मंगलवार, 30 अगस्त 2016

ऍट्रासिटीऐवजी दुसरा कायदा आणा - राज

मुंबई - ऍट्रासिटी कायद्याचा गैरवापर होत असून, हा कायदा रद्द केला पाहिजे. त्याऐवजी दुसरा कायदा आणला पाहिजे. धर्म व जातीनिहाय आरक्षण हवेच कशाला, आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केले.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, ‘कोपर्डी भेटीच्या वेळी गावकऱ्यांनी ऍट्रासिटीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी केल्या. या दुरुपयोगामुळेच या कायद्यात बदल झाला पाहिजे, असे मला वाटते. हिंदू सणावर गदा येत आहे, यावर कोण बोलणार आहे की नाही? दहीहंडीबाबत मी बोललो, तर माध्यमे लेख लिहून मला झोडपत राहिली. दहीहंडीला जे घाणेरडे स्वरूप आले, त्या नावाखाली धांगडधिंगा होतो त्याला लोकं कंटाळली होती आणि म्हणून लोक विरोधात बोलायला लागले आहेत. आमदार किती निवडून आलेत, याची चिंता मला नाही, माझी सत्ता रस्त्यावर आहे. शहरात फेरीवाल्यांचा उच्छाद वाढला आहे, त्यांनी फुटपाथ व्यापून टाकले; पण अशा विषयांवर माध्यमे गप्प का? बलात्कार थांबवण्यासाठी शरियासारखे कायदे हवे असे बोललो तर चुकीचा अर्थ काढत राज ठाकरेंना शरिया हवा अशा बातम्या सुरू केल्या जातात. माझ्यावर कितीही टीका करा, महाराष्ट्राच्या हिताचे जे असेल ते मी बोलत राहणारच.‘‘
निवडणूक लढवा; पण आधी विचार करा. प्रत्येक गोष्ट माझ्या मराठी माणसाच्या हिताची, महाराष्ट्राच्या हिताची आहे का? मराठी माणसाच्या हिताचीच कृती करा. कल्याणमधल्या पक्षाच्या आंदोलनावेळी एक उत्तर भारतीय म्हणतो, की आमच्यामुळे ही मुंबई उभी आहे. अशी बोलायची यांची हिंमत होतेच कशी? असा सवालही राज यांनी केला.

"जीएसटी‘मुळे सगळे केंद्राकडे जाणार, पुन्हा मोगलाई सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दलित मुद्द्यावरून भावनिक आवाहन उत्तर प्रदेश निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन होते.‘‘
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे