मंगलवार, 21 जनवरी 2014

जमत नसेल तर आत्ताच सत्ता सोडा!- राज ठाकरे

नाशिक- "तुम्ही केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवा. मनसेला नाशिकमध्ये मिळालेली ही पहिली व शेवटची संधी आहे. त्या संधीचे येत्या आठ महिन्यांत सोने करा अन्यथा जमत नसेल तर आत्ताच सत्ता सोडा,'' असा परखड सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या सर्व नगरसेवकांना दिला.

गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला अपयश आल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील "कृष्णकुंज' या निवासस्थानी आज नगरसेवकांची बैठक घेतली. सकाळी "रामायण' येथून एका खासगी बसने महापौर, स्थायी समितीचे सभापती यांच्यासह 37 नगरसेवक मुंबईला गेले होते. प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा करण्याऐवजी श्री. ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांशी अर्धा तास संवाद साधला. नगरसेवकांनी आक्रमक व्हावे, जनतेशी संपर्क वाढवावा, विरोधकांच्या टीकेला आक्रमक उत्तरे द्यावीत, अधिकारी कामे करीत नसतील त्यांना धारेवर धरावे, महापौरांकडून कामे होत नसतील तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. नगरसेवकांना त्यांच्या कार्याची पावती देताना विकासकामांचे मार्केटिंग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या या नगरसेवकांना आक्रमक होण्याचा सल्ला मिळाला. मात्र गेल्या दोन वर्षांत विकासकामांचे मार्केटिंग करण्यात अपयशी ठरलेले महापौर ऍड. यतीन वाघ श्री. ठाकरे यांच्या रडारवर होते. येत्या आठ महिन्यांत जनतेशी थेट संपर्क साधून विरोधकांच्या टीकेला आक्रमक उत्तर देण्याचे आवाहनही त्यांनी नगरसेवकांना केले.

महापौर रडारवर..! राज ठाकरे यांच्या अर्ध्या तासाच्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांच्या रडारवर महापौर ऍड. यतीन वाघ हेच होते. "रामायण'वर बसून राहण्यापेक्षा बेधडक लोकांपर्यंत जा. कधी सकाळी बाहेर फिरायला गेलात का, असा सवाल महापौरांना करून श्री. ठाकरे यांनी गोल्फ क्‍लबवरील दिवे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याचा दाखला दिला. माजी महापौरांची काही उदाहरणे देताना दोन वर्षांत तुम्हाला कुणी "भेट' आणली का? किंवा तुम्ही कोणाला "भेट' दिली का, असे प्रश्‍नही श्री. ठाकरे यांनी महापौरांना उद्देशून केले. प्रशासनावर वचक ठेवा, विकासकामे माध्यमांपर्यंत पोचविण्याचा सल्लाही त्यांनी महापौरांना दिला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें