काहीही उपयोग होणार नाही, त्याऐवजी "पर्याय' निवडण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कर्नाटक राज्यात राहत असताना कानडी भाषा आलीच पाहिजे. त्या त्या राज्यात राहताना तेथील भाषा बोललीच पाहिजे; पण त्याच वेळी कर्नाटक सरकारने मराठी संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा राज यांनी दिला. बेळगाव सीमावासीयांच्या विषयावर मी 21 डिसेंबरला भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. वेळ पडली तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने केंद्रात सत्ता असताना "एनडीए'चे तोंड न दाबल्यानेच ही वेळ आली आहे. न्यायालयातील खटल्यासाठी महाराष्ट्राचे वकील तब्बल आठ वेळा गैरहजर राहिले, याचा जाब विरोधकांनी कधीही सरकारला विचारल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात आल्यास तेथील जमिनीवर येथील सरकारची नजर आधी जाईल, असा इशारा देऊन योग्य सन्मान मिळत असल्यास नाहक आक्रमक आंदोलनाची गरज नसल्याचे सूतोवाच राज यांनी केले

शनिवार, 10 दिसंबर 2011

ठाण्याच्या निवडणुकीत दांडपट्टा चालवणार - राज

ठाण्याच्या निवडणुकीत दांडपट्टा चालवणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 11, 2011 AT 01:45 AM (IST)
ठाणे - हे ठिकाण जाहीर सभेचे नाही तर सांस्कृतिक मेळाव्याचे आहे, निवडणुकीचा हंगामही जानेवारीत सुरू होईल. त्यामुळे मनसेचा दांडपट्टा त्यावेळीच चालेल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात केले . उन्नती गार्डन येथे मनसेचे नेते सुधाकर चव्हाण यांनी गेला आठवडाभर आयोजित केलेल्या महाराष्ट्र धर्म महोत्सवाचा समारोप आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, राजकारणात 50 टक्के आरक्षण महिलांसाठी लागू झाल्यापासून सभांना होणारी महिलांची गर्दीही वाढत चालली आहे. रस्त्यांवर लागणाऱ्या होर्डिंग्स आणि पोस्टरवर महिला इच्छुकही झळकू लागल्या आहेत, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, आता या साऱ्याचा फैसला परीक्षेनंतर लागणार आहे. परीक्षेमुळे उमेदवारी कोणाला मिळेल हे सांगता येणार नसले तरी त्यानिमित्ताने त्यांना महापालिका कशी चालते याचा अभ्यास करता आला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. विजयराज बोधनकरांच्या व्यंगचित्रांचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले, माझाही हात शिवशिवतो, मात्र व्यंगचित्रे आता काढायला वेळच मिळत नाही, असे सांगून आता हात शिवशिवले की खळ्ळ्य....खट्ट्याक सुरू होते, असा टोला त्यांनी लगावला. आवश्‍यक तेव्हा मराठी साहित्याचे वाचन करतो, असे सांगून संदर्भासाठी हे वाचन नेहमी कामाला येते, असे त्यांनी सांगितले. आपण काही येथे भाषण करायला आलेलो नाही. त्यामुळे निवडणुकांच्यावेळी आपला दांडपट्टा चालेल, असे सांगून त्यांनी भाषण आवरते घेतले. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या शेकडो तरुणांची काहीशी निराशा झाली. यावेळी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सुधाकर चव्हाण यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शर्मिला ठाकरे, सरचिटणीस नितीन सरदेसाई, ठाणे जिल्हा संघटक मनोज चव्हाण, राजन गावंड आदी उपस्थित होते

मंगलवार, 6 दिसंबर 2011

पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे - राज

पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 07, 2011 AT 01:45 AM (IST)

मुंबई - कोणाचाही विरोध असला, तरी पेडर रोडचा उड्डाणपूल झालाच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेत, जर या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेणार असाल, तर यापुढील प्रत्येक उड्डाणपूल हा जनसुनावणी घेऊनच झाला पाहिजे, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (मंगळवार) दिला. त्यामुळे राजकीय विरोधामुळे या उड्डाणपुलावरून येत्या काळात राजकीय उड्डाणे सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्थानिकांच्या विरोधामुळे राज्य सरकारने पेडर रोडवरील उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रद्द केला. मुंबईतल्या या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. सरकारच्या या भूमिकेवर राज ठाकरे यांनी मंगळवारी जोरदार टिकास्त्र सोडले. उड्डाणपुलाला विरोध हा केवळ पेडर रोडवासीयांचा अजेंडा असून, मंगेशकर कुटुंबीयांना पुढे करून हा अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या उड्डाणपुलासाठी जनसुनावणी घेता, मग मुंबईतील इतर पूल, स्कायवॉक व मोनो रेल्वे उभारणीसाठी जनसुनावणी का नाही झाली, असा परखड सवाल करीत यापुढे पेडर रोडसाठी जनसुनावणी झाल्यास संपूर्ण मुंबईतील लोक जनसुनावणीला जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
पेडर रोडवासीयांच्या या भूमिकेचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, "मुंबईत रोजच्या रोज इतर प्रांतातून लोक येतात, गाड्या वाढतात, याबद्दल हे कधीही बोलत नाहीत. उद्या शिवाजी पार्क आणि वरळीतील रहिवासी सागरी सेतूवर आक्षेप घेतील. राज्यात होत असलेल्या प्रकल्पांना होणाऱ्या विरोधाबद्दल विचारले असता, हा विरोध राजकीय असेल तर मोडून काढला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

जयंत पाटील "चकित चेंडू'
या पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांची "चकित चेंडू' अशी खिल्ली उडवत त्यांची नक्कल राज ठाकरे यांनी केली. पाटील यांनी बोजा-बिस्तरा उचलून उपनगरात राहायला जावे, मग या उड्डाणपुलाबद्दल बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हा पूल भारतीयांसाठी आहे
हा पूल उभारल्यास आपण दुबईत राहायला जाऊ, असा इशारा ज्येष्ठ पार्श्‍वगायिका आशा भोसले यांनी दिला होता. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, आपल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपण भारतीय असल्याचे सांगितले होते. मग हे दुबई भारतात येते का हे माहीत नाही; पण हा पूल भारतीयांसाठी आहे. त्यांच्या परळच्या घराजवळदेखील उड्डाणपूल आहेच. त्यांनी दहा वर्षांपूर्वी हे विचार व्यक्त केले होते. मग त्याचा प्रतिध्वनी आताही ऐकू येतो का, असा सवालही त्यांनी केला.

वाहतूक पोलिस फक्त शिट्या वाजविणार काय?
गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेश सारंगी यांच्या मुलाला पोलिसांनी पकडल्यामुळे वाहतूक पोलिसांचे दंड वसूल करण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. मग हे पोलिस काय फक्त शिट्या वाजविणार काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आयएएस अधिकाऱ्याला झटका आला म्हणून का हा निर्णय घेण्यात आला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली

रविवार, 4 दिसंबर 2011

मनसेचा नगरसेवक होण्यासाठी 3156 जणं उत्सुक

मनसेचा नगरसेवक होण्यासाठी 3156 जणं उत्सुक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 04, 2011 AT 03:47 PM (IST)
मुंबई - महापालिकेच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज (रविवार) पार पडली. या परिक्षेसाठी राज्यभरातून 3156 उमेदवार बसले होते. राज्यात सहा ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली.

यात पुण्यातून 611, मुंबईतून 1208, नाशिक येथे 648, नागपुरातून 104, ठाणे 397 आणि पिंपरी-चिंचवड येथून 188 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल जाणून घेण्यास सर्वच उमेदवार उत्सुक आहेत, असे यातील काही उमेदवारांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.   

मंगलवार, 29 नवंबर 2011

टीकाटिप्पणीला महत्त्व देत नाही - राज ठाकरे

टीकाटिप्पणीला महत्त्व देत नाही - राज ठाकरे
-
Wednesday, November 30, 2011 AT 01:00 AM (IST)


मुंबई - आंदोलनाच्या काळात दगड घेणारा कार्यकर्ता तुमच्यातील पाहिजे आणि महापालिकेच्या महासभेत अभ्यासून बोलणारा नगरसेवकही तुमच्यामधीलच हवा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या उमेदवारांना केले. तसेच 4 डिसेंबरच्या लेखी परीक्षेनंतर बाहेरच्या साऱ्यांना मनसेच्या तिकिटाची दारे बंद होणार असल्याचे त्यांनी ठणकावले.

षण्मुखानंद सभागृहात आज इच्छुकांसह राज यांनी दुपारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी लेखी परीक्षेची भीती मनात न बाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. विरोधकांनी केलेल्या टीकाटिप्पणीला आपण महत्त्व देत नाही. मात्र, जो कार्यकर्ता आंदोलनाच्या काळात दगड हातात घेतो, त्यांच्यामधीलच एक जण महासभेत अभ्यासपूर्ण बोलताना मला पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी मुलाखत घेतल्यावर उमेदवार एकच असेल याची तुम्हाला कल्पना आहे ना, अशी विचारणा केल्यावर उपस्थितांनी होकार दिला. तसेच परीक्षेचे ओझे मनावर न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. केवळ ऑप्शन असलेले प्रश्‍न असल्याने लिखाणाचे काम नसल्याचा दिलासा त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना दिला

'मनसे'च्या इच्छुकांचा पहाटे अभ्यास

'मनसे'च्या इच्छुकांचा पहाटे अभ्यास
राजेंद्र बच्छाव - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 29, 2011 AT 03:45 AM (IST)

इंदिरानगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या चार डिसेंबरला इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि परिसरातील सर्वच इच्छुक उमेदवारांची दिनचर्याच बदलली आहे. एरवी रात्री एक-दोनपर्यंत कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करणारे अभ्यास करायचा आहे, असे सांगत दहालाच घराचा रस्ता धरत आहेत. सकाळी दहाला उठणारे पहाटे उठून पुन्हा अभ्यास करत आहेत.

महाविद्यालयात असताना कधी गांभीर्याने अभ्यास केला नाही. महाविद्यालयात एक तर खेळात किंवा राजकारणात धडाडी दाखवली. तेव्हादेखील अभ्यास म्हणजे केवळ वरच्या वर्गात जाण्यापुरता. अर्थात, वेळ मिळाला तर. अन्यथा पारंपरिक फिल्डिंग लावून उत्तीर्ण व्हायचे. आता मात्र करिअरचा प्रश्‍न असल्याने आणि साहेबांनी कोणताही अनुचित प्रकार न करण्याची तंबी दिल्याने गांभीर्याने अभ्यास करण्यावाचून पर्याय नसल्याने मोठी गोची झाल्याचे अनेकांनी सांगितले. काही ठिकाणी पती एका प्रभागातून, तर पत्नी शेजारच्या प्रभागातून इच्छुक असल्याने त्या घरांत तर धमालच आहे. दोघेही अभ्यासात व्यस्त आहेत. आता कोणता अभ्यास करत आहात, असा प्रश्‍न मुलं विचारतात, असे एका इच्छुकाने सांगितले. दोघांनी मग एकमेकांचा सराव घेणे आलेच. परीक्षेत अनुत्तीर्ण होऊन बेअब्रू होऊ नये म्हणून जीव तोडून अभ्यास करावा लागतोय, असे काहींनी सांगितले. ज्येष्ठ इच्छुकांची मात्र आणखीन पंचाईत झाली आहे. आई, अभ्यास केला का? किती प्रकरणे झाली?, असे प्रश्‍न कार्यकर्त्या मुलाकडून येत असल्याने उलटीच परिस्थिती झाली आहे. काहींनी तर चार तारखेपर्यंत पक्षाचे कार्यक्रम आणि प्रभागातील उपक्रम स्थगित केले आहेत. पुरुष गटातील इच्छुक कधी मित्रांच्या, तर कधी पत्नीच्या मदतीने झालेल्या अभ्यासाची उजळणी करत आहेत. तिकिटाच्या स्पर्धेत हा मोठा अडथळा असल्याने येथेच धडपडायला नको म्हणून प्रत्येकाची लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जोमाने सुरू केलेल्या नागरिकांच्या भेटीचा कार्यक्रम थांबविण्यात आला आहे. त्यात ही कमी शिक्षण असलेल्यांनी तर परीक्षेचा मोठा धसका घेतला आहे. नक्की स्वरूप काय असेल, याचा कुणालाच अंदाज नसल्याने काय करायचे या विवंचनेत ते आहेत. लिहिण्याचा वेगदेखील जेमतेम असल्याने आमचं काही खरं नाही, असा सूर ही मंडळी व्यक्त करत आहेत. परीक्षेमुळे इतर पक्षातून आयत्या वेळी येणारे बडे प्रस्थ लादण्यात येणार नाही, हे तरी किमान स्पष्ट झाल्याने बुडत्याला काडीचा आधार अशी परिस्थिती आहे. "मनसे'च्या परीक्षेच्या फतव्यामुळे सर्वच इच्छुकांनी कंबर कसली असून, कधी एकदा हे आटोपते आणि निकाल कळतो या प्रतीक्षेत सर्व जण आहेत

शनिवार, 26 नवंबर 2011

उमेदवारीच्या "इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल

उमेदवारीच्या "इंजिन'ला परीक्षेचा सिग्नल
मृणालिनी नानिवडेकर
Saturday, November 26, 2011 AT 02:00 AM (IST)

मुंबई वार्तापत्र



नवनव्या कल्पना मांडून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची शैली आहे. परीक्षा घेऊन उमेदवारी देण्याची त्यांची घोषणा त्या शैलीला साजेशीच आहे; पण मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गळी ती उतरवण्यात राज ठाकरे यशस्वी होणार का, हा खरा प्रश्‍न आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मतपेटीने दिलेल्या नेत्रदीपक यशापूर्वी राज ठाकरे यांची ओळख होती ती अत्युत्कृष्ट दर्जाचे इव्हेन्ट मॅनेजर अशी. घटना, कार्यक्रम, विषय कोणताही असो, राज ठाकरे त्यांच्या कल्पक, कलात्मक आयोजनाने तो प्रसंग एका उंचीवर नेऊन ठेवतात. एखाद्या विषयाची पार्श्‍वभूमी तयार करण्यासाठी ते जे नेपथ्य उभे करतात, ते अजोड असते, हा आजवरचा अनुभव. निवडणूक अगदी तोंडावर आली असताना त्यांनी या पोतडीतून परीक्षा बाहेर काढल्या आहेत. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, अशी घोषणा करून राज यांनी तमाम पब्लिकला खूष करून टाकले आहे. किमान पात्रता असलेला नेताच आपला प्रतिनिधी असावा, हा फंडा जनतेला भलताच भावल्याने, मनसेची पूर्वप्रसिद्धी काहीही न करता झाली आहे.

राजकारणात अशा परीक्षांना स्थान असू शकते काय, या प्रश्‍नाने राजकारण्यांना घेरले असतानाच आपला प्रतिनिधी किमान पात्रतेचा तर असेल, या भावनेने मतदार सुखावले आहेत. संभाव्य महाआघाडीला आणि मजबूत महायुतीला जी प्रसिद्धी महत्प्रयासाने मिळणार नाही, ती परीक्षेच्या एका छोट्याशा निर्णयाने मनसने मिळवली आहे. काही वॉर्डांपुरती मर्यादित शक्‍ती असलेली राज ठाकरेंची नवनिर्माण सेना मुंबई महापलिका निवडणुकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे...निदान सध्या तरी.

पदार्पणातच मिळालेल्या लोकप्रियतेची कमान अधिकाधिक वर नेणे राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान आहे. त्यातच हा संपूर्ण पक्ष त्यांच्या व्यक्‍तिगत करिष्म्याभोवती विणला गेला असल्याने, यशापयश कमालीचे व्यक्‍तिगत ठरणारे आहे. शिवसेनेला आव्हान देत बाहेर पडलेले बंडखोर राज ठाकरे एकीकडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उत्तम संघटनात्मक बांधणी अशी दुहेरी ताकद असलेले उद्धव दुसरीकडे, असा हा सामना आहे. तो मुळातच विषम आहे. मात्र घराबाहेर पडणाऱ्याला संघर्ष करावा लागतो. अवतीभवतीचे लोक त्याच्या बंडाकडे फार अपेक्षेने बघतात. बंडखोराची सरशी झालीच तर बाजू बदलायची काय, याचे अंदाज आडाखे कार्यकर्ते मनातल्या मनात बांधत असतात. त्यातच प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेल्या जनतेने राज यांना लगेचच उचलून धरले. महिला- तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने, या नव्या पक्षाला मतपेढीच मिळाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा चार कोनांत विभागलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाचवा भिडू समोर आला. आंबेडकरी जनतेनेही या नव्या भिडूला कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वीकारले. मनसेचा टीआरपी एकदम वाढला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसमोर मनसेने पेच उभा केला. मात्र मुंबई- ठाणे राखत मोठ्या भावाने खिंड लढवली. कल्याण- डोंबिवली महापालिकेत दोन्ही बंधूंचे पक्ष जनतेच्या पसंतीस उतरल्याने भाजपचा धुरळा उडाला. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघेही गोंधळले. मुळात कल्याण- डोंबिवलीत आघाडीला फारसे गमावण्यासारखे काही नव्हतेच. पण ठाकरे बंधूंच्या कामगिरीची पुनरावृत्ती अन्यत्र घडली तर कठीण पडेल, हे कॉंग्रेस- राष्ट्रवादीने ताडले आहे. भाउबंदकीच्या या खेळात राज्य राखता आले; पण महापालिकेत हाती काहीच न लागल्याने सत्ताधारी आघाडी अस्वस्थ झाली. या धड्यामुळेच ठाणे-मुंबईत ते एक होऊ पाहत आहेत.

दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तर ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी सत्ता राखण्याची कसोटी ठरेल, तर राज यांची शक्‍ती जोखणारे आव्हान. महाआघाडीचे आव्हान पेलण्यासाठी शिवसेनेने संघटनात्मक तयारीचे शस्त्र परजले आहे. शाखा गेल्या महापालिका निवडणुकांपासूनच सक्रिय आहेत. रामदास आठवले यांच्यामुळे वॉर्डगणिक दोनशे ते पाच हजारांपर्यंत जाणाऱ्या मतांची नवी कुमकही उद्धव ठाकरेंच्या दिमतीला आहे. आघाडीच्या छत्राखाली अमराठी उत्तर भारतीय, बिहारी, दलित, मुसलमान एकत्र आलेच तर त्यावर मात करण्यासाठी मराठी माणसाच्या घरात थेट चुलीपर्यंत पोहोच असलेल्या संघटनात्मक ताकदीचे उत्तर शिवसेनकडे आहे. मनसेकडे ही ताकद पूर्णत: वळलेली नाही. त्यांचे बहुतांश आमदार अद्याप चाचपडताहेत. शाखाप्रमुख कमालीचे नवखे आहेत. महापलिकेच्या महाभारतात ही कुमक पुरेशी नाही, याची जाणीव असल्याने राज यांनी त्यांचे बुद्धिकौशल्य पणाला लावलेले दिसते. आज बोरीवली, शिवडी, दादर आणि भांडूप या भागांत मर्यादित असलेली ताकद वाढवण्यासाठी राज यांनी कल्पकतेचा आसरा घेतलेला आहे. बदललेल्या राजकीय वातावरणावर स्वार होत उच्च आणि मध्यमवर्गीय मतदारांची ते मोट बांधू बघतात. शिकल्या-सवरलेल्या लोकप्रतिनिधींचे मतदाराला आकर्षण असते. निवडणूक जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या निष्ठूर कसरतींची कल्पना नसलेली जनता अशा प्रतिकात्मकतेने खूष होते. लोकलमधील गर्दी, ऑटोरिक्षांचा मनमानी कारभार अशा कित्येक गोष्टींमुळे मुंबईकर दररोज वैतागतो. सगळ्या ताणाचे मूळ अकार्यक्षम नेतृत्वात असल्याचे तो दररोज स्वत:लाच पटवून देतो. परीक्षा उत्तीर्ण करणारे अशा रूढ चेहऱ्यांपेक्षा वेगळे असतील, ही अपेक्षा जागवण्यासाठी राज सरसावले आहेत. परीक्षा पास झालेल्यांनाच उमेदवारी दिली काय, याच्या कहाण्या यथावकाश समोर येतीलच. राज "खळ्‌ळ खटाक...'ची भाषा जाणणाऱ्या त्यांच्या अनुयायांना अशा निर्णयासाठी राजी करू शकतात का? परीक्षेत तावूनसुलाखून बाहेर पडलेला किमान क्षमतेचा उमेदवार स्वीकारणे मतदाराला आवडेल. पण हा वर्ग मराठी-अमराठी वादावर होणाऱ्या राड्यांना मान्यता देईल काय, हे राज यांनी स्वत:लाच विचारावे. क्‍लास आणि मास यांना एकाच वेळी बरोबर ठेवण्याचे कसब राज यांना साधावे लागणार आहे. दगड मारणारी सेना चर्चेच्या टेबलपर्यंत नेण्याचे काम कार्याध्यक्ष उद्धव यांनी केले. मनसे त्याच मार्गावर जाणार असेल तर ते दिलासादायक ठरेल.

मंगलवार, 22 नवंबर 2011

मनसेच्या तिकिटासाठी परप्रांतीयही इच्छुक

मनसेच्या तिकिटासाठी परप्रांतीयही इच्छुक
मंगेश फदाले ः सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 23, 2011 AT 03:00 AM (IST)

मुंबई - महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमधील हौशे, नवशे आणि गवशे कार्यकर्त्यांमध्ये तिकीट मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र काही पक्षांनी सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही नुकत्याच कुलाब्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यानंतर या मुलाखतींसाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे इच्छुकांमध्ये आठ अमराठी होते.

मुंबईच्या विकासाची ब्लूप्रिंट घेऊन मनसे मैदानात उतरेल यात शंकाच नाही; परंतु मराठी भाषक आणि परप्रांतीयांचा मुद्दाही त्यांच्या अजेंड्यावर असेल यात शंका नाही. मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे नागरी सुविधांवर पडणारा ताण आणि निर्माण होणाऱ्या समस्या यावर मनसेच्या प्रचाराचा जोर असेल. मनसेची परप्रांतीयांविषयीची भूमिका माहीत असतानाही कुलाब्यातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या आठ आहे. म्हणजे कुलाबा विधानसभा मतदारसंघातील पालिकेच्या सात प्रभागांपैकी जवळपास प्रत्येक प्रभागातून एका परप्रांतीयाला मनसेचे तिकीट हवे आहे. अर्थात यापैकी किती जणांना उमेदवारीची लॉटरी लागेल, याविषयी आताच काही भाष्य करणे अवघड आहे.

कुलाबा विधानसभा मतदारसंघात मनसेच्या एकूण 34 इच्छुक उमेदवारांमध्ये परप्रांतीय असलेल्या आठ जणांमध्ये गिरगावातील चारपैकी तीन जण गुजराती भाषक आणि एक जण राजस्थानी आहे. तर नेव्हीनगर ते क्रॉफर्ड मार्केट या परिसरात चार जण उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील मूळ रहिवासी आहेत.

कुलाब्यातील एकूण मतदार संख्या दोन लाख 10 हजार असून त्यापैकी 54 हजार मराठी भाषक मतदार आहेत. "मनसे हा केवळ मराठी भाषकांचा पक्ष आहे, असा परप्रांतीयांचा समज आहे; परंतु राज यांच्या प्रभावामुळे बहुभाषक नागरिकही मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून पुढे आले आहेत, ही बाब पक्षाच्या दृष्टीने चांगली आहे,' असे मनसेचे कुलाबा तालुका अध्यक्ष अरविंद गावडे यांनी "सकाळ'ला सांगितले.

राज यांचा विरोध परप्रांतीयांना नाही
"मनसेचा विरोध उत्तर भारतीय किंवा बिहारींना नाही तर त्यांच्यात असलेल्या प्रवृत्तीला आहे. त्याचबरोबर मुंबई शहरात येऊन थडकणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना आहे. उत्तर भारतीयांच्या मनात राज ठाकरेंबद्दल रोष असण्याचे कारण नाही. त्यांचा अभ्यास आणि एखाद्या समस्येसंदर्भातील मुद्देसूद मांडणी यामुळे आम्हीही प्रभावित आहोत, असे एक उमेदवार रूपाली सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले

Raj thakre 22112011 p2

Raj Thakre 22112011 p1


परीक्षेनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेणार- राज

परीक्षेनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेणार- राज
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 22, 2011 AT 06:42 PM (IST)

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) घेण्यात येत असलेल्या परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ही परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांच्या आपण मुलाखती घेणार आहोत, असे "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

"मनसे'च्या मागदर्षक पुस्तिकेचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मनसे'च्या परीक्षेचे जनतेकडून स्वागत होत आहे. या परीक्षेचा शिवसेनेला त्रास होणं स्वाभाविक आहे. पहिल्यांदाच मी, अशा प्रकारचा प्रयोग करतो आहे. टीका करणाऱ्यांनी जरूर टीका करावी. मात्र, या परीक्षेला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. उमेदवारी देण्यापूर्वी परीक्षा घेण्याच्या पद्धतीचे त्यांनी जोरदार समर्थन केले.' एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली.

दरम्यान, महाराष्ट्राचे नवनिर्माण करताना पक्षाचे संभाव्य लोकप्रतिनिधी अभ्यासू असावेत, यासाठी मनसेच्या वतीने उमेदवारांच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले

शनिवार, 19 नवंबर 2011

उमेदवारीसाठी परीक्षा द्यावी लागणार - राज

उमेदवारीसाठी परीक्षा द्यावी लागणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 19, 2011 AT 04:02 PM (IST)
ठाणे - येत्या काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोणताच उमेदवार निश्चित नाही. निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिका-यांचा मेळावा षण्णमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, महापालिका आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाला लेखी परीक्षा द्यावीच लागणार आहे. मला सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर परीक्षा द्यावी लागेल. येत्या ४ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकांसाठी राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी ही लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवडणुकीसाठी कोणचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी या भ्रमात राहू नये. लेखी परीक्षेत पास झालेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती मी स्वतः घेईन आणि निवडणुकीचे तिकीट देईन, असे राज यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकांच्या उमेदवार निश्चितीसाठी राज्याच्या विविध भागात येत्या ४ डिसेंबरला सकाळी ११ ते साडे बारा या वेळात मनसे पदाधिका-यांच्या लेखी परीक्षा पार पडणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचे फॉर्म वाटप होणार असून, २२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत भरलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्जासाठी १ हजार रूपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक परीक्षार्थी इच्छुकाला हॉल तिकीट देण्यात येईल आणि परीक्षेत पास झाल्याशिवाय मुलाखतीला बोलावणार नाही. एखाद्या वॉर्डात एकही योग्य उमेदवार सापडला नाही तर तो वॉर्ड ऑप्शनला टाकेन. त्याठिकाणी मनसे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा राज यांनी केली.

राज ठाकरेंची आज षण्मुखानंदमध्ये राजकीय आतषबाजी

राज ठाकरेंची आज षण्मुखानंदमध्ये राजकीय आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 19, 2011 AT 01:00 AM (IST)

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 18) माहीममधील कोळी महोत्सवात राजकीय टीका-टिप्पणी टाळली. पण उद्या (ता. 19) षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात राजकीय आतषबाजी होण्याचे संकेत त्यांनी दिले.

मनसे आमदार नितीन सरदेसाई यांनी माहीम कॉजवे येथे आयोजित केलेल्या कोळी महोत्सवाचे आज राज ठाकरे यांनी उद्‌घाटन केले. यावेळी जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी या अभिनेत्यांसह आमदार बाळा नांदगावकर, शिक्षक सेनेचे संजय चित्रे आदी उपस्थित होते. या भूमिपुत्रांच्या महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत, असे राज यांनी सांगितले. या खाद्यमहोत्सवात राज यांच्यासह त्यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशीही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या.

सोमवार, 14 नवंबर 2011

गांधी कुटुंबामुळेच उत्तर प्रदेश मागासलेला - राज

गांधी कुटुंबामुळेच उत्तर प्रदेश मागासलेला - राज सकाळ वृत्तसेवा Tuesday, November 15, 2011 AT 01:00 AM (IST) मुंबई - उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ गांधी कुटुंब आणि कॉंग्रेसनेच सत्ता उपभोगली आहे. त्यांच्यामुळेच तेथील विकास थांबला आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशातील लोकांना महाराष्ट्रात जाऊन भीक न मागण्याचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधी यांना समज नाही, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. उत्तर प्रदेशातील लोकांनी महाराष्ट्रात जाऊन भीक मागू नये, असा सल्ला कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज दिला. या वक्तव्याचा खरपूस समाचार आज सायंकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला. महाराष्ट्राबाबत टीकाटिप्पणी करणाऱ्या अशा नेत्यांना आम्ही भीक घालत नाही आणि यापुढेही भीक घालणार नाही, असे त्यांनी सुनावले. उत्तर प्रदेशातून निवडून येऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी 17 वर्षे, इंदिरा गांधी यांनी 15 वर्षे आणि राजीव गांधी यांनी पाच वर्षे पंतप्रधानपद भोगले आहे. तेथूनच संजय गांधी लोकसभेवर गेले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधीही त्याच राज्यातून निवडून येतात. गांधी कुटुंबाला सातत्याने विजयी करणाऱ्या उत्तर प्रदेशात विकास झालाच नसल्याने तेथील लोकांना स्थलांतर करावे लागते. हे गांधी कुटुंबाचे अपयश आहे, असे टीकास्त्र राज यांनी सोडले. या विषयावर अधिक माहिती पाहिजे असल्यास राहुल यांची महाराष्ट्रात फुकटची शिकवणी घेण्यास आपण तयार आहोत, असे राज म्हणाले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राहुल गांधींच्या सल्ल्याचा कॉंग्रेसला फटका बसेल, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. मराठी माणसापासून रोजगाराच्या संधी लपवण्यात आल्या. आताही रेल्वेभरतीसाठी तब्बल साडेपाच लाख युवकांनी अर्ज दाखल केले आहेत. यापुढे नोकऱ्यांच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांतून दिल्याच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत होतो. अफजल गुरूला माफ करण्याचा प्रयत्न ओमर अब्दुला करतात. पण त्यांच्यावर कोणीही टीका करत नाही. असा प्रकार जर महाराष्ट्रात घडला असता, तर सर्व देश तुटून पडला असता, असा शेरा राज यांनी मारला

शनिवार, 22 अक्तूबर 2011

दोन्ही कॉंग्रेस स्वबळावर, तर भाजप मनसेबरोबर

दोन्ही कॉंग्रेस स्वबळावर, तर भाजप मनसेबरोबर गोविंद घोळवे : सकाळ वृत्तसेवा Sunday, October 23, 2011 AT 04:30 AM (IST) मुंबई/पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंतच्या घडामोडींवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर निवडणुकांना सामोरे जातील, असे दिसते आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षातील एक गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, भाजपच्या या प्रयत्नांना शिवसेनेकडून साथ मिळालेली नाही. पुणे ः खडकवासला पोटनिवडणुकीतील विजय हा "मनसे'मुळे झाल्याची खात्री भाजप-शिवसेना युतीतील नेतृत्वाला पटली आहे. मात्र, उघड बोलून शिवसेनेची नाराजी स्वीकारण्यापेक्षा गप्प बसणे बरे, अशी भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. त्याच वेळी, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद व पिंपरी-चिंचवड महापालिकेत युतीला सत्ता मिळवायची असेल तर मनसेला बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही, असेही भाजपला वाटत आहे. "राज्यातील आघाडीची सत्ता राज ठाकरेंमुळे गेली. मुंबई महापालिकाही हातातून जाऊ शकते. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर आपण केवळ विरोधी पक्षनेता कोणाचा, यासाठी भांडत राहायचे काय,' असा सवाल युतीतीलच काही नेते करीत आहेत. "आम्हास उघडपणे याविषयी बोलता येत नाही,' अशी भावना शनिवारी अनेक नेत्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली. "ज्यांना एकत्र येता येत नाही त्यांना महाराष्ट्राचे सरकार काय चालविता येईल,' असा शाब्दिक हल्ला दोन्ही कॉंग्रेसने चढविला होता. तरीही दोन्ही ठाकरे बंधूंची एकमेकांबद्दल चांगली प्रतिक्रिया नाही. या पार्श्‍वभूमीवर, दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचे बोलले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले युतीला भेटल्यामुळे भविष्यात मनसेची आपल्याला गरज नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र, खडकवासला पोटनिवडणुकीत "मनसे'ने मनापासून काम केल्यामुळेच विजय सुकर झाला, असे युतीच्या स्थानिक नेत्यांना वाटते. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांसाठी खडकवासला पॅटर्न राबविला तरच विजय मिळेल. अन्यथा, केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत बसावे लागेल, असे भाजप नेतृत्वास वाटत आहे. मुंबई महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर शिवसेना-भाजपला सत्तेच्या जवळही जाता येईल की नाही, याविषयी युतीतील अनेक नेत्यांना शंका वाटत आहे. त्यामुळे "मनसे'ला जवळ करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे व पुणे, पिंपरी-चिंचवडचे संघटनमंत्री श्रीकांत भारती यांनी "मनसे'बद्दल अनेक वेळा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे भाजपमधील नेते मंडळी पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते.

बुधवार, 19 अक्तूबर 2011

'राज्यातील पालिकांमध्ये मनसे सत्तेवर येणार '

'राज्यातील पालिकांमध्ये मनसे सत्तेवर येणार ' सकाळ वृत्तसेवा Thursday, October 20, 2011 AT 01:15 AM (IST) मुंबई - येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाकडे पक्षप्रमुख आणि पदाधिकारी महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच पाहत आहेत. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी पदवीधर मतदारसंघाची नोंदणी मोठ्या संख्येने करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवीत मुंबईसह इतर महापालिका या वेळी जिंकणारच, असा विश्‍वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मंगळवारी (ता.18) दुपारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मनसेचे मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले. कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत सत्ता येता येता राहिली आहे; पण मुंबई, ठाण्यासह इतरत्र होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसे विजयी होणारच, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज यांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी चढाओढ लागणार आहे. कारण याच नोंदणीच्या बळावर महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीची मागणी करणे या पदाधिकाऱ्यांना सुलभ होणार आहे. खडकवासल्याच्या निवडणुकीत मनसेचा उमेदवार नसल्याने निसटता का होईना; पण भाजप- शिवसेना- रिपब्लिकन महायुतीला विजय मिळाला आहे. या उलट मुंबई आणि ठाण्यात मजबूत प्रभुत्व असलेल्या मनसेच्या शिलेदारांबरोबर महायुतीच्या प्रत्येक शिपायाला लढावे लागणार आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडून आपला गड कायम राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा वातावरणात आतापासूनच मनसेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश राज यांनी दिल्याने महापालिकेच्या "कॉंटे की टक्कर'चा कोणाला फायदा होणार, याबद्दल सध्या केवळ अंदाज बांधले जात आहेत.

मंगलवार, 4 अक्तूबर 2011

रिक्षाचालकांची मुजोरी चालू देणार नाही - राज

रिक्षाचालकांची मुजोरी चालू देणार नाही - राज सकाळ वृत्तसेवा Tuesday, October 04, 2011 AT 04:27 PM (IST) मुंबई - "रिक्षा चालकांचे आंदोलन म्हणजे कायदा वाकविण्याचा प्रकार आहे. रिक्षाचालकांच्या मागण्या या कायदाबाह्य आहेत, त्यामुळे मुजोरी चालू देणार नाही' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले. रिक्षा चालकांना दरमहा 25 हजार रुपये मिळतील, एवढी भाडेवाढ द्यावी आणि सरकारी कर्मचाऱ्या दर्जा द्यावा, या मुंबई रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांची मागणी आहे. मागणीसाठी रिक्षाचालकांनी मोर्चा, निदर्शने, अघोषित संपाचा दबावाचा प्रयत्न चालवा आहे. ठाकरे म्हणाले, रिक्षा चालकांच्या मागण्या कायदाबाह्य आहेत. अनधिकृत मीटर लावण्याबाबत शरद राव काहीच बोलत नाहीत. 97 टक्के कारवाई झालेल्या रिक्षा, टॅक्‍सींमध्ये 95 टक्के उत्तर भारतीय आहेत. अनेक रिक्षा, टॅक्‍सींना अनधिकृत मीटर आहेत. याविरोधात कारवाईचा विचार केला तर नेते संपाची भीती दाखवतात. त्यामुळे सज्जन रिक्षावाल्यांनी युनियनच्या नेत्यांच्या नादी लागून नये. रिक्षा चालकांच्या मुजोरीस उत्तर देऊ. आजपर्यंत लोकांनी भोगले आहे, उद्या रिक्षावाले भोगतील.' रिक्षा चालकांची मुजोरी राहिल्यास, शरद राव यांना घरातून बाहेर पडू देणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

बुधवार, 21 सितंबर 2011

राज-उद्धवच्या "रिऍलिटी शो'मध्ये छोटासा ब्रेक!

राज-उद्धवच्या "रिऍलिटी शो'मध्ये छोटासा ब्रेक! - Thursday, September 22, 2011 AT 03:00 AM (IST) महाराष्ट्रात "भाऊबंदकी'चा रिऍलिटी शो सुरू होऊन जवळपास सहा वर्षे झाली. एकीकडे घरातल्या छोट्या पडद्यावर कुंकू, वहिनीसाहेब अशा मालिका सुरू असतात आणि त्यांना वैतागून चुकून बातम्यांची मराठी चॅनेल्स लावली, की तिथं हा "रिऍलिटी शो' सुरू असतो. मनोरंजन वाहिन्यांना या अशा जीवघेण्या कौटुंबिक मालिकांचे शूटिंग करण्यासाठी दणदणीत पैसे खर्च करावे लागत असतात; पण या दोन भावांनी मात्र वृत्तवाहिन्यांना खमंग आणि झणझणीत मसाला, शिवाय तो "टीआरपी'च्या हमीसकट पुरवण्याचं कंत्राटच घेतलं आहे की काय देव जाणे? - आणि मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने दोनच दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या 550 कोटी रुपयांच्या कंत्राटात साटंलोटं झाल्याचा आरोप "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असला, तरी वृत्तवाहिन्यांना चटकदार मसाला पुरवण्यासाठी या दोन भावांनी घेतलेल्या कंत्राटात मात्र एक पैशाचाही घोळ झालेला नाही! पण या "रिऍलिटी शो'चा आणखी एक एपिसोड फुकटात शूट करता येईल, म्हणून "कृष्णकुंज'वर बुधवारी जमलेल्या तमाम व्हिडिओग्राफर्सची भलतीच निराशा झाली, ती राज यांनी या नव्या एपिसोडच्या शूटिंगसाठी दिवाळी होईपर्यंत थांबण्याची घोषणा केल्यामुळे. राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधूंमधील वाग्‌बाणांमुळे लोकांची करमणूक तुफान होत असली, तरी त्यामुळेच या दोघांनाही लोकांच्या वास्तवातील प्रश्‍नांचीही जराही फिकीर नाही, असंच वाटू लागलं होतं. दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी तर हा कलगीतुरा इतक्‍या शिगेला पोचला की राज्यातील सर्वच्या सर्व, 288 मतदारसंघांत राजविरुद्ध उद्धव अशीच लढत सुरू असल्याचं चित्र त्यामुळे प्रसारमाध्यमांतून उभं राहिलं होतं. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रचारमोहिमेतही पुन्हा तोच "रिप्ले' झाला. मराठी माणसांची करमणूक जरूर होत होती; पण त्याचे प्रश्‍न मात्र रस्त्यावरच पडून राहत होते. कारण मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नाशिक-औरंगाबाद अशा राज्याच्या मोठ्या शहरी भागातील महापालिका या शिवसेनेच्याच कब्जात आहेत आणि साहजिकच तेथील नागरी समस्या सोडविण्याची जबाबदारीही त्याच पक्षाची आहे. अर्थात, राज्यातील कॉंग्रेस आघाडीचं सरकार आणि विशेषतः नगरविकास खातं सातत्यानं आपल्याकडे ठेवणारे मुख्यमंत्री हे त्यामध्ये खोडा घालत असणार, हे गृहीत धरलं तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी नाकारता येणं कठीण आहे. त्यामुळेच आता अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे निवडणूक आचारसंहिता जारी होण्याआधीच सारी कामं ठप्प होऊन जातात की काय, अशी भीती निर्माण झाली होती. पण राज ठाकरे यांनी घेतलेल्या या ब्रेकमुळे त्यावर पडदा पडला आहे. अर्थात, आता पुन्हा या ब्रेकचा काही विपरीत अर्थ लावून उद्धव यांनी त्यावर बोलणं थांबवायला हवं. कारण लोकांना आता छोट्या पडद्यावरील तथाकथित "रिऍलिटी शो'बरोबरच या वास्तवातील जुगलबंदीचाही तितकाच कंटाळा आला आहे. लोकांना आता दिसताहेत ती महापालिका क्षेत्रांत झालेली तसेच न झालेली विकासकामे आणि ती करणारे वा त्यात खोडा घालणारे राजकारणी. त्यामुळेच आता कोण जंगलात जाणार आणि कोण खड्ड्यांत जाणार, याचा निकाल मतदारराजाच पुढच्या चार महिन्यांत देणार आहे. ते राज यांनी उद्धव यांना आणि उद्धव यांनी राजला सांगण्याचं काही कारणच उरलेलं नाही. तरीही दिवाळीनंतर आपले फटाके पुन्हा वाजवण्याची धमकी राज यांनी दिली आहेच. आता ते फटाके म्हणजे वैयक्‍तिक उखाळ्यापाखाळ्या काढणारे बॉंब नसतील, तर जनहिताचे प्रश्‍न ऐरणीवर आणणाऱ्या माळा असाव्यात, एवढीच इच्छा व्यक्‍त करण्यापलीकडे मतदारांच्या हातात काय आहे? - प्रकाश अकोलकर

Raj Thakre 2192011 2

Raj Thakre 2192011

सोमवार, 19 सितंबर 2011

Raj Thakre on 20 sept

Raj Thackeray speaking with media persons at Sabarmati Gandhi Ashram, Ahmedabad, Gujarat

'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा'

'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा' सकाळ वृत्तसेवा Tuesday, September 20, 2011 AT 01:00 AM (IST) मुंबई - अन्य राज्यांत जाऊन जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढले असते, तर आपण किती "माती' केली ते कळले असते. फोटोग्राफीची हौस फिटली असती आणि जनतेचेही भले झाले असते, असा सणसणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवरून लगावला. राज यांनी उद्धव यांचे थेट नाव घेतले नसले तरी मुंबई महापालिकेतील आगामी आरोप प्रत्यारोपांची धुळवड यानिमित्ताने सुरू झाली, असे मानले जाते. राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर आज सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अन्य राज्यात जाऊन महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांचा शिवसेनेच्या मुखपत्रात आज समाचार घेण्यात आला होता. त्याबाबत विचारणा केली असता, राज्यावर कोणीही टीका करत नसून नाकर्त्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. महाराष्ट्राची बदनामी कोणी करू शकत नाही. त्याची बलस्थानेही कोणी नाकारू शकत नाही, असे राज यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तसेच अडवानी यांनी मोदी भावी पंतप्रधान म्हणून योग्य असल्याचे सांगितल्यावर आपल्याला बरे वाटले. राज्याचा विकास करणारा माणूस पंतप्रधान झाल्यास देशासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. अमेरिकेनेही त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. ही भाजपची अंतर्गत बाब असली, तरी विकासाच्या मुद्द्यावर मोदींना पंतप्रधान झालेले पाहण्यास आपल्याला निश्‍चित आवडेल, असे राज यांनी सांगितले. गुजरातमध्ये 24 तास वीज आहे. संपन्न महाराष्ट्राची येथील सत्ताधाऱ्यांनी वाट लावली आहे. राज्यातील भारनियमन, आत्महत्या, रस्त्यांवरील खड्डे, नागरिकांच्या विरोधातील कंत्राटे या मुद्द्यांवर बोलायचे नाही, तर कशावर बोलायचे, असा प्रश्‍न त्यांनी केला. आम्ही राज्यावर टीका करीत नसून येथील राज्यकर्त्यांबद्दल बोलतोय. चांगले काम करणाऱ्या राज्याबद्दल बोलायचे नाही तर काय करायचे. बाळासाहेब 1982 मध्ये अमेरिकेत जाऊन आल्यावर तेथील विकासकामांचीही त्यांनी स्तुती केली होती. गुजरातमधील महापालिका नफ्यात आहेत. आमच्या मात्र संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. 72 टक्के खर्च वेतनावर होतोय. उरलेले उत्पन्न खाबुगिरीमध्ये जातेय. माझा कोणत्याही राज्यावर रोष नाही. उद्या बिहारने बोलावले, नितीशकुमारांचे आमंत्रण आले, तर तिकडेही जाईन. नितीशकुमार काम करतात, ही चांगली बाब आहे. परप्रांतीय भूमिपुत्रांना आणि त्यांच्या भाषेला नाकारतात. त्यामुळे मी त्यांना विरोध करतो. अण्णांना मी दूरध्वनीवरून पाठिंबा दिला होता; पण त्यांच्या बाजूला असलेल्या बेदी आदी चौकडीला भेदून जाण्यासाठी मी काही अभिमन्यू नाही; मात्र अण्णांची भेट लवकरच घेणार असल्याचे राज यांनी सांगितले. भाजपला लाथा खाण्याची सवय नरेंद्र मोदींच्या मैत्रीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या आपण जवळ जात आहात का, असा प्रश्‍न राज यांना विचारण्यात आला. त्या वेळी आपण कोणाबरोबरही जाण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे ते म्हणाले. भाजपला एवढी वर्षे शिवसेनेच्या लाथा खाण्याची सवय लागली असल्याची कडवट टीकाही राज यांनी या वेळी केली

मोदींप्रती सदभावनेसाठी राज ठाकरे गुजरातेत

मोदींप्रती सदभावनेसाठी राज ठाकरे गुजरातेत वृत्तसंस्था Monday, September 19, 2011 AT 12:29 PM (IST) अहमदाबाद - सदभावना मिशन अंतर्गत तीन दिवसांचे उपोषण करीत असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) उपोषणाच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पाहणे आपल्याला आवडेल असे म्हटले आहे. अहमदाबाद येथे सुरु असलेल्या मोदींच्या उपोषणस्थळी राज ठाकरे यांनी आज सकाळी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलला अमेरिकेने देखील प्रमाणपत्र दिलेले आहे. मोदींवर असलेले दंगलीचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असल्याने त्यांनी समर्थन करण्यात काहीच गैर नाही. अमेरिकन काँग्रेसच्या एका अहवालात मोदींचे देशाच्या विकासात असलेल्या योगदानाबद्दल दखल घेणे उल्लेखनीय आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या विकासाचा दर हा ११ टक्के राहिला आहे. त्यावरून गुजरात हे प्रगतीप्रथावर असल्याचे दिसून येते. गुजरातच्या शांतीसाठी सदभावना मिशन अंतर्गत नरेंद्र मोदी शनिवारपासून तीन दिवसांचे उपोषण करीत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा शेवटचा दिवस असून, एनडीएमधील नेत्यांनी त्यांची या दरम्यान भेट घेतली आहे. मात्र, नितीश कुमार यांनी मोदींच्या या उपोषणावर टीका केली आहे.

शुक्रवार, 16 सितंबर 2011

मुंबई वार्तापत्र - मराठी मतांसाठी पुन्हा फिल्मी "राज'कारण

मुंबई वार्तापत्र - मराठी मतांसाठी पुन्हा फिल्मी "राज'कारण मृणालिनी नानिवडेकर (सकाळ न्यूज नेटवर्क) Saturday, September 17, 2011 AT 12:15 AM (IST) मराठी मतांवर दावा सांगण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहेत. एका जाहिरातीत मराठी महिलेचा झालेला वापर म्हणूनच त्यांना खटकला की काय, अशी शंका येते. असे भावनिक राजकारण करून मतपेटी मजबूत होते का हे आता पाहायचे. निवडणुका आल्या की कारभाराचे ऑडिट देण्यापासून खड्डे मोजण्यापर्यंतची सारी आन्हिके नव्या उत्साहात सुरू होतात. मराठीचा विषयही तसाच समोर आला आहे. जाहिरातीत मराठी माणसाला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचा विषय घेऊन राज ठाकरे महापालिकेच्या फडात उतरण्यास सज्ज झालेले दिसतात. कुणाचे मराठीपण अधिक प्रखर हे दाखवण्यासाठी जुन्या आणि नव्या सेनेतला सामना नेहमीप्रमाणे रंगत जाईल. यात मराठी माणसाच्या, मराठी अस्मितेच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्‍नांना खरोखरच न्याय मिळेल का? छोटे ठाकरे गुजरातेतून नुकतेच परतले आहेत. त्यामुळे या वेळचे मराठीपुराण क्रियाशीलतेवर भर देणारे असेल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी. मुंबई-पुणे-नाशिकचा सुवर्णत्रिकोण ओलांडू न शकलेली प्रगती, संपन्न म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अर्धी जनता दारिद्य्ररेषेच्या खाली, नागरी भागातील झोपड्यांत होणारी वाढ, दाक्षिणात्य राज्यांनी औद्योगीकरणात मारलेली बाजी, मराठी भाषेची सातत्याने होत असलेली पीछेहाट, असे अनेक प्रश्‍न महाराष्ट्रासमोर आ वासून उभे आहेत. प्रत्यक्षात या प्रश्‍नांना हात घालण्याऐवजी प्रतीकात्मक मुद्‌द्‌यांनाच राज ठाकरे धरून बसणार का, या उत्तरात जनतेला रस आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष साटेलोटे करून आपल्याला लुटतात, अशी जनभावना आहे. त्यामुळेच राजकीय क्षितिजावर नव्यानेच उगवलेल्या मनसेकडे जनता फार अपेक्षेने पाहते. त्यातच गुजरातचा दौरा करून आपल्याला प्रगतीत रस आहे, असे चित्र निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले आहेत. "ठाकरे ब्रॅंड'चे यश मराठी माणसाच्या प्रश्‍नांना त्यांनी हात लावताच मध्यमवर्गीय उत्साहाने कान टवकारतात, तर आता नक्‍कीच काही तरी बदल होईल, ही वेडी आशा निम्नमध्यमवर्गींयात जागी होते. हे "ठाकरे ब्रॅंड'चे यश आहे. दशदिशांतून येणाऱ्या कुशल-अकुशल कामगारांच्या जोरावरच कुठलेही महानगर विकसित होत असते. प्रादेशिकतेची कुंपणे घालून प्रगती होत नसते हे सत्य. पण त्या त्या शहरातल्या मूळ रहिवाशांचे अस्तित्व या प्रक्रियेत हरवू लागले, की गोंधळ सुरू होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी माणसाला आवाज कुणाचा हे ठणकावून सांगण्याचे धैर्य दिले. दाक्षिणात्यांकडे गेलेल्या नोकऱ्या लोकाधिकाराने मराठी माणसाकडे परत पोचवल्या. त्यांचा शत्रूही हे वास्तव नाकारू शकणार नाही. पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत समोर येण्याचे परिश्रम करण्याची साहसी वृत्ती मराठी माणसांत निर्माण झाली नाही. दहा ते पाच काम करून घरी परतण्यात धन्यता मानणारा मराठी माणूस जीवनाच्या नवनव्या क्षेत्रांना कवटाळण्यासाठी फारसा उत्सुक नसतो, हा समज सर्वमान्य होत गेला. महाराष्ट्रातल्या मुंबईत बॉलिवूड वाढले; पण मराठी सिनेइंडस्ट्री मात्र कोल्हापुरातच रमली. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठी माणसाची पीछेहाट पानिपतच्या पराजयाने झाली की मनोवृत्तीने ते सांगता येणार नाही; पण आपण मर्यादित राहिलो हे मात्र खरे. पांडू हवालदार, गंगूबाई अशा स्वरूपात चित्रपटसृष्टी मराठी माणसाचे चित्र रेखाटू लागली. "सारांश'सारख्या अद्वितीय चित्रपटात सदाचाराचा आग्रह धरणारा निवृत्त मुख्याध्यापक मराठी दाखवला. पण अशी उदाहरणे विरळा. एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत हॅंडसेट चोरणारी बाई मराठी दाखवल्याने राज ठाकरे संतापले आणि त्यांनी ही जाहिरात मागे घ्यायला लावली. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी देऊन टाकला. "खळळ खटाक'च्या भीतीने या पुढे कुणीही अशी कृती करणार नाही. पण खरे प्रश्‍न पुढेच आहेत. मुळात अशी प्रतीकात्मक कृती निवडणुकीमुळे केली काय हा जनतेच्या मनात येणारा पहिला प्रश्‍न. येती महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंमधील संघर्षाचा नवा सामना ठरणार आहे. भाऊबंदकीच्या कथा आपल्याला महाभारत काळापासून आवडत असल्याने चॅनेलवाले टीआरपीसाठी दोघांमधले कलगीतुरे रंगवण्यास प्राधान्य देतील. अंतर्गत वादामुळे मुंबई पालिकेतला प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस निवडणूक लढण्यापूर्वीच हरल्यात जमा आहे. आघाडी होईल काय याबाबतची धूसरता कायम आहे. पालिकेचा कारभार फारसा समाधानकारक नाही; मात्र त्याविरोधात औषधालाही कॉंग्रसने आवाज केलेला नाही. मुंबईची सत्ता मराठी माणसाच्या हातात राहावी, या उदात्त हेतूने कॉंग्रेसने नेहमीच शिवसेनेला मोकळीक दिल्याचे राजकीय अभ्यासक नमूद करतात. मात्र या मराठी मतांवर दावा सांगण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरेंचे नेतृत्व, शिस्तबद्ध शाखांची उत्तम बांधणी, रिपब्लिकन मतांची संभाव्य बेरीज अशी रसद घेऊन उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत, तर प्रतिमा हे राज यांच्याजवळचे एकमेव भांडवल आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकही अशीच झाली होती. मुंबईत नेमके काय घडेल याचा अंदाज यायला अद्याप वेळ आहे. मात्र मराठी माणसांचे प्रश्‍न केवळ मतांसाठी हाती घेतले जातील काय, हा प्रश्‍न मात्र आजच निर्माण झाला आहे. मासेमारीपासून तर कॉर्पोरेट पदापर्यंतचे सारे व्यवहार परप्रांतीयांच्या हाती आहेत. मोदींनी गुजराती माणसातल्या उद्यमशीलतेला आवाहन करीत ते राज्य समोर आणले. बाळासाहेब आणि राज या दोघांचे राजकारणही त्याच पठडीतले आहे. संकुचित दृष्टिकोनाचा स्वीकार ठाकरेंनी केला; पण प्रगतीचा अजेंडा देण्याचे काय? १९९५ नंतर महाराष्ट्राची पीछेहाट का होत गेली, याची उत्तरे राज्यकर्त्यांना सेनेने विचारली नाहीत. आज राज ठाकरेंचे मराठीपणाचे कढ हे केवळ भावनिक राजकारण पेटवण्याचा प्रयत्न वाटतो आहे एवढेच

सत्ता शिवसेनेची, कंट्रोल राज ठाकरेंचा!

सत्ता शिवसेनेची, कंट्रोल राज ठाकरेंचा! सुनील जावडेकर ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेत सारी मोट बांधून शिवसेनेने मनसेकडे जाणारी सत्ता खेचून आणली असताना प्रत्यक्षात पालिका कारभारावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच कंट्रोल जाणवतो. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह ठाण्यातील शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरेच कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांमध्ये अधिक स्वारस्य दाखवू लागल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि कॉंग्रेस आघाडीतील भांडणापेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईमुळे गाजली होती. शिवसेनेचे 32; तर मनसेचे 28 उमेदवार विजयी झाले. किमान 15 ते 20 जागांवर मनसेचे उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झाले; अन्यथा राज यांच्या करिष्म्यामुळे मनसेचे किमान 40 नगरसेवक सहज निवडून आल्यात जमा होते. त्यामुळे अखेर शिवसेनेचा महापौर झाला आणि मनसेला विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले. सत्ता मिळाली नसली, तरी विरोधी पक्षात बसलेल्या राज ठाकरे यांनी विकासकामांच्या पाहणीच्या निमित्ताने, तर कधी रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी करण्याच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महापालिकेवरील त्यांची पकड अधिक मजबूत करण्यास सुरवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांमध्ये अधिक लक्ष घालत असल्याने आणि पालिका आयुक्तांसह प्रशासनाला आदेश देत असल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले आहेत. आतापर्यंत कल्याण, डोबिवलीच्या इतिहासात पालिकेतील विरोधी पक्षाचा कोणताही पक्षप्रमुख इतक्‍या वेळा विकासकामांबाबत महापालिकेत आलेला नाही. मुळात विरोधी पक्षाने त्यांचे अस्तित्व कधी दाखवू दिले नाही; पण राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटींनी शिवसैनिकांची झोप उडवली आहे. आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये राज ठाकरे यांचा शब्द कल्याण-डोंबिवलीत अंतिम मानला जाऊ लागला आहे; तर शिवसेना-भाजप युतीची सत्ता असलेल्या पालिकेवर कंट्रोल राज ठाकरे यांचाच चालत असल्याची उघड भावना शिवसैनिकांमध्ये तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीत व्यक्त होऊ लागली आहे

बुधवार, 7 सितंबर 2011

सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर

सेना-मनसेने एकत्र यावे - नाना पाटेकर
-
Wednesday, September 07, 2011 AT 04:00 AM (IST)

मुंबई - मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना व मनसेने एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज केले. मराठी माणसाचे मत एकच असल्याने ते मत तुम्ही कापून घेणार काय, असा प्रश्‍नही त्यांनी या पक्षांना उद्देशून केला.

शिवसेना हा मराठी माणसाचा आधार होता; मात्र तुम्ही त्यातून मनसे हा वेगळा पक्ष का स्थापन केलात, असा थेट सवाल नानांनी मुलाखतकार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांना विचारला. त्यावर महाभारतातील कृष्णाच्या दुर्योधनासोबतच्या अयशस्वी शिष्टाईचे उदाहरण देऊन पारकर यांनी तसे होणे अशक्‍य असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. मुंबई गणेश महोत्सव-2011 अंतर्गत "नाना रंग' हा नाना पाटेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम "महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान'तर्फे साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.

अण्णा हजारे यांचे व त्यांच्या आंदोलनाचे पाटेकर यांनी कौतुक केले; मात्र ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या आयुष्यातून भ्रष्टाचाराचे पूर्ण निर्मूलन होईल, तेव्हाच अण्णांच्या आंदोलनात सामील होईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. "टीम अण्णा'मधील किरण बेदी व अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. राजकारणात जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले

मंगलवार, 6 सितंबर 2011

"राज ठाकरेंचा गुजराती मतावर डोळा नाही''

"राज ठाकरेंचा गुजराती मतावर डोळा नाही'
वृत्तसंस्था
Tuesday, September 06, 2011 AT 06:33 PM (IST)मुंबई- ""आगामी महापालिका निवडणुकीत गुजराती समाजाच्या मतावर डोळा ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला नव्हता, तर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला राज्याचा विकास पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी तो दौरा होता. '' अशी माहिती मनसेचे नेते आणि आमदार बाळा नांदगावकर यांनी आज (मंगळवारी) दिली.

ते म्हणाले,"" राज ठाकरे यांना गुजरातचा दौरा करायचा होता. मात्र त्यांची आणि मोदींच्या समन्वयाबाबत तारीख निश्‍चित होत नसल्याने दौरा लांबत गेला. शेवटी गेल्या महिन्यात राज यांना गुजरातचा दौरा करावा लागला. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली की ते पुन्हा गुजरातचा दौरा करणार आहेत. त्यामुळे मनसेचा गुजराती मतांवर डोळा आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांविषयी बोलताना नांदगावकर म्हणाले, की वास्तविक गुजरात आणि महाराष्ट्राची एकाच दिवशी स्थापना झाली. गुजरात मात्र महाराष्ट्राच्या पुढे गेला. आम्ही मागे राहिलो. त्यांनी विकास कसा केला. याची दखल घेण्याची गरज आहे.''

नांदगावकर यांनी यावेळी शिवसेना-भाजपवरही टीका केली ते म्हणाले, ""मुंबईकरांनी युतीला महापालिकेत सत्तेवर आणले, मात्र ते आता वीस वर्षांनी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी लोकांसमोर कोणत्या चेहऱ्यांनी ते जाणार आहेत.'

बुधवार, 17 अगस्त 2011

अण्णा हजारे यांच्या अटकेवर मनसे तटस्थ

अण्णा हजारे यांच्या अटकेवर मनसे तटस्थ
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 17, 2011 AT 03:15 AM (IST)

मुंबई - जनलोकपाल विधेयकावरून आंदोलन छेडणाऱ्या अण्णा हजारे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ भूमिका घेतली आहे. मनसेच्या काही उत्साही आमदारांनी सुरुवातीला अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला खरा; पण त्याच वेळी "कृष्णकुंज'वरून आलेल्या आदेशानंतर पक्षाने तटस्थतेची भूमिका घेतल्याचे कळते.

अण्णांच्या उपोषण आणि आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते. पण राज यांचा आंदोलनाला पाठिंबा वा विरोध नसल्याचे आज (ता.16) स्पष्ट झाले. काही पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. परंतु याच वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते

शुक्रवार, 12 अगस्त 2011

राज ठाकरे मुंबईत परतले

राज ठाकरे मुंबईत परतले
सकाळ वृत्तसेवा
Saturday, August 13, 2011 AT 03:45 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दहा दिवसांच्या गुजरात दौऱ्यानंतर आज सकाळी मुंबईत आगमन झाले. सकाळी सव्वाअकरा वाजता गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून जेट एअरवेजच्या विमानाने आलेल्या राज यांचे मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर सव्वाबारा वाजता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना गुजरात भेटीचे निमंत्रण दिले होते. मोदी यांचे निमंत्रण स्वीकारल्यापासून राज यांच्या गुजरात दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनीच निमंत्रण दिल्याने राज यांना गुजरातमध्ये "स्टेट गेस्ट'चा दर्जा आपोआपच मिळाला. राज ठाकरे यांनी आपल्या दहा दिवसांच्या गुजरात दौऱ्यात तेथील विकास झालेल्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या; तसेच दररोजच पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी नरेंद्र मोदी व गुजरातच्या विकासाचे कोडकौतुक केले. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्‍तिमत्त्व असल्याचे सांगून त्यासाठी मनसे त्यांना पूर्णपणे पाठिंबा देईल, अशी घोषणा केली. राज यांच्या गुजरात दौऱ्याकडे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ते आता कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

गुरुवार, 11 अगस्त 2011

राज ठाकरे आज परतणार

राज ठाकरे आज परतणार
सकाळ वृत्तसेवा
Friday, August 12, 2011 AT 03:45 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी हातभार लागावा यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या गुजरात दौऱ्याची सांगता आज झाली. आपल्या नव्या अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधलेल्या राज यांचे उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रूझ विमानतळावर आगमन होणार आहे.

राज यांनी 3 ऑगस्टपासून गुजरातचा दौरा सुरू केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. गुजरात पोलिसांच्या फौजफाट्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी गुजरातमधील प्रकल्पांची पाहणी केली. नोकरशहा आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेल्या या विकासकामांची राज यांनी मुक्तकंठाने स्तुती केली आहे. एवढेच नव्हे, तर भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आहे. राजकीय पक्षातील मतभेद बाजूला ठेवून केवळ विकासाचा अभ्यास करण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या राज यांचे मोदी यांनीही जाहीरपणे कौतुक केले.

बॅड आणि ब्रॅण्ड
गुजरातच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरची जाहिरात आल्यावर "ते' तिकडे गेले असावेत, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांचे नाव न घेता केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून "बॅड ऍम्बेसेडर' असण्यापेक्षा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असणे केव्हावी उत्तमच, असा टोला राज यांनी लगावला आहे.

मंगलवार, 9 अगस्त 2011

मी मुंबईकर, मी मराठी अन्‌ "हूं गुजराती!'

मी मुंबईकर, मी मराठी अन्‌ "हूं गुजराती!'
प्रकाश अकोलकर
Tuesday, August 09, 2011 AT 03:00 AM (IST)
 

राज ठाकरे यांनी गुजरात दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

राज ठाकरे सध्या गुजरातेत आहेत. सोबत पत्रकार आहेत, त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील जाणकारही. कुणी व्यवस्थापन शास्त्राचा तज्ज्ञ आहे, तर कुणाचा विदेशी राजनीती आणि अर्थनीती यांचा अभ्यासक आहे. कोणी सामाजिक कार्यात आपली हयात घालवलेली आहे. "हा आपला अभ्यासदौरा आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही,' असं राज यांनी आधीच सांगून टाकलं आहे. पण दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी "टीम राज'चं जातीनं स्वागत करून "टीम राज'ला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.

राज यांनी या दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या असताना, मुंबईतील ४० लाखांच्या आसपास असलेल्या गुजराती समाजाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांच्यावर राज स्तुतिसुमनं उधळत आहेत. समजा, यात काही व्यावहारिक राजकारण नाही, तरी भावनेच्या पातळीवर होणाऱ्या राजकारणाचं काय? राज यांनी टायमिंग तर मोठं अचूक साधलंय!

ंमुंबईतल्या गुजराती समाजाची पहिली तार अशा रीतीनं छेडल्यावर राज महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विसरलेले नाहीत. अहमदाबादेत राज प्रथम साबरमती आश्रमात जातील, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर विश्‍वास ठेवणं कठीण गेलं असतं. पण, राज साबरमती आश्रमापाठोपाठ थेट पोरबंदरला, महात्माजींच्या जन्मगावीही गेले. शिवाय, वल्लभभाईंनाही आदरांजली वाहायला ते विसरले नाहीत. सर्व स्तरांवरील गुजराती समाज "कनेक्‍ट' राहावा म्हणून केलेली ही आखणी होती. भले, यात राजकारण नसेलही कदाचित... पण या दौऱ्यामुळे निदान मुंबईतील गुजराती समाजानं तरी सुटकेचा निःश्‍वास नक्‍कीच सोडला असणार. कारण राज शिवसेनेतून बाहेर पडून सहा वर्षं उलटली असली, तरी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरवातीच्या काळात उत्तर भारतीयांविरोधात केलेली हिंसक आंदोलनं मुंबईकर अद्याप विसरलेले नाहीत. खरं तर राज यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र!' करण्याआधीच उद्धव यांनी शिवसेनेच्या "मी मराठी' या बाण्याला "मी मुंबईकर' असं समंजस स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. १९६०च्या दशकात शिवसेना स्थापन झाली, तेव्हा त्या संघटनेचा "यूएसपी' म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट "मी मराठी' असणं जितकं स्वाभाविक होतं, तितकंच जागतिकीकरण आणि शिवाय पुढे घेतलेला हिंदुत्वाचा वसा या पार्श्‍वभूमीवर एकविसाव्या शतकात तो "मी मुंबईकर' असणं अपरिहार्य होतं. वैचारिक स्थित्यंतराची ही प्रक्रिया जितकी नैसर्गिक होती, तितकीच ती अर्थातच राजकीयही होती. पण, त्यावर शिवसेनेतच वादळं उठली. मराठी माणसाला आपण वाऱ्यावर तर सोडत नाही ना, असे सवाल केले गेले आणि अखेर रेल्वे बोर्डाच्या परीक्षेस येणाऱ्या उत्तर भारतीयांना कल्याण स्थानकावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरी मारहाण केली. "मी मुंबईकर' या संकल्पनेचं विसर्जनही तिथंच कल्याण रेल्वे स्थानकात झालं. खरं तर हिंदुत्व हा श्‍वास असेल, तर मराठी हा प्राण आहे किंवा हिंदुत्व प्राण असेल, तर मराठी श्‍वास आहे, अशी भाषा शिवसेनेच्या व्यासपीठावरून त्याआधी सुरू झालीच होती. त्यामुळे एकीकडे मराठी बाणा कायम ठेवून ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची झूल पांघरण्यात आली होती, त्याच धर्तीवर पुढे "मी मुंबईकर' ही मोहीम शिवसेनेनं राबवायला हवी होती; पण, आपल्या मराठी व्होट बॅंकेला खिंडार पडेल, या भीतीनं त्याकडे पाठ फिरवण्यात आली. मराठी मतपेढीला खिंडार अखेर पडलंच, पण ते दोन वर्षांनी, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर. त्यामुळेच आताच्या राज ठाकरे यांच्या या गुजरात दौऱ्यामुळे अनेक प्रश्‍न विचारता येऊ शकतात. राज यांनी आता "हूं गुजराती...' असा आवाज लावण्याचं खरं कारण आपल्याला कळणं कठीण आहे. पण, राज यांचं मोदींवर पूर्वापार प्रेम आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका २००७ मध्ये झाल्या, तेव्हाही त्यांनी आपले खास दूत म्हणून शिशिर शिंदे यांना अहमदाबादेत पाठवलं होतं आणि शिंद्यांनीही मोठ्या प्रेमानं मोदी यांची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कदाचित या दौऱ्यामागे राजकारण नसेल आणि तो "फ्रेंडशिप डे'च्या निमित्तानं आयोजित केलेला मैत्री सप्ताहही असू शकतो.

पण, एक गोष्ट मात्र विसरता येणार नाही; राज ठाकरे हे कधीतरी आपल्यापुढे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार आहेत. त्यांच्यासाठी ही स्टडी टूर असू शकते. त्याला गुजरातचा विकास कारणीभूत असणार. पण नेमक्‍या याच काळात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचाही चांगलाच विकास झाला आहे. गुजरातनं मारलेल्या मजलेपेक्षा बिहारच्या प्रगतीचं महत्त्व मोठं आहे, कारण ती शून्यातनं झालेली निर्मिती आहे. राज यांनी आता लगोलग बिहारचाही अभ्यासदौरा केला, तरच गुजरात दौऱ्यामागे राजकारण नाही, असं आपण ठामपणे म्हणू शकू!

'मनसे'ला युतीत आणायला मोदींचे 'मन'से प्रयत्न

'मनसे'ला युतीत आणायला मोदींचे 'मन'से प्रयत्न
गोविंद घोळवे : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 09, 2011 AT 11:57 AM (IST)
 

मुंबई- राज ठाकरेंच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात युती राज येणे असंभव असल्याची जाणीव भाजप आणि शिवसेनेच्या नेते मंडळींना आहे. भाऊबंदकीत कोण पडणार, या भीतीपोटी आजतागायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर घरोबा करण्यासाठी कोणी आक्रमक प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता मनसेला बरोबर घेण्यासाठी मनापासून प्रयत्न सुरू केले असल्याने भविष्यात आजचे कट्टर शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात.

शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्‍ती झाल्यानंतर शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभेतील मुलूख मैदान तोफ असणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कार्यशैली लाभलेले राज ठाकरेंनी "विठ्ठल सध्या बडव्यांच्या ताब्यात आहे,' असे म्हणत शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्यामुळे महाराष्ट्राचा हा विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झाला होता. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. कार्यकर्त्यांना कोणता झेंडा हाती घ्यावा, हे कळत नव्हते.

मागील विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला काही जागा सोडून सेना-भाजपबरोबर घ्यावे, असा प्रयत्न भाजप नेते मंडळींकडून केला गेला. कधी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, तर कधी खासदार गोपीनाथ मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सर्वांची मागणी फेटाळून लावली. उलट पुन्हा असा विषय उपस्थित केला तर खबरदार म्हणत वेळप्रसंगी युती तोडू, असा इशारा दिला होता. त्यामुळे कोणी मनसेला सोबत घेण्याचे नावही काढत नव्हते. या निवडणुकांमध्ये मनसेने मुंबई, नाशिक, ठाणे व पुणे शहरात आपले चांगले खाते उघडून १३ आमदार निवडून आणले. त्यानंतरच मनसेचा प्रभाव व ताकद सर्व पक्षांना कळली; परंतु सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना कोण विनंती करणार? असा प्रश्‍न भाजप नेतृत्वाला पडला होता.
खा. मुंडे यांनी आपण मनसेला आगामी काळात बरोबर घेण्याचा प्रयत्न करू, राजकारणात काहीही असंभव नसते. आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. यामुळे "नथिंग इज इम्पॉसिबल' असे ठणकावून सांगितले होते; परंतु त्यांच्या वक्‍तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गोंधळ उडाला होता. सेना-भाजप युती तुटणार अशी शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, सेना कार्याध्यक्षांनी हे खा. मुंडे यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगत "नो-कॉमेन्ट्‌स', अशी संयमी आणि शांत भूमिका घेतली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी मनसेला सहकार्याची भूमिका घ्या, अशी गळ सेना नेतृत्वाला घातली होती; परंतु सेनेची भूमिका बदलण्यात भाजप नेतृत्वाला अद्याप यश आलेले नाही. मात्र, शेवटचा प्रयत्न म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांपासून गुजरातच्या दौऱ्यावर असणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बडदास्त एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तीसारखी ठेवली असून दहा टक्‍के गुजरात प्रशासन राज यांच्या सेवेला पाठविले आहे.

राज्यात दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे; परंतु दोघेही पाच वर्ष एकमेकांना संपविण्याची भाषा बोलतात. अनेक विकास प्रकल्पांना थांबवून एकमेकांवर कुरघोडी करतात. मात्र सत्ता वाटून घेतात, असे आता दस्तुरखुद्द सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच पिंपरी-चिंचवड दौऱ्यात सांगितले आहे. हाच धागा पकडून आता मोदी पुन्हा एकदा राज्यात युतीचेच राज आणण्यासाठी दोघा भावांना एकत्र आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. भाजप वर्तुळातही अशी चर्चा होत आहे.

यासंदर्भात विधानसभेतील शिवसेना गटनेते आमदार सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला अशी शक्‍यता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. ""लोक अनेक राज्यात पर्यटनासाठी दौरे करीत असतात, तसा हादेखील एक दौरा असू शकतो,'' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

नितीशकुमार नाराज
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राज ठाकरे यांचे केलेले स्वागत पाहता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मात्र भाजपवर प्रचंड नाराज आहेत. यासंदर्भात संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते

शनिवार, 6 अगस्त 2011

राज ठाकरेंच्या प्रतिमेचे गुजरात कॉंग्रेसकडून दहन

राज ठाकरेंच्या प्रतिमेचे गुजरात कॉंग्रेसकडून दहन
सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, August 07, 2011 AT 03:00 AM (IST)

अहमदाबाद - गुजरातचे "पाहुणे' म्हणून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या प्रतिमेचे राज्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राजकोट येथे आज दहन केले. महाराष्ट्रात परप्रांतीयांविरोधात भूमिका घेणाऱ्या राज यांना एवढा मानसन्मान का दिला जात आहे, असा प्रश्‍न पक्षाने सरकारला विचारला आहे.

राज ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी भेटी देऊन पाहुणचार घेणाऱ्या राज यांच्याविरोधात भूमिका घेण्याची कॉंग्रेसला तीन दिवसांनंतर आज अचानक आठवण झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकोट येथे राज यांच्या प्रतिमेचे दहन केले

राज हळवा आहे... मित्रांबाबत जरा जास्तच!

राज हळवा आहे... मित्रांबाबत जरा जास्तच!
अतुल परचुरे
Sunday, August 07, 2011 AT 05:45 AM (IST)
 


राज आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. मी रुपारेल कॉलेजमध्ये होतो, तेव्हा राज तिथं भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायला यायचा. त्या काळात आम्ही मित्र झालो. 1984 -85 चा तो काळ होता. चित्रपट आणि संगीत या दोन गोष्टींमुळं आम्ही जवळ आलो. राजनं एखाद्याला आपला मित्र मानलं की मानलं. मग त्यात कुठलाही अडसर येऊ शकत नाही.

राजनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा मी त्याच्याबरोबर असणार हे त्यानं गृहीत धरलेलं होतं. दोन मित्र जसे एकमेकांशी अनेक बाबी शेअर करतात व एखादी नवीन गोष्ट करताना आपला जवळचा मित्र आपल्याबरोबर असेल, असं गृहीत धरतातच, तसं ते होत. त्यामुळं "मनसे'त मी आहे, यात विशेष काही नाही. माझ्यातील कलाकारावर राजचं प्रेम आहे. मला त्यानं कधी "मनसे'साठी हे कर, ते कर' असं सांगितलं नाही. आमच्यातील मैत्रीत खाणं, जेवणं आणि चित्रपट या विषयांवर नेहमी चर्चा होते. राज एकटा चित्रपटाला कधी जाणार नाही, खायला एकटा कधी जाणारं नाही, त्याला कोणी ना कोणी मित्र बरोबर लागतोच. मग तो काहीजणांना फोन करेल आणि त्यांना घेऊन जाईल.

आम्ही काही रोज एकमेकांना फोन करत नाही; पण जेव्हा केव्हा करतो, तेव्हा केवळ गप्पा आणि गप्पा हे समीकरण ठरलेलं असतं. त्याच्या राजकीय मोठेपणाचं मला कधीही दडपण वाटलेलं नाही. एखाद्‌दुसऱ्या मित्राबरोबर सुख-दुःखाचे क्षण आपण ज्या सहजतेने शेअर करतो, तसेच राजच्या बाबतीत माझे आहे. मध्यंतरी माझी बायको अमेरिकेला गेली होती, त्या वेळी राजही तेथेच होता. ती न्यूयॉर्कहून मुंबईला यायला निघाली होती; पण तिला तिकिटाच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाली. मी त्याला हे सांगितल्यानंतर त्यानं ती समस्या सोडवली. अर्थात हा एक प्रसंग झाला. असे अनेक प्रसंग मी सांगू शकेन. तो स्वभावानं खूप हळवा आहे आणि मित्रांच्या बाबतीत तर जरा जास्तच.

"वा ! गुरू ' हे माझं नाटक पाहायला तो आला होता. त्यातील शेवटच्या प्रवेशात माझा मोठा संवाद आहे आणि भावनेला हात घालणारी वाक्‍ये आहेत. ती भूमिका करताना माझ्या डोळ्यांत पाणी येतं. हा प्रयोग पाहिल्यावर मला तो म्हणाला, ""काय रे, हे रडवणारं नाटक.'' त्या प्रयोगानंतर तो बराच वेळ अपसेट होता. आमच्या दोघांचा वीक पॉईंट म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. त्याचं गाणं हे आमच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे

गुरुवार, 4 अगस्त 2011

गुजरातमध्येही राज यांचा मराठी बाणा

गुजरातमध्येही राज यांचा मराठी बाणा
राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 04, 2011 AT 05:00 AM (IST)

अहमदाबाद - गुजरातमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सरकारी दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मात्र, त्याच वेळी काही बाबतीत महाराष्ट्र मागे पडताना दिसत असला तरी औद्योगिक आदी क्षेत्रात महाराष्ट्र अद्याप पुढेच आहे, असे सांगून त्यांनी आपला मराठी बाणाही जपला.

राज यांच्या दौऱ्याबाबत गुजरातमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. मुंबईत भाजपच्या जवळ जाण्याचे एक पाऊल म्हणूनही या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. तसेच केवळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी राज गुजरात दौऱ्यावर जात असल्याचे म्हटले जात होते; पण स्थानिक वार्ताहरांनी वारंवार विचारणा करूनही राज यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारवर टीका टाळली.

ते म्हणाले, आजच्या घडीला देश पातळीवर विकासाकडे वेगाने जात असलेले राज्य म्हणून गुजरातकडे पाहिले जात आहे. मलाही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली नवनवीन योजना गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचा विकास हा माझा ध्यास आहे, गुजरातमधील विकास प्रकल्पांची पाहणी करतानाच येथील सरकार आणि नोकरशहा हातात हात घालून कसा कारभार करतात, याबद्दल आपणास उत्सुकता असल्यानेच आपण गुजरातमध्ये आलो असल्याचे राज यांनी सांगितले.

सरदार पटेल यांच्या स्मारकाला आणि साबरमती आश्रमला भेट दिल्यावर आपल्याला काय वाटले, असा प्रश्‍न उपस्थित केल्यावर महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी देश जोडण्याचे काम केले. मीही देश तोडण्याचे काम कधीही केले नाही असे राज म्हणाले. माझ्या तोंडची वाक्‍ये तोडून-मोडून दाखविल्याने वेगळे चित्र निर्माण होते. आजही तुमच्या भाऊगर्दीत साबरमती आश्रम नीट पाहता न आल्याने पुन्हा सवडीने येणार असल्याचे ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले.

हिंदीमध्ये संवाद महाराष्ट्रात राज यांनी नेहमीच मराठीचा आग्रह धरला आहे. अगदी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना ते मराठीतच बाईट देतात. अशा वेळी गुजरातमध्ये ते कोणत्या भाषेत संवाद साधतात याबद्दल उत्सुकता होती; मात्र महाराष्ट्रात केवळ मराठी या आपल्या भूमिकेत अद्याप बदल झाला नसून आता गुजरातमध्येही आलो असल्याने हिंदीत संवाद साधत आहे, असा खुलासा राज यांनी केला

सोमवार, 1 अगस्त 2011

नरेंद्र मोदी देणार राज ठाकरेंना धडे

नरेंद्र मोदी देणार राज ठाकरेंना धडे
महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, August 02, 2011 AT 02:30 AM (IST)
    

अहमदाबाद - महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा लावून धरत राज्याच्या विकासाविषयी भाषणे ठोकणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून धडे घेणार आहेत. येत्या 3 ऑगस्टपासून गुजरातच्या दौऱ्यावर येणारे राज हे राज्याच्या विकासाची माहिती घेणार आहेत. राज यांच्या नियोजित दौऱ्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राच्या विकासाची "ब्ल्यू प्रिंट' माझ्याकडे तयार आहे, असा विविध ठिकाणी जाहीर सभांमधून दावा करणारे राज आता विकासप्रक्रियेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुजरातला भेट देणार आहेत. राज यांचे राजधानी गांधीनगरमध्ये 3 ऑगस्टला आगमन होणार आहे. सुरवातीला ते साबरमती येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला यानंतर दुपारी ते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या वेळी सरकारतर्फे गुजरातच्या विकासाबाबत प्रेझेंटेशन सादर करण्यात येणार आहे. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषददेखील होणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध अक्षरधाम स्वामिनारायण मंदिला राज ठाकरे भेट देणार आहेत. तसेच, सोरटी सोमनाथ मंदिराला भेट देण्याचेही त्यांचे नियोजन आहे.

संवाद कोणत्या भाषेतून?
मराठीप्रेमी राज ठाकरे यांनी आतापर्यंत राष्ट्रीय प्रसारमाध्यमांना मराठीतूनच मुलाखती दिल्या आहेत. मुंबई आणि इतरत्र हिंदी किंवा इंग्रजीतून प्रश्‍न विचारल्यानंतरही राज आवर्जून मराठीतूनच उत्तर देतात. आता नियोजित गुजरात दौऱ्यात ते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांशी कोणत्या भाषेतून संवाद साधणार, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे

शनिवार, 30 जुलाई 2011

राज ठाकरे जाणार गुजरात दौऱ्यावर

राज ठाकरे जाणार गुजरात दौऱ्यावर
-
Sunday, July 31, 2011 AT 03:30 AM (IST)
  मुंबई - एकेकाळी देशात औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात आता गुजरातच्या प्रगतीचे गुणगान होऊ लागले आहे. गुजरातने कोणत्या प्रकारे विकासाच्या दिशेने प्रवास केला, याचा अभ्यास करण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गुजरातला रवाना होतील.

राज यांच्याबरोबर तज्ज्ञ मंडळी जाणार असून या अभ्यास दौऱ्यात गुजरातमधील विकास प्रकल्पांची पाहणी होणार आहे. तेथील विकास प्रकल्पांचा महाराष्ट्रात कितपत वापर करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. ठाकरे यांचा गुजरात दौरा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर गुजरातमध्येही चर्चेचा विषय ठरणार असल्याचे मानले जात आहे.

साबरमती आश्रम आणि सरदार पटेल यांच्या स्मारकाला अभिवादन करून 3 ऑगस्ट रोजी दौऱ्याची सुरुवात होईल. औद्योगिक विकास, सेझ, पर्यटन, झोपडपट्टी पुनर्वसन, जल पुनर्प्रक्रिया, जलसंधारण, रस्तेविकास, सौर, औष्णिक आणि पवनऊर्जा, मुलींचे शिक्षण, विमा योजना आदी विषयांवर चर्चा होईल. राज ठाकरे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी विचारविनिमय करतील. हे शिष्टमंडळ बडोदा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कच्छ, भरुच आदी शहरांना भेट देईल; तसेच नर्मदा प्रकल्प, वनबंधू ग्राम योजना, राजकोट ऑटो इंजिनिअरिंग, कांकरिया प्रकल्पांची पाहणी करेल

गुरुवार, 28 जुलाई 2011

राज ठाकरेंनी घालवला स्वत:चाच टीआरपी

राज ठाकरेंनी घालवला स्वत:चाच टीआरपी
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, July 29, 2011 AT 02:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हजारोंना भुलवणारे अत्यंत प्रभावी वक्‍ते; पण गिरणी कामगारांच्या मोर्चात भाषण न देण्याचा निर्णय घेत त्यांनी मंच उद्धव ठाकरेंच्या हवाली करून टाकला! महापालिकेतील मतदानावर डोळा ठेवून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघेही गिरणी कामगारांच्या प्रश्‍नावर एक आल्याने भाऊ-भाऊ काय बोलतात, याकडे केवळ कामगारांचेच नव्हे, तर अवघ्या मुंबईचे लक्ष लागले होते. मात्र, राज यांनी न बोलून सदैव आकाशाला भिडणारा त्यांचाच "टीआरपी' गमावल्याचे मानले जात आहे.

मुंबईच्या विकासात पायाचे दगड असलेल्या गिरणी कामगारांच्या मोफत घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दत्ता इस्वलकर आणि प्रवीण घाग यांनी रणशिंग फुंकताच या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय सर्वप्रथम जाहीर केला, तो "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. राजकीय पादत्राणे बाजूला करून कामगारांच्या प्रश्‍नासाठी एक येण्याचे आवाहन राज यांनी करताच शिवसेनेसह अन्य पक्ष त्यात आपणहून सहभागी झाले. सरकारविरोधात हा मोर्चा सर्वांची एकजूट उभारत असतानाच या मोहिमेचा लाभ उचलण्यात पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कमालीचे यशस्वी झाले.

मालकाच्या मदतीने संप फोडण्याचा ठपका भाळी घेऊन फिरणारी शिवसेना नव्या अवतारात आजतरी कामगारांची आम्हीच तारणहार आहोत हे दाखविण्यात यशस्वी ठरते आहे. हे व्यासपीठ कामगारांचे आहे, अशी भूमिका घेऊन त्यापासून दूर राहण्याचा राज यांचा निर्णय उचित असला तरी त्यामुळेच "बंद'ची घोषणा करून हे आंदोलन उद्धव ठाकरे यांना हायजॅक करता येऊ शकले, हे उघड आहे.

डाव्या विचारसरणीची क्षीण होत चाललेली शक्‍ती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले दुर्लक्ष यामुळे गिरणी कामगार संघटनांना आता विरोधी पक्षांचा आधार वाटणे अपरिहार्य होते. मात्र, तरी राज यांनी मंचावर न येणे शिवसेनेला अप्रत्यक्ष फायदा देणारे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

"बंद'ला "मनसे'चा विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते झेंडे घेऊन परत जात असतानाच शिवसेनेने केलेली "बंद'ची घोषणा उद्धव यांच्या कुरघोडीच्या राजकारणाची परिचायक मानली जात आहे. "मनसे'ने "बंद'च्या घोषणेत आपण सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या प्रश्‍नावर एकत्रित आलेले विरोधक सरकारला नमवू शकतील, असे असताना "बंद'ची घोषणा देऊन मुंबईकरांना वेठीला धरण्याचे कारण काय, असा थेट प्रश्‍न "मनसे'ने केला आहे.

शनिवार, 23 जुलाई 2011

भाजप-मनसे युतीचा शिवसेनेकडून स्वीकार

भाजप-मनसे युतीचा शिवसेनेकडून स्वीकार
राजेश मोरे
Sunday, July 24, 2011 AT 04:00 AM (IST)
 
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील कौल म्हणून भाजपने मनसेचा पाठिंबा घेतल्यामुळे शिवसेनेत कुजबुज सुरू झाली असली, तरी विधिमंडळात विरोधकांच्या एकीचे बळ बेकीत दिसू नये यासाठी या युतीचा शिवसेनेने स्वीकार केल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चहापानासाठी बोलाविल्यावर शिवसेनेत गहजब माजला होता. त्या वेळी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना शिष्टाई करावी लागली होती; पण या वेळी भाजपमधील अनेक तरुण नेत्यांना राज ठाकरे यांच्या प्रभावाची कल्पना असल्यानेच त्यांच्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा प्रयत्न शिवसेनेतील वरिष्ठांनाही खटकला होता; मात्र त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव दिसत असतानाही मनसेचा भाजपने मिळविलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला होता. अशा वेळी शिवसेनेतून तिखट प्रतिक्रियेची अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र खुद्द शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपने मिळविलेल्या मनसेच्या पाठिंब्याला हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने या विषयावरील शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे. विधिमंडळाच्या काळात विरोधकांची ताकद विभागलेली विरोधकांना परवडणारी नाही. अशा वेळी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर मनसे आणि शिवसेनेचे नेते एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले होते. आता मुख्यमंत्र्यांसह आघाडी शासनाच्या विरोधातही भाजपच्या साथीने मनसेच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना भिडत असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.

सोमवार, 18 जुलाई 2011

राज्यकर्ते साखरेतच गुंतल्याने परप्रांतीय गुन्हेगारांचे फावले

राज्यकर्ते साखरेतच गुंतल्याने परप्रांतीय गुन्हेगारांचे फावले
-
Tuesday, July 19, 2011 AT 03:00 AM (IST)


मुंबई - मराठी माणूस आणि परप्रांतीयांबाबतचा माझा मुद्दा आणि बिहार आणि उत्तर प्रदेशामार्गे येणारे बांगलादेशी आणि अन्य गुन्हेगारी लोंढे हे विषय वेगळे आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. सूतगिरणी आणि साखर कारखान्यांतच गुंतलेल्या राज्य सरकारला सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्यानेच परप्रांतीय गुन्हेगारांचे फावले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी वार्ताहर परिषदेत केली.

मुंबईतील 13/7च्या बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी तपासाला चुकीची दिशा देण्यासाठीच अबू आझमी यांच्यासारखे लोक पोलिस आणि इतरांवर आरोप करीत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पोलिस चौकशीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आझमींचीच आधी चौकशी केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वीच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आझमींचे नाव आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

परप्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोंढे येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी वार्ताहर परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बिहार-यूपीमार्गे बांगलादेशातील गुन्हेगारी लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात बेळगावच्या रियाझ भटकळचा सहभाग असल्याचा अपवाद वगळता बहुतेक घातपाती कारवायांचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील आझमगढमध्येच आहेत. अशा ठिकाणांहून येणाऱ्या गुन्हेगारांना रोखून त्यांची चौकशी करणे गरजेचे असल्याची आपली भूमिका कायम आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

फैज उस्मानीच्या मृत्यूनंतर पोलिसांवर आरोप केले जात आहेत. पण बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी म्हणून अटकेत असलेल्या भावाला वारंवार भेटण्यासाठी जाणाऱ्या उस्मानीची साधी चौकशीही पोलिसांनी करायची नाही का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. अबू आझमींनी या प्रकरणात पोलिसांवर आरोप केले आहेत. पण मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी पकडण्यासाठी कोणीही चौकशीच्या आड येता कामा नये. चौकशीच्या आड येणाऱ्यांची चौकशी झाली तरच, खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचता येईल, असेही ते म्हणाले.

नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दित कारखानदार बिहारमध्ये जाऊ लागले आहेत. पण मायावतींच्या उत्तर प्रदेशात जाण्यास कुणीही तयार नाही. मुंबईत येऊन यूपीतील लोकांना घरे देण्याची मागणी करण्याऐवजी त्यांना आपल्या राज्यातच घरे द्या, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. नितीशकुमारांप्रमाणे हजारो गुन्हेगारांना गजाआड करण्याची धमक मायावतींमध्ये आहे का, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

पेडर रोड येथील उड्डाणपुलाच्या सुनावणीत मराठीला मज्जाव करून केवळ इंग्रजीचा हट्ट करण्यात आला. त्यांना निवेदनाची भाषा समजत नाही. अशा लोकांना फटकावलेच पाहिजे. हाच एकमेव उपाय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

दहशतवादी कॉंग्रेसला घाबरले असते?राज्याचे गृहमंत्रिपद कॉंग्रेसकडे असते तर, दहशतवादी घाबरले असते का, असा प्रश्‍न ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडेच सुरक्षेची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्रिपदाची खुर्ची गेल्यावरच गुरुदास कामत यांना राज्य सरकार गंभीर नसल्याचा साक्षात्कार झाला. राज्याचे गृहमंत्री असणारे आबा अंतर्गत राजकारणातच गुंतले आहेत, अशी टीका त्यांनी केली. पोलिसांना अद्ययावत साधनसामग्री दिल्याशिवाय त्यांच्यावर टीका करू नका, असे आवाहनही त्यांनी केले

मंगलवार, 12 जुलाई 2011

लोकपालाला "आमचा' पाठिंबा हवाच - राज ठाकरे

लोकपालाला "आमचा' पाठिंबा हवाच - राज ठाकरे
(पीटीआय)
Tuesday, July 12, 2011 AT 08:18 AM (IST)
 

मुंबई - लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारेंना अंतिमत: राजकारण्यांचा पाठिंबा घ्यावाच लागेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले आहे. सर्व राजकारणी सारखेच असल्याच्या हजारे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे बोलत होते.

""आम्ही सर्व सारखेच असू, परंतु संसदेमध्ये लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी हजारे यांना राजकारण्यांचा पाठिंबा मिळवावाच लागेल, '' असे ठाकरे म्हणाले.

मिल कामगारांच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परप्रांतीयांना घरे मिळतात पण मराठी असणाऱ्या मिल कामगारांना अजूनही घरे मिळत नाहीत, असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले

मंगलवार, 5 जुलाई 2011

अण्णांच्या 'कोर्टात' राज ठाकरेंची 'खास याचिका'

अण्णांच्या 'कोर्टात' राज ठाकरेंची 'खास याचिका'
विश्‍वास देवकर
Wednesday, July 06, 2011 AT 12:30 AM (IST)
 

वेध : उत्तर महाराष्ट्र

राज्य भ्रष्टाचाराने बरबटले आहे, त्यामुळे लोकपाल राहू द्या, महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असे अण्णा हजारे यांना आवाहन करतानाच अजित पवार व छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यास "मनसे' हजारेंना पाठिंबा देईल, असा पवित्रा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतला आणि साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. अर्थात, राज ठाकरे महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून काहीही बोलले तरी सारा महाराष्ट्र हेच त्यांच्या भूमिकांचे "टार्गेट' असते. गेल्या आठवड्यात असेच लक्षवेधी टार्गेट राज ठाकरेंनी "अचिव्ह' केले आहे. नाशिकमध्ये येऊन हजारे, पवार व भुजबळ यांच्यासंदर्भात भाष्य करून ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचा खास ठाकरी शैलीत "राज'कीय फायदा उठविला, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र व एकूणच देशपातळीवर सध्या अण्णा हजारे हे लोकांचे लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहे. एरवी लोक, विशेषतः युवा पिढी राज ठाकरेंच्या वागण्या-बोलण्यावर फिदा होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून मात्र प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमांसह सर्वांनाच हजारेंनी भुरळ घातल्याचे दिसत आहे. इतकी की महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर जाऊन थेट राजधानी दिल्लीवर स्वारी करत हजारेंनी भ्रष्टाचाराच्या, लोकपालाच्या मुद्यावर सारा देश हलवून सोडला आहे. त्यामुळे सध्या जणू फक्त हजारे फॉर्म्युल्याचीच चलती आहे, राज ठाकरेंनाही हजारेंच्या फॉर्म्युल्याची दखल घ्यावी लागली आहे. मराठी अस्मिता असो वा महाराष्ट्राचे अन्य प्रश्‍न, राज ठाकरे महाराष्ट्राबाबत आक्रमक असतात. असे असतानाही लोकपाल राहू द्या, महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असे हजारेंना सांगण्याची वेळ राज ठाकरेंवर का आली, असा प्रश्‍न नाशिकमध्ये विचारला जात आहे. अजित पवार व छगन भुजबळ यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यास आपण हजारेंना पाठिंबा देऊ, या राज ठाकरेंच्या वक्तव्याने सामान्य माणसाच्या मनात "अरे राज ठाकरे या स्वतःचा करिश्‍मा असलेल्या युवा नेत्याला हजारेंच्या कोर्टात याचिका सादर करण्याची वेळ का आली', असा प्रश्‍न पडला आहे. एरवी महाराष्ट्रात रस्त्यावरच्या आंदोलनात काहीही घडवायचे असेल तर केवळ राज ठाकरे, ही "मनसे' भावना बळावत असताना ठाकरेंना हजारे का हवेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. अर्थात, नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंना आपला "राज'गड अभेद्य करायचा आहे. बाळासाहेब हेच आपला विठ्ठल असे मानणारा हा वारकरी अस्वस्थ झाला, तेव्हाही नाशिकमध्येच आला होता. आपल्या अस्वस्थतेचा हुंकारही त्यांनी याच भूमीत दिला, बंडाचा झेंडाही नाशिकमध्येच फडकावला आणि पक्ष मोठा करण्यासाठीची व्यूहरचनाही ते अनेकदा नाशिकमध्येच रचतात. त्यासाठी नाशिकमध्ये मोक्‍याच्या जागेवर कॉर्पोरेट चेहरा असलेले कार्यालय त्यांनी आता थाटले आहे. मात्र, त्यानिमित्ताने झालेल्या मेळाव्यातच हजारेंना पाठिंब्याची तयारी दाखविणे म्हणजे "राज'गडाला हजारेंच्या आंदोलनाची कुबडी हवी आहे की काय, असा प्रश्‍न त्यांचे विरोधक विचारू लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राज ठाकरे असो वा अण्णा हजारे, कोणीही बोलले तरी सामान्य माणसांच्या संवेदनाच यानिमित्ताने जाग्या होतात. ज्यांना "राज'कारण करायचे असेल त्यांनी जरूर करावे, त्या गदारोळात सामान्य माणसांच्या भावनांचे राजकारण करू नये, हीच अपेक्षा

रविवार, 3 जुलाई 2011

राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?

राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?
सकाळ वृत्तसेवा
Monday, July 04, 2011 AT 03:45 AM (IST)
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकरणे बाहेर काढा. महाराष्ट्रात मनसेची ताकद पाठीशी उभी करेन, असे आवाहन राज ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना केल्याने राष्ट्रवादी अचंबित झाली आहे. सरकारविरोधात माझे आमदार विधानसभा डोक्‍यावर घेतील, अशा राज ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात केलेल्या घोषणेला राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. मनसेतील नेत्यांची, लोकप्रतिनिधींची ताकद घटली काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी मनसेच्या नेत्यांचे हात बांधले आहेत काय, असा जोरदार प्रतिहल्ला करीत प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची गरजच काय? राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याची मनसेची ही नीती म्हणजे दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीने आज केली.

शिवसेना व भाजप या विरोधी पक्षांवर टीका करताना राज यांची मनसे ही राज्यात विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, याचा राज ठाकरे यांना विसर पडला असावा. प्रमुख विरोधी पक्षांना विरोधकांची प्रभावी भूमिका पार पाडता येत नसेल तर राज ठाकरे यांचे प्रकरणे बाहेर काढण्यासाठी हात कुणी बांधलेत. त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढावीत. अण्णा हजारे यांची वाट कशाला बघावी? असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात अण्णांना पुढे करीत "हम कपडे संभालते हैं' अशी भूमिका घेतल्याने राज ठाकरे यांचा वैचारिक गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होते. त्यांना दोन्ही दगडांवर पाय ठेवून राजकारण करायचे आहे काय, अशी शंका घेतल्यास वावगे ठरणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे.
राज्यात नवनिर्माणची हाक देत स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या राज ठाकरे यांना अजूनही आपण सराकारच्या विरोधात आहोत की शिवसेना-भाजपच्या विरोधात आहोत ही भूमिका ठरविता आलेली नाही, याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहेत.

राज यांच्याकडे राज्यातील कार्यकर्त्यांची फळी आहे. विधानसभेत त्यांचे आमदार आहेत. एवढेच नव्हे, तर माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी या सर्व आयुधांचा वापर करून राष्ट्रवादीला आव्हान द्यावे, पण अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चे हसू करून घेऊ नये. अण्णांनी काय करावे, हे सांगण्यापेक्षा राज ठाकरे राष्ट्रवादीच्या विरोधात काय करू शकतात ते स्पष्ट करावे. अण्णांना पुढे करून त्यांनी अण्णांची टिंगल करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला आमदार आव्हाड यांनी लगावला आहे; तर विरोधी पक्षाला पोकळ ढगांची उपमा देणाऱ्या राज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करताना ढगात गोळ्या मारू नयेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते मदन बाफना यांनी केली आहे.

अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे पाहा - राज

अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे पाहा - राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, July 03, 2011 AT 01:15 AM (IST)
  
नाशिक - ""उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. मग तेथील लोकांना इतर राज्यांत का जावे लागते? महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना घरे द्या, अशी मागणी मायावतींनी केली होती. येथे मराठी माणसाला घर मिळत नाही, तेथे त्यांना घरे मागण्याची त्यांच्यात हिंमत कोठून येते? महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. विरोधकांचे ढग बरसत नसल्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकायला काढलाय. त्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात अण्णा, बाबा पुढे येत आहेत,'' अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली, तर "अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकारण्यांच्या फायली बाहेर काढा. असे केले तर मनसे तुमच्या पाठीशी उभी करतो,' असेही ते म्हणाले.

येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी आमदार वसंतराव गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, आमदार उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, शिशिर शिंदे, हेमंत गोडसे, मंगेश सांगळे, सुधाकर चव्हाण, विनय येडेकर, रीटा गुप्ता, शिरीष पारकर, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक रमेश धोंगडे, सुजाता डेरे, यतीन वाघ, अशोक मुर्तडक, शीला भागवत, रंजना जोशी आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, ""बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढत आहेत. त्यामुळे आता मुंबईनंतर पुणे आणि नाशिकला बकालपणा यायला लागला आहे. त्यातच भ्रष्ट नेत्यांमुळे आणि सुस्त विरोधकांमुळे शहराचे नियोजन कोलमडले आहे. बाहेरून आलेल्यांबद्दल बोलतो, मराठीच बोला म्हणतो, म्हणजे भावनेला हात घालतो, अशी टीका माझ्यावर केली जाते. पण येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा वाढलेला बकालपणा व मराठीचा मुद्दा हा भावनेचा मुद्दा नाही, तर आता अस्तित्वाचा मुद्दा झाला आहे. शहरात उभ्या राहणाऱ्या टाउनशिप कोणत्याही नियोजनाशिवाय उभ्या राहत असतील व तेथे फ्लॅट घेणाऱ्याला पाणी मिळाले नाही, तर हा भावनेचा मुद्दा होतो का?, याचा विचार महापालिकेने, नगरसेवकांनी करायला नको का?''

""शहरांना सुविधा पुरविताना ग्रामीण भागाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथील शेतकरी आत्महत्या करतो. त्यांच्या मुलांना शहरात नोकऱ्या मिळत नाहीत, याकडे कोण लक्ष देणार? धरणे कशासाठी बांधली जातात? पाण्याचे वाटप आणि नियोजन करताना आपण कशाला प्राधान्य देतो, याचा विचार कोण करणार? शहरांचा विस्तार कसाही वाढतो आहे. त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज वाढत असताना नवीन धरणांचा विचार होतो का? शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उद्योग आणि पिण्याच्या पाण्याकडे वळाल्यावर शेतकऱ्याने काय करायचे, याचा विचार आता व्हायला हवा. धरणाच्या अवतीभवती उभ्या राहत असलेल्या टाउनशिप कोणाची स्वप्ननगरी असेल, पण धरणात अतिक्रमण करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? देशाच्या व राज्याच्या संपत्तीचे सुरू असलेले खासगीकरण धोकादायक असून, आपल्या मराठी माणसाच्या जमिनीवर तो उपरा होत आहे,'' असे ते म्हणाले

भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या "पीडब्ल्यूडी'मधील ठेके कोणाला द्यायचे हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे कामचुकार आणि भ्रष्ट कंत्राटदारांना मनसेच्या भाषेतच रट्टे दिले पाहिजेत, तरच ते जाग्यावर येतील, असे श्री. ठाकरे म्हणाले. ""मराठी माणूसच हिंदी बोलत असेल तर हिंदी भाषिकाला महाराष्ट्र त्याचाच वाटणार. त्यामुळे आपण मराठीत बोलले पाहिजे. भाषेच्या मुद्याची भिंत उभारली तरच परराज्यातील लोंढे थांबतील,'' असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना नितीन भोसले यांनी, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महापालिकेतील युतीची सत्ता उलथून लावण्याचे आवाहन केले. मेळावा यशस्वितेसाठी प्रकाश दायमा, समीर शेटे, अनिल वाघ, मोहन मोरे, संजय गायकवाड आदींनी प्रयत्न केले. प्रकाश दायमा यांनी सूत्रसंचालन केले.

नव्या संघर्षाची "ठिणगी'
"राजकारण्यांनी संपत्ती कमवावी, पण मराठी माणसाला ओरबाडून नको. राज्य विकायला काढले असले, तरी ते आम्ही विकू देणार नाही. आताच हात उचलला नाही तर नंतर काही खरे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हाकेच्या प्रतीक्षेत राहावे. हाक मारल्यावर रस्त्यारस्त्यांवर मनसेचे मोहोळ दिसले पाहिजे. पुन्हा संघर्षाची तयारी ठेवा, तर महाराष्ट्र वाचविता येईल,' असे सांगताना राज ठाकरे यांच्या देहबोलीने नव्या संघर्षाची ठिणगी टाकली. मेळाव्यानंतर आता राज ठाकरे कोणता मुद्दा घेऊन "मनसेचे मोहोळ' उठविणार आहेत याविषयी कार्यकर्त्यांत चर्चा आणि उत्सुकता होती, तर हे मोहोळ पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून काढणार, अशा चर्चेचे मोहोळ सभागृहात उठले होते.

पालिका जिंकायचीच!
हा मेळावा फक्त मेळावा नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व आगामी पालिका निवडणुकांची तयारी असल्याचे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितल्यावर कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. आगामी निवडणुकांत "मनसे'चाच झेंडा पालिकेवर दिसला पाहिजे, असा निर्धारच मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. नाशिक महापालिका काबीज करण्याचा निश्‍चय आमदार वसंतराव गिते यांनी व्यक्त केला. इतर सर्व आमदारांच्या भाषणातही पालिका निवडणुका व पालिकेतील भ्रष्टाचारावर भर होता. पालिका नव्हे, तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून मनसे तळागाळापर्यंत जाईल व यश मिळवील, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

"मनसे'त भेसळ नाही : आमदार शिंदे
मनसेच्या यशात कुठलीही भेसळ नाही. राज ठाकरे यांचे विचार व कार्यकर्त्यांच्या खणखणीत नाण्यावर गेल्या पाच वर्षांत मनसेने यश मिळविले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने झेंड्यात रंग भरलेले नाहीत. मनसेचा रंग कायमचा आहे. इतर पक्षांप्रमाणे "इथ जमलं नाही म्हणून तिथं जायचं,' असे प्रकार करणारे आता भगव्याजवळ निळा झेंडा घेऊन गेलेत. पण मनसेत निळा रंग कायमचा आहे; निवडणुकांपुरता नाही, असा टोला आमदार शिशिर शिंदे यांनी लगावला.

शनिवार, 11 जून 2011

...आणि माझ्यासाठी तुम्ही रडणार!

...आणि माझ्यासाठी तुम्ही रडणार!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 12, 2011 AT 03:30 AM (IST)
 
खडकवासला - ""माणूस जन्माला आला की रडत येतो. इतर सर्वजण मात्र हसत असतात. मी मतदारसंघात अशी विकासकामे करणार की सुखासमाधानाने हसत मरणाला सामोरा जाईल आणि तुम्ही मात्र... माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी माझ्यासाठी रडत असाल...!'' आमदार रमेश वांजळे यांच्या अनेक भाषणांत हे वाक्‍य हमखास असायचे. याचाच प्रत्यय शनिवारी त्यांच्या अत्यंयात्रेवेळी सर्वांना येत होता.

आमदार वांजळे यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर सर्व मतदारसंघच शोकाकुल झाला. अंत्ययात्रेची तयारी रात्रीच सुरू झाली. पाऊस असल्याने रस्त्यावर मांडव टाकण्यात आला होता. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. धायरी फाटा चौक ते महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंत रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला होता. पानशेतहून येणारी वाहतूक नांदेड फाटा येथून धायरीमार्गे वळविण्यात आली होती; तसेच शहरातून पानशेतकडे जाणारी वाहतूक महामार्गावरून नऱ्हे-धायरीमार्गे वळविली होती. कालव्याच्या रस्त्यावरूनही वाहतूक वळविण्यात आली होती.

सकाळी सात वाजता आमदार वांजळे यांचे पार्थिव त्यांच्या वडगाव खुर्द (धायरी फाटा) येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर "आपल्या रमेशभाऊंचे' दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांची रीघ लागली होती. भाऊंना अचानक असे काय झाले, अशीच भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. भजनही सुरू होते. या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अंत्यदर्शन घेतले.

दरम्यान, सर्व बाजूंनी "मनसे'चे झेंडे लावलेला ट्रक अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी सव्वा दहा वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली. "आमदार रमेश वांजळे अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दणाणत होता. महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ अंत्ययात्रा आली, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला, आमदार बाळा नांदगावकर, नितीन देसाई आणि अन्य नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रेच्या सुरवातीला भाजपचे आमदार गिरीश बापट, शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनीही दर्शन घेतले.

आघातामुळे फुटला अश्रूंचा बांध
वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला होता. डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंशिवाय त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मुलांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. पतीच्या आकस्मिक निधनामुळे झालेला आघात हर्षदा यांच्या हंबरड्यातून उमटत होता. त्या वेळी उपस्थितांचेही डोळे पाणावत होते. शनिवारी सायंकाळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अनेक मान्यवरांचे सांत्वनाचे दोन शब्द ऐकतानाही त्यांची अश्रुधारा अखंड वाहत होत्या.

वाढदिवस साजरा करणार नाही - राज ठाकरे

वाढदिवस साजरा करणार नाही - राज ठाकरे
-
Saturday, June 11, 2011 AT 05:43 PM (IST)
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार रमेश हिरामण वांजळे यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे १४ जून रोजी असलेला माझा वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा करू नये, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) केले.

राज ठाकरे म्हणाले, ""वांजळे यांच्या मृत्यूपूर्वी मी १० मिनिटे त्यांच्याशी बोललो होतो, त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. त्यांच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. वांजळे यांच्यावर नागरिकांचे अतोनात प्रेम आहे. त्यांच्यावर टाकलेली कामगिरी ते चोखपणे पार पाडत. म्हणूनच आज वैकुंठमध्ये झालेली गर्दी ही त्यांच्या स्वभावाची आणि जनसंपर्काची निदर्शक होती. येत्या १४ जून रोजी माझा वाढदिवस आहे. मी हा वाढदिवस साजरा करणार नाही. मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे माझा वाढदिवस साजरा करू नये.''

दरम्यान, आज (शनिवार) दुपारी वैकुंठ स्मशानभूमीवर वांजळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

सोमवार, 30 मई 2011

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा ठाम विरोध

दादरच्या नामांतराला राज ठाकरेंचा ठाम विरोध
-
Tuesday, May 31, 2011 AT 03:00 AM (IST)
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका रेल्वे स्थानकाला देण्याचा आग्रह धरून त्यांचे व्यक्तिमत्त्व लहान करू नका असे बजावतानाच, बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्त्वाचा आदर करण्यासाठी पाचशे रुपयांच्या नोटांवर त्यांचे छायाचित्र छापावे, त्यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी आग्रह धरावा, अशी सूचना करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला गुगली टाकली. दादर स्थानकाचे चैत्यभूमी असे नामकरण करण्यास आपला ठाम विरोध असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर आणि प्रेम असेल, तर त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारवर दबाव आणावा. डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र नोटांवर छापा, असा आग्रह लोकसभेत धरावा, असे राज यांनी स्पष्ट केले. "कृष्णकुंज' या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजकारणासाठी महात्म्यांच्या नावाचा वापर करू नका. नामांतराने मूळ सामाजिक, आर्थिक समस्या सुटणार नाहीत. आपल्याच लोकांनी ठेवलेली नावे काढून नवीन नावे देण्यास माझा ठाम विरोध असेल असे ठणकावून ते म्हणाले, की माझा विरोध व्यक्‍तीला नाही; तर महापुरुषांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करण्याच्या प्रवृत्तीला आहे. जुनी नावे काढून नवीन नामकरण करण्यात संपूर्ण राजकारण दडलेले असते आणि असे राजकारण समाजाच्या उन्नतीसाठी हानीकारक असते.

नामांतराने मूळ समस्या सुटत नाहीत, असे स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्यानंतर तिथल्या सुविधा बदलल्या का? मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव दिल्यानंतर त्या विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीत बदल झाला का? केवळ नामांतराचे राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे गरीब आणि गरजू बांधवांच्या समस्या सुटत नाहीत. म्हणून नामांतर करण्यास आपला ठाम विरोध आहे.

महान लोकांची नावे लहान वास्तू, रस्ते यांना देण्यास माझा कायम विरोध आहे. मग माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कोणी घेतला तरी त्याचा मी विरोधच करीन, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव एका रस्त्याला दिल्यानंतर पुन्हा वांद्रे-वरळी सागरी सेतूला त्यांचे नाव कशाला हवे? महाराष्ट्रात अनेक थोर पुरुष होऊन गेले, त्यांची नावे का दिली जात नाहीत? केवळ चारपाच नावांच्या पलीकडे जायचेच नाही, ही पद्धतच चुकीची आहे, असा टोला त्यांनी लगावला

शुक्रवार, 15 अप्रैल 2011

"खळ्‌ळऽऽ खटाक" हा "राज' मार्ग नाही...

"खळ्‌ळऽऽ खटाक" हा "राज' मार्ग नाही...
मृणालिनी नानिवडेकर (सकाळ न्यूज नेटवर्क)
Saturday, April 16, 2011 AT 12:00 AM (IST)
 

सामान्य मराठी मुंबईकराचा पिंड गेली तीन-चार दशके शिवसेनेच्या आक्रमक धोरणांवर पोसला गेला. तो झणझणीतपणा अळणी झाल्याने अस्वस्थ झालेले शिवसेनेचे सहानुभूतीदार राज यांच्यावर नजरा लावून बसलेले असतात. भय्यांवर आक्रमण करून राज यांनी अचूक नेम साधला आहे.
उपऱ्यांच्या आगळिकींना लक्ष्य करण्याचा अजेंडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा हाती घेतला आहे. शिवांबूच्या स्वादाने पाणीपुरी रसाळ करणाऱ्या भय्याची किळसवाणी कहाणी समोर येताच मनसेने खळ्‌ळऽऽ खटाकची जुनी भाषा नव्याने अंगीकारली असून मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांत भूमिपुत्रविरुद्ध उपरे याच अस्त्राचा पुन्हा एकवार वापर करण्याचा पक्षाचा विचार दिसतो. ठाण्यातला एक पाणीपुरीवाला भय्या हिडीस वाटणारा प्रकार करीत पदार्थ विकत असल्याची फिल्म वाहिन्यांवर झळकताच राज ठाकरेंनी या विषयातला मोठा आशय हुडकून पक्षयंत्रणेला कामाला लागण्याचे आदेश दिले. भेळपुरीवाल्या भय्यांच्या गाड्या लगेचच मनसैनिकांचे लक्ष्य ठरल्या. आमच्या प्रांतात येऊन धंदा करताना आगळिकी कराल तर खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम भरला गेला. आदेशाची वाट पाहणारे राडेबाज नेतृत्व कामाला लागले. आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली, गाड्या फुटल्या, अटका झाल्या. भय्ये घाबरले असे मराठी माणसाला वाटले. एका घटनेने हे सारे काही साध्य केले.

सामान्य मराठी मुंबईकराची नाडी ओळखण्याचे राज ठाकरे यांचे कसब तसेही वादातीत. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि ओघवते वक्‍तृत्व यांची देणगी लाभलेले राज लोकांना काय भावते ते बिनचूक ओळखू शकतात. ठाण्यात एका कॉलेजातल्या मुलीने पाणीपुरीवाल्या भय्याची आगळीक मोबाईल कॅमेरात टिपून प्रसिद्धिमाध्यमांकडे पाठवली. मात्र, मनसेचे दूत तिच्या घरी पोचले. तिचे नाव अंकिता राणे. राजसाहेबांनी तिच्या स्मार्ट कृत्याचे कौतुक करताच कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश मिळाला. पाणीपुरी-भेळपुरीवाल्या भय्यांच्या गाड्यांचे खळ्‌ळ। खटाक सुरू झाले. पूर्वी अस्वच्छ पाणीपुरीसमोर पर्याय उभा करण्यासाठी मनसेने मराठी माणसांनी तयार केलेल्या पाणीपुरीविक्रीला प्रोत्साहन दिले होते. मुंबईत चौपाट्या खूप आणि पाणीपुरी तयार करणारी मराठी माणसे कमी असल्याने हे प्रतिकात्मक आंदोलन अर्ध्यावरच संपले. अंकिताने मात्र सोय करून दिली. पिटात बसून सिनेमा बघण्याचा आनंद घेणारे आणि अप्राप्य ड्रेससर्कलला नावे ठेवत बाल्कनीची मजा लुटणारे दोन्ही वर्ग राज ठाकरे यांचे समर्थक. गलिच्छ खाद्यपदार्थांसारखा विषय दोघांनाही एक करणारा. सामान्य मराठी मुंबईकराचा पिंड गेली तीन-चार दशके शिवसेनेच्या आक्रमक धोरणांवर पोसला गेला. कार्याध्यक्षांनी तो झणझणीतपणा अळणी केल्याने अस्वस्थ झालेले शिवसेनेचे सहानुभूतीदार राज यांच्यावर नजरा लावून बसलेले असतात. त्यांना असे काही घडले, की जुन्या नवलाईचा आठव होतो. दुसरीकडे मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय मराठी अभिजनही उपऱ्यांमुळे संस्कृती लयाला नेली असे मानतो. कायदा हातात घेणे अनुचित असले, तरी हे बाहेरचे लोक "कानाखाली आवाजा'चीच भाषा जाणतात या श्रद्धेमुळे राडे त्यांना "नेसेसरी इव्हिल' वाटतात. अस्मितेच्या राजकारणाशी संबंध नसलेले मुंबई महापालिकेचे आयुक्‍तही परप्रांतीयांमुळे मुंबईतील मलेरियाची साथ आटोक्‍यात येऊ शकत नाही, असे विधान करतात तेव्हा हा उच्चभ्रू वर्ग खूष होतो. राज यांनी चुणूक दाखवत या दोन्ही वर्गांना खूष करून टाकले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत राज-उद्धव यांचे शक्तिप्रदर्शन बरोबरीत सुटले. मुंबई-ठाण्यात मजबूत संघटनात्मक बांधणी असलेल्या जुन्या शिवसेनेला नवा पर्याय पुरून उरणार काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबई पालिका जिंकण्याची ईर्ष्या कॉंग्रेसनेही बाळगली आहे. ती लक्षात घेता; भगव्यात मोडणाऱ्या पक्षांनी या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचे आवाहन भाजपने केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस पूर्वसुरींप्रमाणे शिवसेनेला रोखण्यासाठी मनसेला रसद पुरवेल का याबद्दल शंका घेतली जाते. बाळासाहेबांच्या नावे मराठी मतांना एक आणण्याचे प्रयत्न शिवसेना करणार हे उघड असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना थोपवणे ही मनसेची अग्निपरीक्षा आहे.

अर्थात राजकारण बाजूला ठेवले तरी या समस्येला कित्येक पैलू आहेत. गावात रोजगार न मिळालेली कित्येक डोकी वळकटी बांधून मुंबई गाठतात. आपला मुलूख सोडून कुणीही खुषीने परप्रांत जवळ करत नाही हे राज यांनी लक्षात घ्यायला हवे. संकुचित वृत्तींचे सध्या फोफावले आहे. मुंबईत होणारी गर्दी ही केवळ मराठी माणसाची नव्हे; तर संपूर्ण भारताची शोकांतिका आहे या भावनेतून विचार करणे ठाकरेंना आवडणार नाही. विक्रेते अस्वच्छ वातावरणात रांधलेले खाद्यपदार्थ मुंबईकरांना विकतात. कित्येक तास घराबाहेर असलेल्या मुंबईकरांना खिशाला परवडतील असे पदार्थ खाऊन उदरभरण करावे लागते. या विक्रेत्यांवर कोणतेही नियंत्रण ठेवण्याची सरकारची इच्छा नसते. महापालिकेचे आरोग्य खाते असेल किंवा राज्य सरकारचे पोलिस खाते प्रारंभी विक्रेत्यांवर रुबाब करतात आणि नंतर चिरीमिरी घेऊन मूग गिळतात. अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याचे काम यंत्रणा करत नसल्याने राडा संस्कृती फोफावते. हा दिलासा क्षणकालाचा आहे. आंदोलन शांत होताच पुन्हा गैरव्यवहार सुरू होणार आहेत याची जाणीव विसरून कसे चालणार?