शनिवार, 16 अक्तूबर 2010

मनसेच्या 22 बंडखोरांची "कृष्णकुंज'वर समजूत

मनसेच्या 22 बंडखोरांची "कृष्णकुंज'वर समजूत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 17, 2010 AT 12:15 AM (IST)
 
कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडाचा फटका सोसावा लागत आहे. यातून मनसेचीही सुटका झालेली नाही. उमेदवारी नाकारलेल्या मनसेच्या इच्छुकांनी बंडखोरी केली. त्यामुळे खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरांना थेट शिवाजी पार्क येथील "कृष्णकुंज' येथे बोलावून समजूत काढली. 

"कल्याण-डोंबिवली'त मनसे सर्व 107 प्रभागांतून स्वबळावर निवडणूक लढवत आहे. 107 प्रभागांतून मनसेतर्फे साडेचार हजारहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मनसेच्या आमदार कमिटीच्या शिफारशीनंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वत: डोंबिवलीत तीन दिवस तळ ठोकला होता. 13 ऑक्‍टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडखोरी केली व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी कल्याण डोंबिवली विकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. मनसेच्या 22 बंडखोरांना आज मनसेचे प्रमुख ठाकरे यांनी "कृष्णकुंज'वर बोलाविले होते. या 22 बंडखोरांशी ठाकरे यांनी स्वत: चर्चा केली. पालिकेची निवडणूक संपली म्हणजे सगळं संपलं का, असा सवाल त्यांनी इच्छुक उमेदवारांना केला. सर्वांनी धीर धरा, भविष्यात निवडणुका होणार आहेत. कल्याण-डोंबिवलीत मनसेचा महापौर सत्तेवर बसणार, असा मला विश्‍वास कार्यकर्त्यांनीच दिला आहे. त्यांनी असे केले तर कसे होणार. अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागा. भविष्यात तुमचाही योग्य विचार केला जाईल, असे सांगून इच्छुकांना विश्‍वास दिला. यावेळी बंडखोरांनी कल्याणचे आमदार प्रकाश भोईर व जिल्हाध्यक्ष काका मांडले यांच्या विरोधात तक्रारी केल्याचे सूत्रांकडून समजते.
राज ठाकरे यांना मानणाऱ्यांनी आदराखातर त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या, मात्र उमेदवारी मागे घेण्याविषयी आम्ही अद्याप काहीएक ठरविलेले नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

गुरुवार, 14 अक्तूबर 2010

मनसेचे रेल्वे इंजिनला निघाले प्रचाराला

मनसेचे रेल्वे इंजिनला निघाले प्रचाराला
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 15, 2010 AT 12:15 AM (IST)
 

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणूक रिंगणात मनसेतर्फे उतरलेल्या उमेदवारांनी आज सायंकाळी डोंबिवली येथील शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाची प्रतिकृती असलेला रथ तयार करण्यात आला असून, रेल्वे इंजिन आजपासून प्रचाराला निघाले आहे. प्रचार कार्यालयापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत सर्व उमेदवारांनी हातात झेंडे घेतले होते; तर गळ्यात स्कार्फ होता. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार रमेश पाटील, नेते शरद गंभीरराव, शहराध्यक्ष राजेश कदम, हरिश्‍चंद्र पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तयार करण्यात आलेल्या रेल्वे इंजिनाच्या प्रतिकृतीला आमदार रमेश पाटील यांनी मनसेचा झेंडा दाखवून सत्तापरिवर्तनासाठी मनसेचे इंजिन कल्याण-डोंबिवली फिरणार आहे, असे स्पष्ट केले. रेल्वे इंजिनाच्या दोन प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. मनसेचे "इंजिन' पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

मंगलवार, 12 अक्तूबर 2010

राज ठकरे यांनी सपत्निक घेतले कुलदेवतेचे दर्शन

राज ठकरे यांनी सपत्निक घेतले कुलदेवतेचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 13, 2010 AT 02:15 AM (IST)
 

लोणावळा - नवरात्रोत्सवातील पाचवी माळ व मंगळवार असल्याने कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या गडावर देवीच्या दर्शनासाठी असंख्य कोळी बांधवांसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह देवीची पूजा केली.

मंगळवार हा देवीचा वार असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

सकाळी साडेदहाच्या सुमारास ठाकरे यांचे गडावर सपत्निक आगमन झाले. यावेळी मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे, रमेश पाटील, प्रवीण दरेकर, प्रकाश भोईर यांच्यासह मनसेचे नेते विनोद खोपकर, शालिनी ठाकरे, राज्य सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर, रायगड जिल्हाध्यक्ष मनीष खवळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पिंजण, विजय तडवळकर, तालुकाध्यक्ष पंकज गदिया, उपाध्यक्ष सुरेश जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आदींसह मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी "बिग बॉस' आंदोलन तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिला.

रविवार, 10 अक्तूबर 2010

मनसेला एकहाती सत्ता द्या - राज

मनसेला एकहाती सत्ता द्या - राज
सकाळ वृत्तसेवा
Monday, October 11, 2010 AT 12:15 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवलीचा विकास करण्यासाठी मनसेला एकहाती सत्ता द्या. नाशिकच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीचा विकास करून दाखवतो. आम्हाला जनतेला पारदर्शक कारभार करून दाखवायचा आहे. मला जरा अजमावून तर पाहा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.10) येथे केले.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या 100 प्रभागांतील उमेदवारांची यादी अध्यक्ष ठाकरे यांनी डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉटेलात जाहीर केली. या वेळी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, रमेश पाटील, प्रकाश भोईर हे उपस्थित होते. मनसेच्या इच्छुकांच्या मुलाखती स्वत: घेतल्याचे सांगून "कोअर कमिटी'ने घेतलेल्या मुलाखती व आपण घेतलेल्या मुलाखती ज्यांना जवळपास 90 पेक्षा जास्त गुण मिळाले, अशा निवडून येणाऱ्या योग्य उमेदवारांची निवड केल्याचे ठाकरे म्हणाले.
काही उमेदवारांनी स्वत:हून इतरांना संधी देण्याचे स्पष्ट केले. निवडणुकीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे काय असतील, जाहीरनामा काय असेल, याविषयी लगेचच सगळे सांगणे योग्य ठरणार नाही. आमच्या पक्षाचा जाहीरनामा नसून "वचकनामा' असेल, असे राज यांनी या वेळी स्पष्ट केले. पहिल्यांदाच 100 उमेदवारांची मोठी यादी जाहीर करत असल्याच्या घटनेकडे राज यांनी लक्ष वेधले.
मी निवडणुका पैसा मिळविण्यासाठी लढवत नाही. मला पैशांची गरज नाही. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणही आपण करत नाही. आगरी-कोळी, ब्राह्मण, सीकेपी असे आपल्याकडे नाही. शहराचा विकास महत्त्वाचा आहे. शहरातील माणसं मोठी होतात. शहरे छोटी होत जातात, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तोच विचार या निवडणुकीच्या माध्यमातून करण्यास आमचा कार्यकर्ता भाग पाडणार आहे.

सरकारची वक्रदृष्टी असणाऱ्यांना बेघर होऊ देणार नाही.
सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकामे तोडण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. न्यायालयाला चुकीची माहिती दिली जाते. परप्रांतातून येणाऱ्यांना फुकट घरे दिली जातात. 1995 पासून बसलेल्या मराठी माणसाला बेघर करण्यात येत आहे. बिल्डर बांधून जातो. त्याला पकडणार कोण, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर खड्डे भरणे
निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम जोराने सुरू आहे. कंत्राटदाराकडून पैसे घेतल्यानंतर रस्त्यावर खड्डे नाही पडणार, तर काय होईल, असे सांगून ठाकरे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदाराकडूनच ते भरून घ्या, अशी अट निविदेत टाकण्याची सक्ती मनसे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'ओबामांना विचारून सांगतो'
पालिकेच्या डोक्‍यावरील कर्ज कसे फेडणार, सत्ता पूर्ण मिळाली नाही तर कोणाचे सहकार्य घेणार, या विषयावरचे प्रश्‍न तुम्ही इतरांनाही विचारा, असा सल्ला त्यांनी दिला. सत्तेसाठी सहकार्य घेण्याबाबत ओबामांना विचारून सांगतो, असे उत्तर दिले.

"कल्याण-डोंबिवली'साठी मनसेचे उमेदवार जाहीर"

"कल्याण-डोंबिवली'साठी मनसेचे उमेदवार जाहीर
-
Sunday, October 10, 2010 AT 01:30 PM (IST)

डोंबिवली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शंभर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकीत मनसे सर्वशक्तीनिशी उतरणार असून सर्वच्यासर्व म्हणजे 107 जागा लढवणार आहे. उरलेल्या सात उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे.

पक्षाच्या पदाधिकारी आणि आमदारांनी सर्वेक्षण करून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या नावांची यादी प्रथम तयार केली. त्यानंतर आपण स्वतः 450 ते 500 जणांच्या मुलाखती घेतल्या आणि उमेदवार निश्‍चित केले आहेत अशी माहिती राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

2007 मध्ये झालेल्या पाच महापालिका निवडणुकांमध्ये पक्ष नवीन होता, पुरेशी पक्षबांधणी झाली नसल्याने फटका बसला. आता पक्षबांधणीचा विचार करून केवळ कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच कोल्हापूर महापालिकेची निवडणूक असूनही तिथे रस घेतलेला नाही असे राज ठाकरे म्हणाले.

कल्याण - डोंबिवली महापालिकेसाठी मनसेने सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी दिली असून सत्ता मिळाली तर आपण पंधरा दिवसातून किमान 4-5 दिवस डोंबिवलीत ठाण मांडून बसणार आहोत असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शहरातील खड्यांच्या परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की, रस्त्यावर पडलेल्या खड्यांची जबाबदारी ही कंत्राटदाराचीच असली पाहिजे. महापालिकेत सत्ता मिळाली तर प्रत्येक निविदेत कंत्राटदाराला त्याच्या खर्चानेच रस्त्याची दुरूस्ती करून देण्याची अट घालण्यात येईल.