बुधवार, 27 जनवरी 2010

पुणे मेट्रो'साठी 'मनसे'चा स्वतंत्र अहवाल

पुणे मेट्रो'साठी 'मनसे'चा स्वतंत्र अहवाल
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 28, 2010 AT 12:46 AM (IST)

- "पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आज (बुधवार) सत्ताधारी पक्षाने महापालिका सभेत सादर केलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या अहवालात त्रुटी आहेत. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तज्ज्ञांची मदत घेऊन दहा दिवसांत मेट्रो प्रकल्पाविषयी स्वतंत्र अहवाल बनविणार आहे. तो अहवाल मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना देणार आहे,' असे मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर यांनी "ई सकाळ'शी बोलताना सांगितले.

पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बनविलेल्या मेट्रो प्रकल्पाविषयीचा अहवाल सत्ताधारी पक्षाने महापालिका सभेत सादर केला. प्रकल्पाबाबतच्या माहितीचे सादरीकरण इंग्रजीत असल्याने मनसे, शिवसेना व भाजप पक्षातील नगरसेवकांनी राजदंड पळवित महापालिका सभेत निषेध केला. अहवाल हा मराठीत असणे आवश्‍यक असल्याची मागणी या नगरसेवकांनी केली.

या सर्व घटनेविषयी रवींद्र धंगेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "पुण्यात बीआरटी प्रकल्पाचा उडालेला फज्जा पाहून मेट्रो प्रकल्पाचीही तशी अवस्था होऊ नये यासाठी आम्ही या प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणत आहोत. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही. मराठीच्या मुद्यावर आंदोलन करुनही सत्ताधाऱ्यांना मराठीचे महत्त्व कळत नसेल तर इंग्रजी अहवालाला आमचा विरोध असणारच. पुण्याचा वाढता विस्तार पाहता मेट्रोसारखे प्रकल्प पुण्यात राबविणे आवश्‍यक आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे पुण्यात असून, या मुद्यावर त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत.'