बुधवार, 22 जनवरी 2014

'राज' इफेक्‍टमुळे हलली सारी "मनसे'

महापौरांसह नगरसेवक रस्त्यावर, रामकुंडाची अडीच तास पाहणी, महापालिकेकडे वळले नगरसेवकांचे पाय
नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (ता. 21) केलेल्या झाडाझडतीचा महापौरांसह नगरसेवकांवरही चांगलाच इफेक्‍ट झाला असून, मुंबईवारीनंतर लगेचच महापौरांसह नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात रस्त्यावर उतरून कामाला सुरवात केली आहे. महापौर ऍड. यतीन वाघ यांनी आज अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन रामकुंड परिसराची पाहणी करत स्वच्छतेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. रामकुंडावरील ड्रेनेजलाइन साफ करण्यासह तीन सुलभ शौचालयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. दुसरीकडे "मनसे'च्या नगरसेवकांनी कामांचा पाठपुरावा सुरू केला आहे.

नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीवर नाराज असलेल्या राज ठाकरे यांनी काल महापौरांसह सर्व 38 नगरसेवकांना "कृष्णकुंज'वर पाचारण केले होते. झाडाझडतीत महापौरांसह नगरसेवकांना आक्रमक होण्याचे आदेश दिले. "जनतेची साधी कामे होत नसतील, तर सत्ता काय कामा'ची असा सवाल करत दोन महिन्यांत इफेक्‍ट दाखविण्याचेही आदेश दिले.

महापौर ऍड. यतीन वाघ यांनी आज सकाळी महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांच्यासह आरोग्य अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन रामकुंडावरील स्वच्छतेची पाहणी केली. थेट नागरिकांची भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेत उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तब्बल अडीच तास महापौरांनी रामकुंडावरील भाजीबाजार, रामसेतूचा परिसर पिंजून काढला. होळकर पुलापासून गाडगे महाराज पुलापर्यंतच्या परिसरात फिरून महापालिकेच्या सुरू असलेल्या कामांची उभे राहून पाहणी करत आढावा घेतला. भाजीबाजारातील गल्ली-बोळात घुसून त्यांनी उपाययोजनांची पाहणी केली. गोदेच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदारांना अधिकाऱ्यांनीही तत्काळ बोलावून घेत त्यांचीही हजेरी घेतली. "आपण उद्या परत येऊ', असे सांगत त्यांनी महापालिकेत येऊन गोदावरीवरील उपाययोजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

रामकुंडावर वाढविणार सुलभ शौचालय
नागरिकांनी रामकुंड परिसरात अस्वच्छतेसंदर्भात सर्वांत जास्त तक्रारी या वेळी महापौरांपुढे मांडल्या. परिसरातील नागरिकांसह भाजीबाजारातील विक्रेते रामकुंडाच्या आजूबाजूलाच कचरा टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरते, तर गोदेच्या पश्‍चिम भागावर शौचालय नसल्याने उघड्यावरच येथील नागरिक शौचास बसतात. नागरिकाच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी तीन सुलभ शौचालयांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला जागेवरच दिले. दत्तकोट, बालाजीकोट आणि रामसेतूजवळ "पे ऍण्ड यूज' तत्त्वावर शौचालय उभारण्यात येणार आहे. तसेच रामकुंड परिसरातील ड्रेनेजलाइन तुंबल्याने गटारी फुटून पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे जेट मशिनच्या मदतीने नदीच्या दोन्ही बाजूंच्या ड्रेनेजलाइनमधील गाळ काढण्याचे आदेश त्यांनी दिले. होळकर पूल ते टाळकुटेश्‍वर मंदिरापर्यंतच्या ड्रेनेजलाइनमधील गाळ काढण्यात येणार आहे.

"मनसे' नगरसेवक सक्रिय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी आपल्या प्रभागावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. आपल्या प्रभागातील समस्यांची यादी करण्यातच आज नगरसेवक व्यस्त होते. विशेष म्हणजे तत्काळ सुटणाऱ्या समस्यांसाठी त्यांनी थेट महापौरांकडेच कामांचा तगादा लावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. महापौरांनीही आक्रमकता दाखवत अधिकाऱ्यांना केबीनमध्ये बोलावत कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.

-----------------------------------------------------
"रामकुंडावर नदीच्या पश्‍चिम भागात एकही शौचालय नाही. महिलांनाही शौचालयात जाण्याची व्यवस्था नाही, तर पूर्व भागातील शौचालयात लघुशंकेचेही पैसे घेतात. त्यामुळे नागरिक उघड्यावरच लघुशंका करतात.'
इरफान पठाण, स्थानिक
-----------------------------------------------------
"नदीवर कचरा टाकण्यासाठी तीन संकलन केंद्रे वाढवणे व तीन सुलभ शौचालय नव्याने तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूंच्या ड्रेनेजलाइनमधील साचलेला गाळ बकेट व जेट मशिनने स्वच्छ करण्यात येणार आहे.'
ऍड. यतीन वाघ, महापौर

मंगलवार, 21 जनवरी 2014

जमत नसेल तर आत्ताच सत्ता सोडा!- राज ठाकरे

नाशिक- "तुम्ही केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवा. मनसेला नाशिकमध्ये मिळालेली ही पहिली व शेवटची संधी आहे. त्या संधीचे येत्या आठ महिन्यांत सोने करा अन्यथा जमत नसेल तर आत्ताच सत्ता सोडा,'' असा परखड सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या सर्व नगरसेवकांना दिला.

गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला अपयश आल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील "कृष्णकुंज' या निवासस्थानी आज नगरसेवकांची बैठक घेतली. सकाळी "रामायण' येथून एका खासगी बसने महापौर, स्थायी समितीचे सभापती यांच्यासह 37 नगरसेवक मुंबईला गेले होते. प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा करण्याऐवजी श्री. ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांशी अर्धा तास संवाद साधला. नगरसेवकांनी आक्रमक व्हावे, जनतेशी संपर्क वाढवावा, विरोधकांच्या टीकेला आक्रमक उत्तरे द्यावीत, अधिकारी कामे करीत नसतील त्यांना धारेवर धरावे, महापौरांकडून कामे होत नसतील तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. नगरसेवकांना त्यांच्या कार्याची पावती देताना विकासकामांचे मार्केटिंग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या या नगरसेवकांना आक्रमक होण्याचा सल्ला मिळाला. मात्र गेल्या दोन वर्षांत विकासकामांचे मार्केटिंग करण्यात अपयशी ठरलेले महापौर ऍड. यतीन वाघ श्री. ठाकरे यांच्या रडारवर होते. येत्या आठ महिन्यांत जनतेशी थेट संपर्क साधून विरोधकांच्या टीकेला आक्रमक उत्तर देण्याचे आवाहनही त्यांनी नगरसेवकांना केले.

महापौर रडारवर..! राज ठाकरे यांच्या अर्ध्या तासाच्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांच्या रडारवर महापौर ऍड. यतीन वाघ हेच होते. "रामायण'वर बसून राहण्यापेक्षा बेधडक लोकांपर्यंत जा. कधी सकाळी बाहेर फिरायला गेलात का, असा सवाल महापौरांना करून श्री. ठाकरे यांनी गोल्फ क्‍लबवरील दिवे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याचा दाखला दिला. माजी महापौरांची काही उदाहरणे देताना दोन वर्षांत तुम्हाला कुणी "भेट' आणली का? किंवा तुम्ही कोणाला "भेट' दिली का, असे प्रश्‍नही श्री. ठाकरे यांनी महापौरांना उद्देशून केले. प्रशासनावर वचक ठेवा, विकासकामे माध्यमांपर्यंत पोचविण्याचा सल्लाही त्यांनी महापौरांना दिला

कामगिरी सुधारा, अन्यथा घरचा रस्ता धरा-राज

बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:00 AM IST
मुंबई- मागील निवडणुकांप्रमाणेच आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्येही विजयी घोडदौड करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी राज्यभरातील नगरसेवकांना मुंबईत पाचारण करून महापालिकेमध्ये ज्यांची कामगिरी दिसून येत नाही, अशा नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून कामगिरी सुधारा; अन्यथा घरचा रस्ता धरा, अशा शब्दांत राज यांनी सुनावल्याचे समजते.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच चार-सहा महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यभरातील जनतेने भरभरून मते दिली. नाशिक महापालिकेतील सत्तेची चावी जनतेने मनसेकडे सोपवली. पुण्यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीतही मनसेला चांगले यश मिळाले; मात्र काही महिन्यांपासून पालिकेतील मनसेच्या कारभारावर टीका होऊ लागली. या पार्श्‍वभूमीवर मनसे नगरसेवकांच्या कामांचा आढावा घेण्यास राज यांनी सुरुवात केली आहे. गेल्या शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी "परेड' राजगडवर पार पडली. यापाठोपाठ आज नाशिकच्या नगरसेवकांच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी तक्रारी असलेल्या आणि कामगिरीत कमी पडलेल्या नगरसेवकांची त्यांनी कानउघाडणी केल्याचे समजते. राज उद्या (ता. 22) पुण्यात; तर गुरुवारी (ता. 24) मुंबईतील नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तपासणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमवार, 20 जनवरी 2014

राज ठाकरेंसमोर आज नगरसेवकांची अग्निपरीक्षा

मंगळवार, 21 जानेवारी 2014 - 03:15 AM IST
 
 नाशिक - गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे स्वतः परीक्षा घेणार असून, त्यात केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. परीक्षेसाठी मनसेचे नगरसेवक सकाळी एकत्रितरीत्या एका खासगी बसने रवाना होणार आहेत.

मुंबईतील आजच्या बैठकीत "राज' यांच्या मूडवर सारे काही अवलंबून असल्याचे नगरसेवकांमधून सांगितले जात आहे. नगरसेवकांनी तक्रारींचा सूर आळवला तर कदाचित "राज' यांनी दोन दिवसांत सत्ता सोडण्यासाठी तयार राहण्याचे केलेले सूतोवाच प्रत्यक्षात उतरण्याची शक्‍यता मनसेच्या गटातून व्यक्त केली जात असल्याने नगरसेवकांची धडधड वाढली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान पक्षांतर्गत वाढत्या कुरबुरी व दोन वर्षांच्या सत्ताकाळात विकासकामे न झाल्याने श्री. ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत मला सत्तेची गरज नाही. दोन दिवसांत सत्ता सोडण्यास तयार राहा, असा इशारा दिला होता.

ठाकरे मुंबईत पोचल्यानंतर "कृष्णकुंज'वरून नगरसेवकांना मुंबईत बोलविण्यात आले. उद्या (ता. 21) सकाळी सहाच्या सुमारास मनसेचे सर्व नगरसेवक एका खासगी बसने रवाना होणार आहेत. दरम्यान, ठाकरे यांच्या बैठकीत नगरसेवकांना किती वेळ देतील व मिळालेल्या वेळेत कामांचा सारीपाट कसा सादर करता येईल, या विवंचनेत नगरसेवक असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारींचा सूर अधिक..!

पक्षाध्यक्ष राज ठाकरे वेळ देणार असल्याने मनसेच्या सर्वच नगरसेवकांनी दोन वर्षांत केलेल्या कामांची उजळणी
केली. ठाकरे यांच्यासमोर विकासकामे सादर करताना दोन वर्षांत कुठे अपयश आले याचीही माहिती तक्रारीच्या स्वरूपात दिली जाणार असल्याचे मनसेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. महासभेत भूमिका मांडताना आलेले अपयश, केलेल्या कामांची व्यवस्थित माहिती जनतेसमोर न गेल्याने त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर झालेला परिणाम, महापालिकेत सत्ता असताना न झालेली कामे व त्यास कारणीभूत असलेले पक्षाचे पदाधिकारी यांच्या तक्रारी ठाकरे यांच्याकडे होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे लक्ष

मनसेच्या नगरसेवकांची आज पक्षाध्यक्षांसमोर होणारी परेड व त्यानंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे  महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांनी सत्ता सोडण्याचे निर्देश दिल्यास दुसरीकडे महापालिकेतील सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे शिवसेनेच्या गटातून बोलले जात आहे. त्यासाठी सत्तेची गणिते जुळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या आजच्या बैठकीनंतर निर्णय घेण्याची वेळ आल्यास आगामी निवडणुका, महापालिकेतील पक्षीय बलाबल याचाही विचार करून मनसेकडून निर्णय होण्याची शक्‍यता बोलून दाखविली जात आहे./