बुधवार, 25 मार्च 2015

मनसेच्या बॅनरवरून ख्रिश्चन संघटना संतप्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) सध्या मुंबईत लावण्यात आलेल्या बॅनर्सवरील व्यंगचित्रावर काही ख्रिश्चन संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मुंबईच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी मनसेकडून भायखळा, सीएसटी आणि गिरगाव परिसरात हे बॅनर्स लावले आहेत. विकास आराखड्यामुळे मुंबईतील मराठी माणसाची अवस्था कशाप्रकारे केविलवाणी होईल, हे अधोरेखित करणारे व्यंगचित्र या बॅनर्सवर आहे. हे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले असून त्यामध्ये मुंबईतील उंच टॉवर्सना मराठी माणूस टांगलेल्या अवस्थेत दाखविण्यात आला आहे. मात्र, ही प्रतिमा क्रुसावर लटकवलेल्या येशूशी सार्धम्य साधणारी असल्याने काही ख्रिश्चन संघटनांनी मनसे आणि विभागीय आर्चबिशप यांच्याकडे तक्रार केली आहे.
मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी हा आरोप फेटाळून लावत हे व्यंगचित्र ख्रिश्चन धर्मातील कोणत्याही प्रतिमेला डोळ्यासमोर ठेवून रेखाटण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईच्या नवीन विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली तर, मराठी माणसाची होणारी दैना आमच्या पक्षप्रमुखांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून वेगळ्याप्रकारे चितारल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या उत्तराने ख्रिश्चन संघटनांचे समाधान झालेले नाही. या व्यंगचित्रातील माणसाला येशूप्रमाणेच लटकवण्यात आल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

 येशूला क्रुसावर लटकवण्याच्या या प्रसंगाला ख्रिश्चन धर्मात विशेष महत्त्व आहे. विशेषत: थोड्याच दिवसांमध्ये येऊ घातलेल्या गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अधिक गंभीर आहे. मनसेने फुटकळ प्रसिद्धीसाठी लावलेल्या या बॅनर्समुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया कॅथलिक सभेचे अध्यक्ष गॉर्डन डिसोझा यांनी दिली.