शनिवार, 6 दिसंबर 2014

कॅमेऱ्याच्या क्‍लिकला क्षणभर राज यांचाही विसर!

नाशिक : धारदार आवाज, लक्षवेधी एन्ट्री आणि नेमक्‍या पोझमुळे कायमच छायाचित्रकारांना सभोवताली घिरट्या घालायला लावणारे राज यांच्या इमेजची कायमच 'कॅमेऱ्याची क्‍लिक'ला भुरळ राहिली आहे. पण आज एक क्षण असा आला, की एका क्‍लिकसाठी सतत राज यांच्या आवती-भोवतीच घुटमळणाऱ्या कॅमेऱ्यांच्या क्‍लिकलाही राज यांचाही विसर पडला. विशेष म्हणजे, दस्तुरखुद्द राज यांच्याच 'राजगडावर तो क्षण असा आला, की सगळे कॅमेरे अन्‌ फ्लॅश छायाचित्रकारांनी राज यांच्याकडे पाठ फिरवित एका दुसऱ्याच चेहेऱ्यावर स्थिरावले.आणि सगळे प्लॅश...त्याच्यावरच झळकत राहिले. शेवटी न राहून 'मिश्‍किलपणे' राज यांना स्वतःच आता थोडा वेळ आपण तिकडे थांबा असे सांगावे लागले. 'राज यांच्याकडेही काही क्षणासाठी पाठ फिरवायला लावून स्वताकडे आर्कषित करणारा हा चेहेरा होता, अमित राज ठाकरे...

ज्या नाशिकमध्ये 'दार उघड बये, दार' या अधिवेशनच्या निमित्ताने, राज्यातील सत्तेची कवाडे उघडली. शिवसेनाप्रमुखांच्या जाहीरसभांनी विक्रमी गर्दी केली. याशिवाय ठाकरे कुटुंबातीलच राज ठाकरे यांच्या पदरातही भरभरून देताना कुठली कसर ठेवली नाही. त्यामुळेच सवतासुभा उभा करतानाच, राज ठाकरे यांनाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पायाभरणीसाठी नाशिकच योग्य वाटले. त्यांच्या मनसेला येथील महापालिकेच्या सत्तेसह 3-3 आमदार दिले. अशा त्या नाशिक विषयी ठाकरे कुटुंबीयांच्या मनात कायमच वेगळी इमेज राहिली आहे. 'ठाकरे आणि नाशिक' हा धागा विविध संदर्भांनी अधोरेखित होतानाच, आज आणखी एक संदर्भ पुढे आला.

राज ठाकरे यांच्या कुटुंबातील पुढची पिढीही नाशिकमधूनच 'राजकीय बाळकडू' घेत असल्याचे आज प्रकर्षाने जाणवले. दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राज यांच्यासोबतच दौऱ्यात सहभागी झालेला त्यांचा मुलगा अमित याचा मनसेच्या वर्तुळातील वावर लक्षवेधी होता. राज यांच्या प्रमाणे थेट व्यासपीठावरून 'एन्ट्री' न करता, 'पक्ष, आधी कार्यकर्ते आणि संघटनेत विरघळण्याचा प्रयत्न करतानाच, राजकीय निरीक्षण व अभ्यास सुरू झाला आहे. अमित याचा मनसेतील हा अभ्यास दोन दिवसांपासून चर्चेचा विषय राहिला.