बुधवार, 3 फ़रवरी 2010

मनसे'च्या धसक्‍यामुळे अनेकांना फुटला मराठीचा कंठ - राज

मनसे'च्या धसक्‍यामुळे अनेकांना फुटला मराठीचा कंठ - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 04, 2010 AT 12:46 AM (IST)

डोंबिवली - मनसेला मिळत असलेल्या यशामुळे आता काही जणांना मराठीचा कंठ फुटला, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. तसेच, मराठी माणूस असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखालील "ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मुळे पंजाब प्रश्‍न सुटला, असे आम्ही म्हणायचे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

मनसेच्या डोंबिवली शाखेतर्फे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. मनसेच्या सहा आमदारांबरोबरच पक्षाचे अनेक पदाधिकारी सभेला उपस्थित होते. या वेळी भाजपचे माजी आमदार हरिश्‍चंद्र पाटील, भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक नगरसेवक मनसेत दाखल झाला. सरसंघचालक, संघाचे प्रवक्ते राम माधव, राहुल गांधी, मुकेश अंबानी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

सगळी शहरे आणि राज्ये देशाचीच असून, मुंबई अफगाणिस्तानची किंवा चीनची असल्याचे आम्ही म्हटले नाही, असे सांगत ते म्हणाले, ""स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली आहे. त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील. सरसंघचालक मराठी असल्याबद्दल आम्हाला आदर वाटतो. "रोमपुत्र' राहुल गांधी बडबडून गेले, असे म्हणत एवढी आंदोलने झाली तेव्हा ते कुठे होते?'' उत्तर भारतीय-बिहारींनी मुंबई वाचविली असे ते म्हणतात, मग कामटे, करकरे, ओंबाळे हे यूपी-बिहारचे होते का, असा सवाल त्यांनी केला. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांवर राहुल कधी बोलणार, असा सवालही त्यांनी केला.

दहशतवादी पाकिस्तानमधून येतात, त्या वेळी दिल्लीचे इंटेलिजन्स फेल असताना खापर मात्र महाराष्ट्रावर फोडले जाते. संसदेवरील हल्ल्याबाबत राहुलचे म्हणणे काय आहे, असा सवाल त्यांनी केला. नेहरू घराण्याकडून उत्तर प्रदेशात निवडणुका लढविल्या जातात. काही अपवाद वगळता केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार होते, तरीही उत्तर प्रदेशातून लोक बाहेर का पडतात. तुम्हाला विकास का करता आला नाही, असा सवाल त्यांनी केला.

रिलायन्सचा डोलारा महाराष्ट्रामध्ये उभा राहिला; मात्र कंपनीकडून सर्वात खर्चिक प्रकल्प गुजरातमध्ये उभारला गेला. शेवटी स्वतःच्या माणसाबद्दल प्रेम असते, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. राम माधव यांनी कर्नाटकमध्ये जाऊन बोलावे. तेथून ते जिवंत परत येतील का हा प्रश्‍न आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असताना आधी सर्वप्रथम कर्नाटकचे कायदे बदलावेत. तेथे जलसंधारणाची जमीन कानडी भाषकालाच दिली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅक्‍सीचे परवाने 4500 मराठी मुलांना मिळाले असते, तर मराठी कुटुंबे उभी राहिली असती. टॅक्‍सी परवान्यासाठी जन्माने मराठी ही अट हवी; अन्यथा उत्तर प्रदेशात मराठीचे क्‍लास सुरू होतील. उद्या फ्रेंच व जपानीही टॅक्‍सी परवाने घेतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. परवान्यांच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून दट्ट्या आल्यावर ते सॉरी म्हणतात. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे आभार मानतो. त्यांनी मुख्यमंत्र्यांना तासले. आज त्यांनी जाब विचारला असला, तरी उद्या काय होईल हे माहिती नाही, असे राज ठाकरे म्हणाले. आगामी काळात रेल्वेमध्ये 14 हजार जागांची भरती होणार आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहायला हवे. मराठी माणसावर अन्याय झाल्यास मनसेच्या पदाधिकाऱ्याला भेटावे, असे आवाहन त्यांनी केले.

सचिन क्रिकेटर!
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे. त्याला राजकीय प्रश्‍न का विचारले जातात. कोणी सोनिया गांधींना फुटबॉलचा स्कोअर विचारतो का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. हिंदी-इंग्रजी वाहिन्यांकडून वाद पेटविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोमवार, 1 फ़रवरी 2010

डोंबिवलीत धडाडणार राज ठाकरेंचा तोफखाना

डोंबिवलीत धडाडणार राज ठाकरेंचा तोफखाना
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 02, 2010 AT 12:55 AM (IST)

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा बुधवारी (ता.3) डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर होणार आहे. या सभेत अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असून त्यात काही बड्या असामींचाही समावेश आहे. या वेळी ठाकरे कोणावर तोफ डागणार, हे ऐकण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांसह अनेकांची एकच गर्दी डीएनसी मैदानावर उसळणार आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना मिळालेली लाखो मते पाहता कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मनसेने तीन जागा लढविल्या. त्यापैकी मनसेचे इंजिन कल्याण पश्‍चिम आणि ग्रामीण या दोन मतदारसंघांत घुसले. कल्याण पश्‍चिमेतून मनसेचे प्रकाश भोईर आणि ग्रामीणमधून रमेश रतन पाटील निवडून आले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यातील कल्याण हा एकमेव बुरुज राखता आला होता. त्यालाही सुरुंग लावण्याचे काम मनसेने केले. डोंबिवलीत विधानसभा निवडणुकीत मनसेच्या राजेश कदम यांनी भाजप उमेदवार चव्हाण यांच्याशी कडवी लढत देत दुसऱ्या क्रमांकांची मते मिळवली होती. मात्र श्री. ठाकरे यांची डोंबिवलीतील प्रचारसभा पावसामुळे होऊ शकली नाही. दोन जागांवरील विजयानंतर श्री. ठाकरे डोंबिवलीत येत आहेत. लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी ठाकरे डीएनसी ग्राऊंडवर आले होते. त्या वेळी त्यांच्या सभेला गर्दी लोटली होती. त्यानंतर पुन्हा येथेच होणाऱ्या सभेला गर्दी लोटणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे माजी आमदार हरिश्‍चंद्र पाटील, भाजप नगरसेवक दिनेश तावडे, नगरसेविका वनिता पाटील, कल्याण डोंबिवली महापालिकेतील निवृत्त सचिव आणि भाजपचे प्रदेश प्रतिनिधी चंद्रकांत माने व शिवसेनेचे नगरसेवक सुदेश चुडनाईक या महत्त्वपूर्ण मंडळींसह अनेक अनेक कार्यकर्ते मनसेत जाहीर प्रवेश करणार आहेत. सहा महिन्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही सभा महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात मनसेने महापालिकेतर्फे सुरू असलेल्या मॉलच्या बांधकामाविरोधात आंदोलन, प्रदूषणाचा मुद्दा, बीओटी तत्त्वावर उभारले जाणारे विविध प्रकल्प ही आंदोलने झाली आहेत. या सगळ्या प्रकरणांवर श्री. ठाकरे काय बोलतात अथवा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकारणाविषयी काय बोलतात, मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलनाची दिशा काय असेल, याविषयी उत्सुकता आहे

Raj thakre talks abt mumbai

जन्माने मराठी असणाऱ्यांनाच महाराष्ट्रात नोकरी -

जन्माने मराठी असणाऱ्यांनाच महाराष्ट्रात नोकरी
-
Monday, February 01, 2010 AT 01:15 PM (IST)


मुंबई - जन्माने मराठी असण्याऱ्यांनाच महाराष्ट्रात नोकरी मिळाली पाहिजे त्यासाठी केवळ मराठी लिहीता-वाचता येणे पुरेसे नाही असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (ता.१) स्पष्ट केले. षण्मुखानंद सभागृहात सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी येत्या १३ फेब्रुवारीपासून राज्याचा दौरा करणार असल्याचे या वेळी जाहीर केले. त्याची सुरवात सिंधुदुर्गातून होईल आणि प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. हा दौरा झाडाझडतीचा असेल, त्यात कुठेही जाहीरसभा घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आणि चौकटीत राहूनच काम करण्याचा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

येत्या २१ फेब्रुवारीपासून पक्षातर्फे सदस्य नोंदणी पंधरवडा आयोजित करण्यात आल्याची तसेच पक्षाचे कोकण विभाग संघटक म्हणून शिशिर सावंत आणि शिक्षकसेना प्रमुख म्हणून संजय चित्रे यांची नेमणूक केल्याचे जाहीर करण्यात आले

रविवार, 31 जनवरी 2010

राज ठाकरे आज काय बोलणार?

राज ठाकरे आज काय बोलणार?
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 01, 2010 AT 12:20 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्या (ता. 1) सकाळी 10 वाजता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांचे संरक्षण करण्यास सज्ज राहण्याचे आदेश आज रा. स्व. संघाने स्वयंसेवकांना दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्या होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता; मात्र विधानसभेतील घवघवीत यशानंतर कोणताही मेळावा झालेला नाही. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील संघ स्वयंसेवकांना सज्ज राहण्याचे दिलेले आदेश, मराठी बोलणाऱ्यांनाच टॅक्‍सीचे परमिट देण्यावरून घूमजाव करणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण याबाबतही राज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जाते. राज हे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. येत्या दीड वर्षात मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जागते ठेवण्याचे कामही या मेळाव्यात होईल, अशी माहिती मनसेतील सूत्रांनी दिली