शनिवार, 12 जून 2010

आघाडीशी व्यवहार 'धन'से नव्हे, 'मन'से

आघाडीशी व्यवहार 'धन'से नव्हे, 'मन'से
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 13, 2010 AT 12:00 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार निलंबित आमदारांना विधानसभा सभागृहात काम करण्याची संधी मिळावी, त्यांच्या मतदारसंघातील जनतेची कामे करता यावीत, यासाठीच विधान परिषद निवडणुकीत मतदान केल्याचा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. मनसेने विधान परिषदेच्या मतदानात सहभागी होण्याचा समझोता केला. हा समझोता म्हणजे व्यवहार नाही, असेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेने कोणाला साथ दिली, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर 'कृष्णकुंज' येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला मतदान करण्यासाठी मनसेने व्यवहार केल्याचा आरोप राज यांनी या वेळी खोडून काढला. याबाबत शिवसेनेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, की गेल्या महिन्यात झालेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत डावखरे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार मागे का घेतला, उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी किती थैल्यांचा व्यवहार केला, असा थेट सवालही त्यांनी शिवसेनेला केला. स्वत:च्या चुकांमुळे उमेदवार पराभूत झाल्याने, मनसेच्या नावाने शिवसेनेचा थयथयाट सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेने नाक खुपसू नये!विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या मतांना शिवसेनेने गृहित धरले होते काय, या प्रश्‍नाला राज ठाकरे यांनी उत्तर दिले. माझा पक्ष आणि माझी भूमिका स्वतंत्र आहे. मी कुणाशीही बांधील नाही. विधान परिषदेतला समझोता मनसेच्या राजकीय संबंधांची नांदी नाही, असे ते म्हणाले. मराठी माणसाने मनसेला कामाची पावती दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेच्या राजकारणात विनाकारण नाक खुपसू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

आझमी प्रकरणी शिवसेना गप्प का?आजपर्यंत शिवसेनेने राजकुमार धूत, प्रीतिश नंदी, घनःशाम दुबे, चंद्रिका केनिया यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याचा दाखला देत, ही मंडळी शिवसैनिक होती काय, असा सवालही श्री. ठाकरे यांनी केला. अबू आझमी प्रकरणात विधानसभेत शिवसेना मूग गिळून गप्प का बसली, त्यांनी मनसेला पाठिंबा दिला का, असा सवाल करत, मनसेला कुणीही गृहित धरू नये, असा सल्ला राज ठाकरे यांनी इतरांना दिला.

शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज - राज

शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज - राज
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 12, 2010 AT 12:00 AM (IST)
 
मुंबई - ''विधान परिषदेच्या निकालावरुन शिवसेनेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मनसेच्या चार आमदारांच्या निलंबन रद्द करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कोणत्याही पक्षाला बांधिल नसून, माझा स्वतंत्र पक्ष आहे. माझ्या मनात असेल त्याला मी मदत करेल,'' असे राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभवझाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकाहोत असताना आज राज ठाकरे यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा समाचार घेत राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, ''आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला जे करायचे आहे ते महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी करायचे आहे. या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली त्याला आम्ही काय करणार. प्रत्येकवेळी हरले की कोणावरही टीका करतात. विधानसभा निवडणुकांवेळी मराठी माणसावर टिका केली. त्यामुळे शिवसेनेने स्वतःची सुधारणा करावी दुसऱयावर टीका करु नये. शिवसेनेकडून राज्यसभेवर पाठविण्यात आलेले नेते तपासून पहावेत. ते उमेदवार सामाजिक कार्यकर्ते होते का? हेही पहावे. 

या निवडणुकीत शिवसेनेकडून मनसेवर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहेत. यावर बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनेला पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीशी सत्तेत राहिले तेव्हा किती पैशाच्या थैल्या घेतल्या? असा प्रश्न विचारला. ''स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्याला नावे ठेवायची ही शिवसेनेची जुनी सवय असल्याचे, त्यांनी सांगितले.

शुक्रवार, 11 जून 2010

राज ठाकरे बनले टीकेचे धनी!

राज ठाकरे बनले टीकेचे धनी!
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 11, 2010 AT 02:57 PM (IST)
 

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष सुरू केल्यापासून मराठी नेटिझन्सचा कायम पाठिंबा मिळवणारे राज ठाकरे पहिल्यांदाच टीकेचे धनी झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेच्या आमदारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'ई-सकाळ'वर प्रतिक्रिया व्यक्त करून राज ठाकरेंच्या निर्णयाबद्दल नेटिझन्सनी संताप व्यक्त केला.

राज ठाकरे तुम्ही दाखवून दिले की, तुम्ही पण सत्तेचे लालसी आहात. मराठीचा मुद्दा बिलकूल तुमचा नाही आणि तुम्ही विश्‍वासघात करीत आला आहात आणि करता आहात, अशी प्रतिक्रिया श्‍वेता चौधरी यांनी व्यक्त केली. हे सगळे करण्यासाठी कॉंग्रेसने तुम्हाला किती पैसे दिले, असा सवालही त्यांनी केला.

राज ठाकरे महाराष्ट्राचे नाही, तर स्वतःचेच नवनिर्माण करीत आहेत, असे मत मांडले आहे जयवंत यांनी. मनसे हे कॉंग्रेसचेच छोटे पिल्लू आहे. सभेत आघाडी सरकारला शिव्या घालायच्या आणि पैसे घेऊन त्यांना मदत करायची, असा आरोप त्यांनी राज ठाकरेंवर केला आहे. मनसेसुद्धा इतर पक्षांसारखी निघाली, म्हणून महेश पाटील या वाचकाने नाराजी व्यक्त केली. राहूल म्हणतात, राज ठाकरे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय फरक पडला असता जर तुमच्या आमदारांचे निलंबन मागे घेतले नसते तर... जनता होती ना तुमच्या पाठिशी...!

राज ठाकरे यांनी आपला विश्‍वासघात केल्याचे दिनकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. पुढच्या निवडणुकीत हे विसरणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. राज ठाकरे सर्व राजकीय पुढाऱ्यांसारखेच एका माळेचे मणी असल्याचा अन्वयार्थ योगेश यांनी काढला आहे. चांगले पांग फेडले मराठी माणसाचे... राजसाहेब तुम्हाला लाजीरवाणा मुजरा, अशी प्रतिक्रिया एका अनामिक वाचकाने व्यक्त केली.

प्रशांत म्हणतो, आता तरी लोकांनी शहाणे व्हावे. राज ठाकरे आणि मनसेच्या मागे लागू नये. फक्त निवडणुकीच्यावेळी स्टंटबाजी करायची आणि लोकांना मूर्ख बनवायचे एवढेच यांचे काम. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विश्‍वासघात केल्याची भावना सतीश यांनी व्यक्त केली.

...तरीही मनसेला पाठिंबाअनेक नेटिझन्स राज ठाकरेंवर टीका करीत असले, तरी काहींनी त्यांच्या रणनीतीबद्दल विश्‍वास व्यक्त करून त्यांना पाठिंबा दिला आहे. चेतन म्हणतो, राज ठाकरे यांनी जे केले, ते योग्यच होते, नाहीतर पक्ष वाढण्याऐवजी लवकरच संपेल. मनसेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. राजकारणात उतरल्यानंतर अशी खेळी खेळावीच लागते, असे मत नामदेव या वाचकाने मांडले आहे. मनसे आमदारांचे निलंबन रद्द होणे, हा एक नंबरचा मुद्दा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी चांगलेच केले, असे शिवा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, राज ठाकरे इतर पक्षांसारखे राजकारण करणार नाही, असा विश्‍वास आशिषने व्यक्त केला. 

गुरुवार, 10 जून 2010

'मनसे'चे आमदार सर्वाधिक चर्चेत

'मनसे'चे आमदार सर्वाधिक चर्चेत
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 11, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या 13 मतांनी अखेर निर्णायक भूमिका पार पाडली. तरीही या मौल्यवान मतांसाठी संबंधित उमेदवारांना मतदानाच्या अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली. मनसेच्या आमदारांसाठी सकाळपासून विधानभवन परिसरात क्‍लायमॅक्‍स तयार करून ठेवण्यात आला होता. प्रत्यक्ष त्यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावल्यामुळे मनसेचे आमदार आज पुन्हा एकदा चर्चेत आले.

'मनसे'च्या तेरा मतांसाठी सर्व पक्षांनी फिल्डिंग लावली होती. मनसेची मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पारड्यात पडली. प्रसिद्धिमाध्यमांनाही मनसेच्या आमदारांची सकाळपासून प्रतीक्षा होती. दुपारी एकच्या सुमारास मनसे आमदार काही वेळातच मतदानाला पोहोचतील असा निरोप आला, पण अर्धा तास उलटून गेल्यानंतरही ते न आल्यामुळे सर्वांची प्रतीक्षा वाढली. तेवढ्यात राज्यसभेचे अपक्ष उमेदवार कन्हय्यालाल गिडवानी यांनी अर्ज मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले, त्यामुळे गिडवानींच्या माघारीची मनसेचे आमदार वाट पाहत होते, अशी चर्चा विधानभवनात सुरू झाली. काही उमेदवारसुद्धा पत्रकारांनाही मनसेचे आमदार कधी येत आहेत, याची मोबाईलवरून विचारणा करीत होते.

मनसेच्या आमदारांची राजकीय व्यूहरचना यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दुपारी अडीचच्या सुमारास विधानभवन परिसरात पसरले. त्यामुळे सर्वांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. हे सुरू असतानाच मनसेचे आमदार मनोरा आमदार निवासात मिसळ खात बसले होते. अखेर सव्वातीनच्या सुमारास बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, राम कदम, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, वसंत गीते, रमेश वांजळे, हर्षवर्धन जाधव, उत्तमराव ढिकले, रमेश पाटील हे सर्व आमदार पोहोचताच जोरदार घोषणाबाजी झाली. त्यांना कॅमेराबद्ध करण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनी व छायाचित्रकारांनी प्रचंड गर्दी केली. अखेर साडेतीनच्या सुमारास सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सर्व चर्चांना विराम मिळाला व एक क्‍लायमॅक्‍स संपला.

बुधवार, 9 जून 2010

इंजिन आघाडीच्या यार्डात?

इंजिन आघाडीच्या यार्डात?
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 12:00 AM (IST)
 
मुंबई - आपल्या राजकीय भवितव्याच्या समीकरणाची जुळवाजुळव करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली 13 मते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पारड्यात टाकण्याचे नक्की केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे 'मनसे'च्या मतांकडे डोळा लावून बसलेल्या भाजप व शिवसेनेच्या पदरात निराशा पडण्याची शक्‍यता असून अतिरिक्त मतांसाठी त्यांची मदार आता सर्वस्वी अपक्ष व 'रिडालोस'वर राहणार आहे.

'मनसे'कडे असलेल्या 13 मतांवर सर्वच पक्षांचा डोळा होता. त्यांची मते मिळावीत यासाठी सध्या परदेशात असलेले "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी फोनवरून मनधरणी केली; तर काही पक्षांच्या उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदारांकडे संपर्क करून राज यांच्याकडे काही मतांसाठी शब्द टाकला होता. राज ठाकरे उद्या (ता. 10) पहाटे मुंबईत येणार असले तरीही त्यांनी आपल्या 13 मतांची विभागणी निश्‍चित केल्याचे सांगण्यात येते. या विभागणीनुसार कॉंग्रेसच्या पारड्यात सात; तर राष्ट्रवादीला 6 मते मिळणार आहेत.

'मनसे'च्या चार निलंबित आमदारांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला असली तरीही चार वर्षांसाठी झालेले मनसेचे निलंबन पक्षाला सध्या परवडणारे नाही, त्यामुळे येत्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या चार निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या बोलीवरच मनसेची मते कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळणार हे नक्की झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. कारण, गेल्या दोन्ही अधिवेशनांत मनसेच्या गटनेत्यांनी व प्रतोदांनी निलंबन मागे घेण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसकडे सातत्याने मनधारणी केली होती, परंतु आश्‍वासनांच्या पलीकडे त्यांच्या पदरात काही पडले नव्हते; त्यामुळे यंदा सत्ताधाऱ्यांनी ठोस आश्‍वासन दिल्याचेही सांगण्यात येते.

शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना मनसेच्या मतांची अपेक्षा होती, पण आता मनसेने आपली मते सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे युतीच्या उमेदवारांना अन्यत्र हालचाली कराव्या लागणार हे स्पष्ट आहे.

मंगलवार, 8 जून 2010

मनसेचे आमदार मतदानासाठी विधानभवनात

मनसेचे आमदार मतदानासाठी विधानभवनात
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार निलंबित आमदारांना विधानभवनात जाऊन मतदान करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिली आहे. यामुळे या निलंबित आमदारांना विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी विधानभवनाबाहेरील तंबूतून नाही, तर मध्यवर्ती सभागृहात जाऊन मतदान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याच्या विधिमंडळ सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून याबाबत विचारणा केली होती. आज निवडणूक आयोगाने पाठवलेल्या उत्तरात या निलंबित आमदारांना मतदानासाठी विधानभवन इमारतीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने सर्व विधिमंडळ कायदे आणि राज्यघटनेचा आधार घेत, या आमदारांना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहातून निलंबित करण्यात आले असल्याचा दाखला देत, विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात जाण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. राज्यघटनेच्या कलम 194 अन्वये या आमदारांचे निलंबन झाले असले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करत या आमदारांचा मतदानाचा हक्‍क अबाधित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

वर्षभरापूर्वी या चार आमदारांचे निलंबन झाले होते. तेव्हापासून या आमदारांना विधानभवनच्या इमारतीत प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली होती. मात्र विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे हे चारही आमदार विधानभवनच्या पायऱ्या चढणार आहेत.